You are currently viewing २८ सप्टेंबरपासून भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना सुरुवात..

२८ सप्टेंबरपासून भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना सुरुवात..

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली मान्यता

 

मुंबई :

 

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी २८ सप्टेंबरपासून सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात १४ सदस्यांची समिती गठण करण्यात आली होती तसेच १६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार एकूण एक वर्ष कालावधीचे ६ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मिळून १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.

या अभ्यासक्रमांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, हार्मोनियम/कीबोर्ड वादन, ध्वनी अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या महाविद्यालयाचे कामकाज व्यवस्थित व उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नेमण्यात आले असून यामध्ये उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, मयुरेश पै तसेच कला संचालक सदस्य असतील. या महाविद्यालयासाठी ग्रंथालय संचालनालयाची कालिना येथील ७ हजार चौरस मिटर जागा कला संचालकांकडे सुपूर्द करण्यात येत आहे.

सध्या तात्पुरत्या स्वरुपात पु. ल. देशपांडे कला अकादमीची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या अध्यापक पदे ही मानधन तत्त्वावर तसेच लिपिक टंकलेखक पदे बाह्य यंत्रणेकडून भरण्यात येतील. याशिवाय यंत्रसामुग्री व साधनसामुग्री देखील खरेदी करण्यात येईल. यासाठी महिन्याला सुमारे १ कोटी ७५ लाख खर्च येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा