You are currently viewing मालवण तालुक्यातील हिवाळे गावात शोकाकुल वातावरण

मालवण तालुक्यातील हिवाळे गावात शोकाकुल वातावरण

*दीड महिने सायन रुग्णालयाच्या अंथरुणाला खिळून, अखेर भांडुपचा गोविंदा प्रथमेश परबची झुंज अपयशी*

 

*मुख्यमंत्री कार्यालयाकडे कागदपत्रे सुपूर्द करूनही अद्यापही मदत नाहीच!*

 

मुंबई :

दहीहंडी उत्सवात मृत्यूमुखी पडलेला प्रथमेश तुकाराम परब हा दुसरा गोविंदा आहे. 27 वर्षीय प्रथमेशने अखेरचा श्वास घेतल्याची बातमी धडकली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. सायन रुग्णालयात उपचार घेत असताना प्रथमेश परब हा मृत्यूशी झुंज देत होता. अखेर 10 सप्टेंबरला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भांडुप पश्चिमेच्या रामनगरातील कोंडाळकर कंपाउंड येथील झोपडपट्टी विभागात रहाणारे रिक्षाचालक तुकाराम परब कुटुंबिय. दहीहंडी उत्सवात भांडुपच्या नरदास नगर येथील प्रगती शाळेच्या पटांगणावर 16 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी सराव करताना थरावरून पडून प्रथमेश परबच्या मानेला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर प्रथमेशला तातडीने उपचारार्थ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर सायन रुग्णालयात पाठवले.

सायन रुग्णालयात उपचारादरम्यान 10 सप्टेंबर 2022 रोजी प्रथमेशने अखेरचा श्वास घेतला. प्रगती शाळेच्या पटांगणावर दहीहंडीचा सराव करताना प्रथमेशला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून होता. श्री साई स्पोर्ट्स क्लबतर्फे त्याने दहीहंडी उत्सवात भाग घेतला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रथमेश साठी अथक परिश्रम घेतले. प्रसंगी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.

प्रथमेश तुकाराम परबची कथा कुणालाही हेलावून टाकणारी.

आई गृहणी, तर वडील तब्येतीने सतत आजारी व रिक्षा चालक आहेत. तब्येत चांगली असेल तर रिक्षा काढायची. तब्येत बरी नसेल तर जायचं नाही. असा त्यांचा दिनक्रम असायचा. प्रथमेश हा मोठा तर दुसरा भाऊ प्रणय शिक्षण घेतोय. 27 वर्षीय प्रथमेश अलीकडेच तीन महिन्यापूर्वी सिप्स कंपनीमध्ये कामाला लागला होता. ऐन उमेदीच्या काळात प्रथमेशचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मृत्यूने आधारच हिरावून घेतला आहे.

प्रथमेशच्या मृत्यूनंतर वडील तुकाराम परब यांची प्रकृती खालावली आहे. उमदा तरुण मुलगा अचानक सोडून गेल्याने ते मानसिक तणावाखाली आहेत. साई स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचंड धावपळ करीत मुख्यमंत्री कार्यालयाकडे कागदपत्रे सुपूर्द केलेली असताना अध्यापही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळालेली नाही. यासाठी राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − nine =