You are currently viewing पितृपंधरवडा समज… गैरसमज
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

पितृपंधरवडा समज… गैरसमज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल… शब्दांकुर समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

*पितृपंधरवडा समज… गैरसमज*

पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष…! यास महालय पक्ष, श्राद्धपक्ष, पितृपंधरवडा असेही म्हणतात. हे पंधरा दिवस म्हणजे कुटुंबातील पूर्वजांच्या स्मरणाचे, तर्पणाचे दिवस…! ज्या पूर्वजांनी भावी पिढीच्या कल्याणासाठी आपले रक्त आटविले, अपार कष्ट घेतले त्यांचे स्मरण करून पिंडदान, अन्नदान, तर्पण आदी दानधर्म करणे म्हणजे श्राद्ध…! तर्पण करणे म्हणजे तृप्त, संतुष्ट करणे…ज्यांच्यामुळे आपण या जगात जन्म घेतला त्यांच्या प्रति कृतज्ञ होणे…!
श्राद्ध म्हणजे *”श्रद्धया यत क्रियते तत्!!”* श्रद्धेने जी अंजली अर्पण करण्यात येते त्याला श्राद्ध म्हणतात. इथे *श्रद्धेने* हा शब्द मुद्दामच वापरण्यात आला आहे कारण हिंदू धर्मातील अनेक रूढी परंपरा ज्या पूर्वजांनी सुरू केलेल्या आहेत, आपल्या वाढवडिलांनी जोपासल्या आहेत त्यांचा मूळ उद्देश आणि कारण न समजून घेता अर्धवट ज्ञानाच्या आधारे काही (अति)शहाणे त्यांना *अंधश्रद्धा* म्हणण्याचे कर्म देखील आपलेच हिंदू करतात हे सुद्धा सत्यच…! श्राद्ध ही अंधश्रद्धा नसून मनातील पितरांप्रतिच्या भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांची कबुली देऊन त्याचं प्रायश्चित्त घेण्याचा एक प्रयत्न असेही म्हणता येईल. महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण करून पूजा करण्याची पूर्वांम्पार चालत आलेली प्रथा आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे, त्यांना समाधान मिळेल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे. मानवी जीवन हे विविध ऋण मुक्तीसाठीच आहे आणि भारत हा असा देश आहे जिथे रूढी, परंपरा, आध्यात्मिकता, संस्कृती जपली जाते म्हणून जगात भारताचे एक वेगळे स्थान आहे.
पितृपक्षात पितर कावळ्यांच्या रुपात पृथ्वीवर आपल्याकडे येतात असे मानले जाते, त्यामुळे हा काळ आत्मिक रूपाने त्यांच्याशी जोडणारा काळ असतो म्हणून या काळात शुभकार्य वर्ज्य मानतात. परंतु म्हणून पितृपक्षात कोणतीही शुभकार्ये, वाहन, गृह खरेदी वगैरे करू नये असे म्हटले जाते परंतु असे कोणीही सांगितलेले नाही… मानने न मानने ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु हा काळ शुभकार्यासाठी अशुभ आहे असे म्हणणे योग्य नव्हे. ज्या काळात पितरं आपल्याकडे येतात तो काळ अशुभ कसा काय असू शकतो? परंतु एक मात्र उल्लेख प्रकर्षाने करावासा वाटतो तो म्हणजे….जिवंतपणी आपल्या आई वडिलांना दोनवेळ पोटभर अन्न न घालणाऱ्यांनी, आई-बापाला उरलंसुरलं घालून स्वतः हॉटेलमधून पंचपक्वान्न आणून खाणाऱ्यांनी, जीवनासाठी सुद्धा तीळ तीळ तडफडवणाऱ्यांनी, स्वतः बंगल्यात मजेत राहून आई बापाला वृद्धाश्रमात ठेवणाऱ्यांनी मात्र श्राद्ध विधी करूच नयेत… कारण जे आपण दुसऱ्यांच्या पुढ्यात वाढून ठेवतो तेच भविष्यात आपल्या पुढ्यात पडते हे ठरलेलंच…!
प्राचीन काळात अश्विन शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे, त्यामुळे सरत्या वर्षातील शेवटचे पंधरा दिवस पितरांसाठी राखून ठेवले जात असत. हिंदू धर्मातील सण सोहळे उत्सव हे शास्त्रीय दृष्ट्या विचार केला असता निसर्गाशी जोडलेले आहेत. श्रावण शुद्ध सात्विक महिना पाळला जातो तो पोटाचे विकार, उष्णतेचे विकार टाळण्यासाठीच… घरोघरी, चौकाचौकात गणेशाचे पूजन केले जाते ते एकता, बंधुत्व टिकविण्यासाठीच… महालय श्राद्ध केले जाते ते भिक्षुकी मागणाऱ्या, गोरगरीब लोकांच्या पोटात चार सुखाचे घास जाण्यासाठीच….या सणांमधून त्या त्या दिवसात नैसर्गिकरित्या रुजणाऱ्या भाज्या केल्या जातात, त्यांचे सेवन झाल्याने अनेक विकार दूर होतात त्यामुळे आरोग्याचा समतोल राखला जातो, निसर्गाचं महत्त्व सर्वदूर समजतं… दूरदेशी असलेले नातेवाईक एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते…नाती सुदृढ बनतात. अन्यथा अन्न तर प्रत्येकाच्या घरात शिजतं… पण एकदुसऱ्याच्या घरी गेल्याने भाईचारा वाढतो…!
शास्त्रीयदृष्ट्या आणखी एक विचार केला असता, आपल्या अंगात, आपल्या रक्तात आपल्या पूर्वजांचे म्हणजे आज्या, पणज्याचे गुण दिसतात असे आपण जुन्या जाणत्या लोकांच्या तोंडून ऐकतो. त्यांचे रक्त आणि आपले रक्त एकच होते, त्यामुळे त्यांचे जीनस, पेशी, क्रोमोझोम्स आपल्या शरीरात असल्याचे आपल्या गुण, स्वभाव आदींवरून दिसून येतं. काहीवेळा तर आपल्यावर किंवा घरावर अचानक आलेलं संकट दूर होताच…आपण बोलून जातो, “अरे ही तर पूर्वजांची पुण्याई” मग ही पुण्याई आपल्या पदरी पाडणाऱ्यांप्रति आपण नतमस्तक झालंच पाहिजे. रात्री अपरात्री काळोखात बाहेर पडताना किर्द अंधारात मनात एकप्रकारची भीती असते…भूत पिशाच्च तर दिसणार नाही ना? अशी शंका येते…जर अशाप्रकारचे भीती मनात उत्पन्न होत असेल तर पितरं येत नाहीत किंवा श्राद्ध म्हणजे अंधश्रद्धा असे आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? जोपर्यंत जर तर ह्या संकल्पना मनात ठाण मांडून आहेत तोपर्यंत श्रद्धा अंधश्रद्धा होणार नाहीत…!
पाश्चात्य चष्म्यातून हिंदू धर्मातील रूढी पाहणारे कधीच स्वतःचं स्वतंत्र मत मांडू शकत नाहीत. ब्राह्मणांना दानधर्म केल्याने, कावळ्याला अन्न घातल्याने पितरांना पोचणार नाही असा तर्क काढला जातो… नसेलही पोचत…परंतु जिथे ग्लोबलायझेशन झालंय, जग प्रगतीपथावर आहे तिथे एका बटनावर मोबाईल मध्ये आकडा टाईप केला असता आपल्या देशातून परदेशातील खात्यात पैसे जातात, मुंबईतून माणूस हातातील छोट्याशा मोबाईल वरून गावातील भावाशी, आई बापाशी बोलू शकतो…तर शुद्ध अंतःकरणाने, भक्तिभावाने केलेला दानधर्म, अन्नदान पितरांपर्यंत पोचणारच नाही असे ठामपणे कसे काय म्हणू शकतो? आजकाल आपलेच लोक परदेशातून आलेले मदर्स डे, फादर्स दे, अगदी धुमधडाक्यात रात्री १२.०० वाजता शुभसंदेश पाठवून साजरे करतात…सुप्रभात शुभरात्री ऐवजी गुड मॉर्निंग आणि नाईट मध्ये आनंद मानतात…त्यांना आपल्या कुटुंबातील पूर्वजांसाठी पितृपक्ष म्हटला जाणारा पंधरवडा पितृदिवस म्हणून मानायला काय हरकत आहे….?
….शेवटी जबरदस्ती कोणाचीच कोणावरही नसते… ज्याचे त्याचे स्वातंत्र्य…आणि ज्याचा त्याचा निर्णय…. ज्याचे त्याचे समज… गैरसमज…!!

©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 5 =