You are currently viewing सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे मोती तलावाचा कठडा कोसळला

सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे मोती तलावाचा कठडा कोसळला

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत वेधले लक्ष

सावंतवाडीतील ऐतिहासिक मोती तलावातील गाळ काढण्याची मागणी जनतेतून वारंवार होत होती. त्यामुळे राजघराण्याची परवानगी मिळाल्यानंतर सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांनी गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू केली. तलावातील पाणी पूर्णपणे काढून तलावाच्या मध्यभागी साठलेला गाळ काढणे अपेक्षित होते, अशाप्रकारे २००० साली देखील संपूर्ण तलावातील पाणी काढून बराच गाळ काढलेला होता. परंतु सावंतवाडीत पाणी टंचाई उद्भवणार असे गृहीत धरून मशिनरी तलावात न उतरता दोन तीन वर्षांपूर्वीच नव्याने बांधलेल्या, सुशोभित केलेल्या फुटपाथवर अवजड पोकलेन चढवून तलावाच्या काठापासून जवळपास पंधरा वीस फूट रुंद आणि पाच ते सात फूट खोल गाळ उपसा करण्यात आला.
बांधकाम क्षेत्राशी निगडित नसणारे लोक सुद्धा “अशाप्रकारे दगडी बांधकामाच्या बाजूची माती काढल्यास संरक्षक कठडा कोसळणार” असे सांगत असताना उच्चशिक्षित मुख्याधिकाऱ्यांना ते न समजावे? हा प्रश्न उभा राहतो, त्यामुळे जाणीवपूर्वक कामाचे चुकीचे नियोजन केले होते की काय? जेणेकरून दुरुस्तीच्या नावाखाली निधी खर्च करता येईल. असा संशय येण्यास वाव मिळाला. घराच्या चौथऱ्याच्या बाजूला खोदाई केल्यास चौथरा पडणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नसते, त्याचप्रमाणे कित्येक दशके जुनी असलेली काळ्या दगडाच्या बांधकामाची संरक्षक भिंत बाजूचा पाच सात फूट उंचीचा गाळ काढल्यावर पडणार हे निश्चित होतेच. सदरचा संरक्षक कठडा हा जुन्या मुबई गोवा महामार्गाला लागून असल्याने अवजड वाहनांच्या हादऱ्याने अगदी काहीच दिवसात रस्त्यालगत भेग पडल्याने रस्त्यापासून फुटपाथ वेगळा झाल्याची दृष्टीस पडली होती परंतु नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि सुरू झालेली पावसामुळे कठड्याचा काही भाग कोसळला होता.
सावंतवाडी नगरपलिकेतील नगराध्यक्ष, नगरसेवक बॉडी पायउतार झाल्याने नगरपलिकेवर प्रशासकीय राजवट अस्तित्वात होती. आपले तेच खरे करणाऱ्या, सार्वजनिक हिताचा विचार न करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी सदरचा कठडा कोसळला तर पहाटे, सायंकाळी तलावाच्या काठावर फिरणाऱ्या वयोवृद्ध लोकांचा जीव जाईल याची पर्वा न करता कोसळलेल्या भागावर केवळ बंदी फलक आणि बांबू बांधले परंतु त्याच्याही पलीकडे रस्ता खचताना दिसत असूनही स्पोर्ट्समन असलेल्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणावर कठडा रात्रीच्या वेळेस कोसळला. दैव योगाने त्यावेळी कठड्यावरून जाणारी वर्दळ कमी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु सावंतवाडी या ऐतिहासिक शहराच्या सौंदर्यास मात्र बाधा पोचली.
मोती तलावाचा कोसळलेल्या कठड्याचा भाग हा राज्य महामार्गास लागून असल्याने अजूनही उर्वरित भाग कोणत्याही क्षणी कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कठडा कोसळल्याने तलावाच्या काठावर पाय मोकळे करण्यासाठी, नित्य व्यायाम म्हणून फिरणाऱ्या शहरातील लोकांना, वयोवृद्ध व्यक्तींना जीव मुठीत धरून महामार्गावरून चालावे लागते आहे. सावंतवाडी कार्यकारी अभियंत्यांनी यापूर्वी एकदा सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाला कठडा दुरुस्ती करण्याबाबत सूचना केली होती परंतु पावसाळा सुरू असल्याने प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. सावंतवाडी तलावात वर्षभर पाणी भरलेले असते त्यामुळे पाणी संपूर्ण सुकल्यावरच कठडा दुरुस्ती करणार का? असा प्रश्न सावंतवाडी वासीयांना पडला आहे.
मोती तलावाच्या कठड्याच्या दुरुस्तीकडे सावंतवाडी मुख्याधिकारी दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सावंतवाडी कार्यकारी अभियंता अनामिक चव्हाण यांना घेराव घालत जाब विचारला आणि कठडा दुरुस्ती बाबत निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला जिल्हाध्यक्षा विधिज्ञा रेवती राणे, महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, जिल्हा उद्योग व्यापारी सेल जिल्हाध्यक्षा तथा रत्नागिरी निरीक्षक दर्शना बाबर देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, महिला शहाराध्यक्षा सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, संतोष जोईल, राकेश नेवगी, काशिनाथ दुभाषी, हर्षद बेग आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =