You are currently viewing दहशतवादातून तिसऱ्या महायुद्धाकडे

दहशतवादातून तिसऱ्या महायुद्धाकडे

 

न्यूयॉर्क येथे दोन आलिशान बहुमजली टॉवर होते, ज्यांना वर्ल्ड ट्रेड सेंटर किंवा जागतिक व्यापार केंद्र म्हणतात. ११ सप्टेंबर २००१ला एक विमान आले व पहिल्या टॉवर वर धडक दिली. मी टीव्ही बघत होतो, थोड्या वेळाने अचंबित लोकांच्या समोर दुसऱ्या विमानाने धडक दिली. तिसऱ्या विमानाने वॉशिंग्टन येथील अमेरिकेचे सामर्थ्याचे प्रतीक पेंटॅगॉन म्हणजेच संरक्षण मंत्रालयावर जाऊन धडक दिली. चौथे विमान बहुदा राष्ट्रपतीच्या व्हाईट हाऊस वर धडक देण्यासाठी निघाले होते. त्यातील प्रवाशांनी आतंकवाद्याच्या विरोधात जोरदार संघर्ष केला व पेन्शनवेलिया येथे विमान जमीनदोस्त करण्यात आले. या चारही विमानातील प्रवाशांसकट सर्वांच मारले गेले.

दोन तासात जवळजवळ ३००० लोकांची हत्या झाली. या भीषण हल्ल्याचे सूत्रधार कोण होते? कुठल्या प्रकारे एकाच वेळी मूठभर लोकांनी इतका प्रचंड हल्ला अमेरिकेवर चढवला? याबद्दल जगामध्ये अनेक तर्क वितर्क करण्यात आले. दरवर्षी ११ सप्टेंबरला ८ वाजून ४६ मिनिटांनी पूर्ण अमेरिकेमध्ये स्तब्धता पाळली जाते व जे त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली दिली जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारचा हल्ला अमेरिकेवर पहिल्यांदाच झाला. जगातील अनेक देशावर अनेक हल्ले झाले, पण अमेरिका मुक्त होती. अशा प्रकारचा प्रचंड हल्ला झाल्यावर अमेरिका खडबडून जागी झाली. जगात आतंकवादाचा मोठ्या प्रमाणात वापर अमेरिकन लोकांवर झाला. त्याची जाणीव पहिल्यांदाच अमेरिकेला झाली. तोपर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला आणि अनेक देशांना दहशतवादी हल्ले करण्यासाठी प्रवृत्त केले होते. स्वतः देखील अनेक देशांमध्ये आतंकवाद्यांना पोसत होती. आपल्या विरोधातील सरकारवर बंड करायला प्रवृत्त करत होती.

हा हल्ला आतंकवादी संघटन अलकायदाने केल्याचे समोर आले आहे. ओसामा-बिन-लादेन या हल्ल्याचे सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले. त्याला मारण्यासाठी जगामधील सर्वात मोठी शोध मोहीम सुरू झाली. तो पाकिस्तानच्या मिलिटरी अकादमी एबटाबाद जवळ तळ ठोकून होता. हे पाकिस्तानला माहीत नसणे केवळ अशक्यप्राय होते. उलट पाकिस्ताननेच त्याला अनेक वर्ष लपवले होते आणि त्यांनीच माहिती अमेरिकेला दिली असे म्हटले जाते. अमेरिकन गुप्तचर सैन्याने हल्ला करून त्याला पकडले. त्याला मारले आणि सिमेंट मध्ये गाडून, समुद्रात फेकून दिले. म्हणजे त्याचा खून करून, त्याचे स्मारक कुठे बनू नये म्हणून त्याला नष्ट केले. अशाचप्रकारचे हल्ले भारताने देखील करून हाफिज सय्यद सारख्या खुनी लोकांना नष्ट केले पाहिजे, याची मागणी मी अनेक वर्ष करत आहे.

पुढे जावून चौकशी अंती अमेरिकन गुप्तचर यंत्रणा FBI ने, जाहीर केले की हल्ल्याचा सूत्रधर ओसामा नसून खलील शेख मोहम्मद आहे. तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गुंआतानामो बे तुरुंगात बंद करण्यात आले. या बेकायदेशीर तुरुंगात अनेक लोक बंदिस्त आहेत. अमेरिकन राष्ट्रपती ओबामाने जाहीर केले होते की हे तुरुंग बंद करण्यात येईल. पण अमेरिकन कायद्याचे उल्लंघन करून हे तुरुंग अजून अस्तित्वात आहे. क्युबा हा अमेरिकेचा शत्रु मनाला जातो. क्युबाने स्वतंत्र युद्ध करून अमेरिकेचा पराभव केला. पण अमेरिकेने एक कोपरा आपल्या ताब्यात ठेवला. तिथेच हे तुरुंग आहे. या तुरुंगात खलिल शेख मोहम्मद आणि त्यांचे चार साथीदार आहेत. पहिल्यांदाच या पाच लोकांना तुरुंगामध्ये कोर्टात आणण्यात आले. खलिल शेख मोहम्मद याने ओसामाकडे जाऊन त्याला या योजनेबद्दल माहिती देऊन हल्ला करण्याचा दबाव आणला. हा हल्ला झाला त्यात तीन हजार लोक मारले गेले. त्यांच्या नातेवाईकांना न्याय कधी मिळणार? हे सांगता येत नाही. कारण यामध्ये जी चौकशी झाली ती बरोबर झाली की नाही याच्यावरच वाद आहे. आता २० वर्षे उलटून गेली तरी कोर्टाचे काम कधी होणार आणि कधी या लोकांना शिक्षा होणार यावर काहीच तर्क देता येत नाही. जसे कसाबला लगेच फाशी देण्यात आली तसे कधी होणार ह्याची अमेरीकन जनता वाट बघत आहे.

त्यानंतर लोकांचा संताप शमविण्यासाठी, अमेरिकेने अफगाणिस्तान वर हल्ला केला आणि गेले वीस वर्षे तालिबान बरोबर घनघोर लढाई झाली. गेल्या वर्षी अमेरिका अफगाणिस्तान सोडून पळून गेले. त्यात हजारो लोकांचे प्राण गेले. पण हातात काही मिळाले नाही. आता तालिबानच्या हातात देश सोडून अमेरिका पळून गेली. ज्याने ज्याने, अमेरिकन सैन्याला मदत केली त्यांना मृत्यूच्या दाढेत सोडताना अमेरिकेला जराही लाज वाटलेली नाही. दुसऱ्या देशांना लढायला उसकवायाचे आणि नंतर जे अमेरिकेसाठी लढले त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे, ही अमेरिकेची पद्धत आहे. म्हणून भारताने वेळीच सावध झाले पाहिजे. आज अमेरिका भारताला चीन विरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करत आहे. पण अमेरिका कधीच भारताबरोबर राहणार नाही हा त्याचा इतिहास आहे. १९७१ भारत पाक युद्धात देखील अमेरिकेने भारताला धमकी दिली होती की पाकिस्तान वर हल्ला केला तर अमेरिकन सेना पाकिस्तानच्या मदतीला जाईल. पुढे तसेच झाले पण सुदैवाने रशिया भारताच्या मदतीला आला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे भारतीय सैन्याने केले. त्याची आज पन्नासावी वर्षगाठ आहे. पाकिस्तानी प्रेमाखातर, अफगाणिस्तान मधून पळून जाताना अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवण्याचे काम पाकिस्तानला देण्यात आले आणि भारताला दूर लोटण्यात आले. भारताच्या हितासाठी मी सुरुवातीपासून अमेरिकन मैत्री विरुद्ध भूमिका घेतली आहे.

हल्ल्याच्या वीस वर्षानंतर जगामध्ये प्रचंड बदल आला. युद्ध तर संपले आहे पण जगामध्ये मुसलमानांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात आले आहे. जवळजवळ ४८% अमेरिकन मुसलमानाने म्हटले आहे की त्यांचा कुठल्या ना कुठल्या रूपाने छळ करण्यात आला आहे. मिडिया इंटरनेटच्या वापरामुळे या हल्ल्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. त्यात वंशवाद फोफावला. आज देखील अमेरिकेत मुसलमानाच्या विरोधात एक प्रचंड असा विषारी वैचारिक संघर्ष चालू आहे. पण त्याचबरोबर, काळ्या लोकांविरुद्ध आणि भारतीय लोकांविरुद्ध सुद्धा वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पूर्ण जगामध्ये धार्मिक, जातीय आणि वर्णवादामुळे द्वेषभावना निर्माण केली जात आहे. त्यात आपण देखील गणलो जातो. अनेक भारतीय लोकांना मारण्यात आले.

या विषारी प्रचाराचा बळी मानवता आहे. दुसरी गोष्ट, जगातील सर्व सरकार हे आपल्या नागरिकांवर हेरगिरी करत आहेत. हवेत कुठलेही संभाषण गेलं तरी ते सरकारला कळतं. हा लोकशाहीला प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. इस्रायली अस्त्र पिगॅसस भारतात धुमाकूळ घालत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आतंकवादाच्या नावावर लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. धोक्यात आले आहे. लोकशाहीचा अस्त होतो की काय अशाप्रकारची भीती जगामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. चीन रशिया व अनेक आफ्रिकन, आशियाई देशामध्ये पुरोगामी तत्व लुप्त होत आहेत व हुकूमशाही सर्वाकडे फोफावत आहे. थोडयाच काळात अमेरिकेसकट सर्व देशांमध्ये हुकुमशहा निर्माण होतील आणि लोकशाही लुप्त होईल अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचा पराभव झाल्यानंतर, तो पद सोडायला तयार नव्हता. त्याच्या लोकांनी अमेरिकन संसदेवर कब्जा केला. ते सोडायला तयार नव्हते. खासदारांना लपून पळावे लागले. ह्यावरून दिसते की विरोधकांना शत्रू मानले जायला लागले आहे. लोक ट्रम्प विरोधकांना शोधत होते. हा प्रकार पूर्ण जगाला धोकादायक आहे. त्यातून प्रचंड हिंसा निर्माण होऊन तिसरे महायुद्ध होऊ शकते हे सर्वांनी लक्षात ठेवावे व ते टाळण्यासाठी प्रयत्न करावा.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९

प्रतिक्रिया व्यक्त करा