You are currently viewing सावंतवाडीतील खाऊ गल्ली आणि बोटिंग प्रकल्पाची लवकरच निविदा, महिलांना प्राधान्य – दीपक केसरकर

सावंतवाडीतील खाऊ गल्ली आणि बोटिंग प्रकल्पाची लवकरच निविदा, महिलांना प्राधान्य – दीपक केसरकर

संत गाडगेबाबा भाजी मंडईसाठी १५ ते १६ कोटींचा निधी देणार…

सावंतवाडी

शहरात सुरू करण्यात येणाऱ्या खाऊ गल्लीसह मोती तलावातील बोटिंग प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया आता लवकरात-लवकर सुरू करण्यात येणार आहे. विशेषतः यामध्ये महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान शहरात उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईसाठी १५ ते १६ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत उभी राहणार असून ग्राउंड फ्लोअरला पार्किंगची व्यवस्था, तर पहिल्या मजल्यावर भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सावंतवाडीतील विविध विकास कामांची भूमिपूजन आज श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजन लोबो, परिमल नाईक, राजू बेग, शुभांगी सुकी, दिपाली भालेकर, दिपाली सावंत, नीता कविटकर, अजय गोंदावळे, अमेय तेंडुलकर, दिलीप भालेकर, भारती मोरे, अमित परब, आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

श्री. केसरकर पुढे म्हणाले, मागच्या काही काळात वेळेअभावी या ठिकाणी माझे दुर्लक्ष झाले होते. मात्र आता मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पुन्हा या ठिकाणी वेळ देणार आहे. त्यासाठी आठवड्यातून एकदा मी माझ्या मतदारसंघाचा दौरा करून विविध समस्या जाणून घेणार आहे. आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच शहरात अनेक सुविधा आणण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने नरेंद्र डोंगर परिसरात योगा सेंटर सुरू करण्याबरोबरच शहरात गंजीफा म्युझियम, मोती तलवार बोटिंग, खाऊ गल्ली, असे विविध प्रकल्प या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहेत. त्याचा फायदा पर्यटन वाढीबरोबरच रोजगार निर्मितीसाठी सुद्धा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सावंतवाडी शहरातील लाखे वस्तीतील अंतर्गत रस्त्याचे, जिमखाना क्रीडा संकुलातील बॅटमिंटन कोर्ट आणि समाज मंदिर परिसरातील रस्त्या लगत असलेल्या घरांसमोर स्पेअर ब्लॉक बसविणे आदी कामांची श्री. केसरकर यांनी भूमिपूजन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 8 =