You are currently viewing सावंतवाडीत रुजू पाहतेय का “राडा संस्कृती?”

सावंतवाडीत रुजू पाहतेय का “राडा संस्कृती?”

संपादकीय…

सावंतवाडी हे जिल्ह्यातील शांत आणि सुसंस्कृत लोकांचे शहर म्हणून सर्वानाच ज्ञात आहे. सावंतवाडीत राजकीय राडे झाल्याचे कुणाच्याही ऐकिवात नसेल कारण अनेकवर्षं इथे समाजवादी विचारसरणीच्या लोकांचे राजकीय वर्चस्व होते. त्यानंतरच्या काळात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असे संमिश्र सत्ताकरण राहिलं आहे. परंतु शहरात शांतता होती, जिल्ह्यातील इतर काही शहरांमध्ये असणारी राडा संस्कृती सावंतवाडीला शिवली नव्हती.
काही वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कार्यालयात घुसून राजकीय कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला होता, तेव्हापासून सावंतवाडीत राजकीय राडे सुरू झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ला प्रकरणावरून बबन साळगावकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याला उजाळा मिळाला. साळगावकर यांच्यावर हल्ला कोणी केला होता, पुढे त्यांचे काय झाले हे सावंतवाडीकर जनतेला ज्ञात आहे. परंतु राडा संस्कृती जिथल्या तिथे ठेचली तर असे भ्याड हल्ले भविष्यात होणार नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी हे राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जनतेशी त्यांची जुळलेली नाळ पाहता अल्पावधीतच त्यांनी राजकीय पटलावर आपले नाव कोरले आहे, त्यामुळे त्यांच्यावर झालेला हल्ला कोणत्याही कारणांतून असला तरी राजकीय हल्ले हे केव्हाही निषेधार्ह. सावंतवाडीतील जनता अशा हल्ल्याचे कधीही समर्थन करणार नाही, त्याचे चोख प्रत्युत्तर वेळ आल्यावर देणारच. सावंतवाडीत सुरू झालेल्या राडा संस्कृतीची मुळे सावंतवाडीकर जनतेने सावंतवाडीत रुजू दिली तर भविष्यात सावंतवाडी सुद्धा धगधगत राहील हे मात्र नक्कीच…!

प्रतिक्रिया व्यक्त करा