You are currently viewing रोडरोमिओंचा पोलीस प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा; अन्यथा कायदा हातात घेऊन रोडरोमिओंना धडा शिकवणार – युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर

रोडरोमिओंचा पोलीस प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा; अन्यथा कायदा हातात घेऊन रोडरोमिओंना धडा शिकवणार – युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर

कणकवली राष्ट्रवादी तर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन…

कणकवली

कॉलेज आणि विद्यामंदिर हायस्कूल रोडवर रोडरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. महिला तसेच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थीनींना त्‍यांचा त्रास होत आहे. या रोडरोमिओंचा पोलीस प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा कायदा हातात घेऊन आम्‍ही त्‍या रोडरोमिओंना धडा शिकवू असा इशारा राष्‍ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर यांनी दिला आहे.

श्री.मयेकर यांच्यासह राष्‍ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर आदींनी आज कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले की, कणकवली कॉलेज रोडवर महाविद्यालयातील युवतींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंवर कारवाई करण्याबाबत यापूर्वीही शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले होते. तसेच कॉलेजजवळ शालेय मुली अाणि युवतींची होणारी छेडछाड तसेच या मुद्दयावर होणारे वाद विवाद याबाबतची माहिती दिली होती. अलीकडे रोड रोमिओंचा त्रास पुन्हा सुरू झाला आहे. त्‍याचा पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त करावा अन्यथा आम्‍हाला कायदा हातात घेऊन रोडरोमिओंना धडा शिकवावा लागेल.

दरम्‍यान पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त केला जाईल अशी ग्‍वाही दिल्‍याची माहिती राष्‍ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा