You are currently viewing . वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा तुफान गर्दीत रोंबाट कार्यक्रम संपन्न

. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा तुफान गर्दीत रोंबाट कार्यक्रम संपन्न

*आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा तुफान गर्दीत रोंबाट कार्यक्रम संपन्न*

*भव्यदिव्य ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखाव्यांचे लक्षवेधी सादरीकरण*

*राधानृत्य स्पर्धेत नेरूर रायवाडी गावडोबा कलेश्वर ब्राह्मण पारंपारिक राधानृत्य प्रथम*

भव्यदिव्य ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखाव्यांचा लक्षवेधी कलाविष्कार, विविध सोंगांसह खेळ, रोंबाट, राधानृत्याचे अप्रतिम सादरीकरण आणि त्याला लाभलेला हजारो प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद अशा जल्लोषी वातावरणात कुडाळ येथील क्रिडा संकुल येथे शिमगोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्काराचे एकापेक्षा एक सरस असे सादरीकरण करीत कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. सुस्वर गायन, वादन व कलाविष्कार यांचा सुरेख मिलाफ यावेळी पाहायला मिळाला. राधानृत्य स्पर्धेत गावडोबा कलेश्वर ब्राह्मण पारंपारिक राधानृत्य रायवाडी नेरूर ने प्रथम क्रमांक मिळविला. आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रात्री बारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत, शुभेच्छांच्या वर्षावात केक कापून शुभेच्छांचा करीत मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ तालुक्याच्या वतीने आ.नाईक यांचा शाल, श्रीफळ, गदा भेट देऊन तसेच पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ तालुक्याच्या वतीने शनिवारी सायंकाळी कुडाळ येथील क्रिडा संकुल (तहसीलदार कार्यालय नजिक) येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रिय ठरणारा शिमगोत्सव (रोंबाट) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
राज्यात सत्तांतर झाले तरीही आमदार वैभव नाईक हे येथील जनतेशी प्रामाणिक राहीले. सर्वसामान्यांचा आमदार म्हणून त्यांची लोकप्रियता आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निधी आपल्या मतदार संघात त्यांनी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण करण्यावर त्यांचा भर असतो. कुडाळ येथील या शिमगोत्सव कार्यक्रमाला झालेली गर्दी ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निष्ठेचे पाईक असणारे आ.नाईक विजयाची हॅट्ट्रिक करून तिस-यांदा आमदार होऊन राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री बनतील, अशा सदिच्छा आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी दिल्या. यावेळी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस केक कापून, फटाक्यांच्या आतषबाजीत शुभेच्छांच्या वर्षावात मोठ्या जल्लोषात कुडाळ येथे साजरा करण्यात आला.
आ.वैभव नाईक म्हणाले, जनतेने माझ्यावर सातत्याने विश्वास दाखवला त्यामुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता दोन वेळा आमदार झाला. जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम, विश्वास यामुळेच अधिक काम करण्याची उर्जा निर्माण होते. आज वाढदिवस हे निमित्त आहे. परंतु येथील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने दोन वेळा मला आमदार म्हणून निवडून दिले, या जनतेसाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि पुढील काळातही करीत राहणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण झाली. दुर्दैवाने आठ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. मलाही आमिषे दाखविण्यात आली, दबाव टाकण्यात आला मात्र मी त्याला डगमगलो नाही. ज्या जनतेने मोठ्या विश्वासाने मला निवडून दिले त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता जनतेसाबत राहीलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे महाराष्ट्रातील जनता उभी राहिली आहे. तसेच आपणही त्यांच्यासोबत राहूया. सत्ता बदल झाल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. हि स्थगिती उठविण्यासाठी आम्ही न्यायालयात गेलो आहोत. लवकरच हि स्थगिती उठवून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण केली जातील. आज माझा गौरव करण्यात आला, जनतेने मला प्रेम दिले, असेच प्रेम यापुढेही माझ्या पाठीशी राहो, जनतेच्या विश्वासाला नेहमीच पात्र राहील. आपण या भागाच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे आ.वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
रोंबाट कार्यक्रमाचा आनंद हजारो प्रेक्षकांनी लुटला. नेरूर येथील कलाकारांनी यावेळी पौराणिक कथांवर आधारीत मोठ मोठे ट्रिकसीनयुक्त देखाव्यांचे सादरीकरण केले. विविध सोंगांसह खेळांचे सादरीकरण करून कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. नेरूर येथील विलास मेस्त्री, आना मेस्त्री, ओंकार मित्रमंडळ, दिनू मेस्त्री व बाबा मेस्त्री ग्रुपच्या लक्षवेधी देखाव्यांच्या सादरीकरणाने क्रिडा संकुलाच्या मैदानावर जणू चित्रनगरीच अवतरली होती. राधानृत्याचेही सादरीकरण करण्यात आले. घुमट वादनानेही लक्ष वेधून घेतले. जांभवडे येथील महेश मडव यांनी स्त्री वेशभूषा साकारून बबली नृत्य सादर केले. त्यांच्या या अदाकारीला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
राधानृत्य स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक गावडोबा कलेश्वर ब्राह्मण पारंपारिक राधानृत्य संघ रायवाडी नेरूर, द्वितीय क्रमांक श्री देव गावडोबा मित्रमंडळ माड्याचीवाडी, तृतीय क्रमांक गजानन प्रासादिक मंडळ नेरूर यांनी मिळविला. तर उत्कृष्ट कलाकारांमध्ये राधा – महेश मडव (भगवती सान मडव, जांभवडे), कृष्ण – श्री देव समंध मित्रमंडळ (वेतोरे), मारूती – सत्यवान धामापूरकर (श्री देव गावडोबा माड्याचीवाडी), राक्षस – गोट्या पाटकर ( गजानन प्रासादिक मंडळ नेरूर), नर्तक – श्री कलेश्वर गावडोबा नेरूर सायचेटेंब, विशेष कल्पक सोंग – होलिका (श्री देव समंध वेतोरे) व संगीत साथ – श्री देव समंध मित्रमंडळ वेतोरे यांची निवड करण्यात आली. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ, पिंगुळी, समंध मित्रमंडळ वेतोरे, मांडेश्वर मित्रमंडळ वरची शेळपी, श्री देव ब्राह्मण राधानृत्य संघ केसरकरवाडी परूळे, भावई मित्रमंडळ कोचरे, कलेश्वर गावडोबा साईचेटेंब नेरूर व भगवती सान मडव जांभवडे या संघांनी सहभाग घेत राधानृत्याचे सादरीकरण केले. राधानृत्य स्पर्धेचे परीक्षण प्रशांत धोंड व सौरभ पाटकर यांनी केले. निवेदन राजा सामंत, निलेश गुरव व अनंत पाटकर यांनी केले.
या सोहळ्या प्रसंगी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रकाश जैतापकर, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव काका कुडाळकर, प्रसाद रेगे, कोल्हापूर येथील उद्योजक प्रशांत पोकळे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तालुका संघटक बबन बोभाटे, नगराध्यक्षा सौ.आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, माजी उपसभापती जयभारत पालव, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, सचिन कदम, अतुल बंगे, विकास कुडाळकर, सुनील भोगटे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेवक किरण शिंदे , शहर प्रमुख संतोष शिरसाट, नगरसेविका सौ.सई काळप, सौ.श्रेया गवंडे, सौ.ज्योती जळवी, सौ.श्रुती वर्दम, सौ.अक्षता खटावकर, महिला आघाडी विधानसभा संघटक सौ.श्रेया परब, तालुका संघटक सौ.स्नेहा दळवी, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, सचिन काळप, शेखर गावडे, तुळसुली सरपंच मिलिंद नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपशहरप्रमुख गुरुनाथ गडकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, उपतालुकाप्रमुख स्वप्नील शिंदे, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर, शहरप्रमुख राजू गवंडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा