You are currently viewing शहर विकास आराखड्याबाबत पुन्हा २८ सप्टेंबरला कणकवलीतील भागधारकांची बैठक…

शहर विकास आराखड्याबाबत पुन्हा २८ सप्टेंबरला कणकवलीतील भागधारकांची बैठक…

आराखडा समितीमध्ये विरोधकांचाही समावेश – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली

शहरातील सुधारीत विकास आराखड्याबाबत मते मांडण्यासाठी कणकवली शहरातील नागरिकांची तथा भागधारकांची बैठक पुन्हा २८ सप्टेंबरला होणार आहे. तर आराखडा समितीमध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही स्थान देणार असल्‍याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली.
कणकवली शहराचा सुधारीत शहर विकास आराखडा तयार केला जात आहे. त्‍याअनुषंगाने आज नगरसेवकांची बैठक नगरपंचायत सभागृहात झाली. यात २८ सप्टेंबरला सुधारीत शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांचे म्‍हणणे ऐकून घेण्यासाठीची बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक व्ही.टी. देसाई, नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, रूपेश नार्वेकर, ॲड.विराज भोसले, संजय कामतेकर, अभिजित मुसळे, अबिद नाईक, नगरसेविका मेघा गांगण, मेघा सावंत, उर्मी जाधव, कविता राणे, माही परुळेकर, मानसी मुंज, प्रतीक्षा सावंत आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरवातीला नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांनी नगररचना सहाय्यक संचालक श्री.देसाई यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. यापूर्वी शहरातील भागधारकांसाठी असलेली बैठक अचानक का बोलावण्यात आली? असा सवाल करत ज्‍यांच्या घरांवर आरक्षणे पडली आहेत ती वगळणार का?, जुन्या आरक्षणांमध्ये फेर बदल हाेणार का?, नव्याने कुठल्‍या भागात कुठली आरक्षणे टाकली जाणार? तसेच ज्‍या जमीन मालकांनी आरक्षण उठविण्याबाबत नोटिस दिली आहे, त्‍या जमिनीवर पुन्हा दुसरी आरक्षणे पडणार का? असे प्रश्‍न उपस्थित केले.
श्री.देसाई यांनी, आम्‍ही आराखडा तयार करून देणार आहोत. त्‍यावर अंतिम निर्णय नगरपंचायत सभागृहानेच घ्यायचा अाहे असे स्पष्‍ट केले. तर मुख्याधिकारी श्री.तावडे यांनी ज्‍या आरक्षणांंबाबत विभागीय आयुक्‍त किंवा उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. तेथेच पूर्वीचे आरक्षण टाकता येणार नाही. उर्वरीत आरक्षणांबाबत शासन नियुक्‍त आराखडा समिती निर्णय घेऊ शकते. मात्र आराखडा तयार होईपर्यंत गुप्तता बाळगली जाते. आराखडा नगरपंचायत सभागृहात सादर केल्‍यानंतर तो सर्व जनतेसाठी खुला होतो असे स्पष्‍ट केले.
शहराचा सुधारीत आराखडा ज्‍या टीमच्या माध्यमातून तयार होत आहे, त्‍या टीमचे प्रमुख असलेले नगर रचनाकार हे कणकवलीवासीयांची फसवणूक करत आहेत. वीस वर्षापूर्वी शहर विकास आराखडा तयार करताना जसे कणकवली वासीयांना अंधारात ठेवण्यात आले. त्‍याच धर्तीवर शहरवासीयांना मत मांडू न देता ८ सप्टेंबरची भागधारकांची बैठक गुंडाळण्यात आली. त्‍यामुळे शहरातील नागरिकांची, शेतकऱ्यांची तथा भागधारकांची बैठक पुन्हा बोलवा. त्‍यामध्ये शहरातील प्रत्‍येकाला आपले म्‍हणणे मांडण्याची संधी द्या अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली.
शहर आराखड्याबाबत जाणून घेण्याचा आणि त्‍यावर मत मांडण्याचा, अभिप्राय देण्याचा अधिकार शहरातील प्रत्‍येक नागरिकाला आहे. पुढील वीस वर्षाचा हा आराखडा असल्‍याने शहरातील आपले म्‍हणणे मांडता यायला हवे. मते नांेदवता यायला हवीत यासाठी आम्‍ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा शहरातील सर्व नागरिकांनी बैठक लावणार आहोत. त्या बैठकीत नागरिकांनी आपले अभिप्राय, सूचना मांडावीत म्‍हणजे त्‍या सूचनांचा शहर विकास आराखडा तयार करताना समावेश करणे शक्‍य होईल असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा