You are currently viewing सावंतवाडी बाजारपेठेतील वाघ पाणंद इथे नवीन मटक्याच्या स्टॉल उभारण्याची तयारी सुरू

सावंतवाडी बाजारपेठेतील वाघ पाणंद इथे नवीन मटक्याच्या स्टॉल उभारण्याची तयारी सुरू

सावंतवाडी शहराला मटकाकेंद्र बनविणार काय?

सावंतवाडीत गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत जागोजागी मटक्याचे स्टॉल उभे राहिले आहेत. भर बाजारपेठा असो वा गल्लीबोल, मेनरोड असो वा तळ्याच्या काठ…हॉस्पिटल परिसर असो वा मासळी बाजार एरिया जिकडे पहावे तिकडे केवळ मटक्याचे स्टॉल उभे आहेत. भाजी मार्केटमध्ये बाहेरील स्टॉल उठवून त्यांना पत्र्याचे स्टॉल उभे करून दिले तिथेही मटकाच….? म्हणजे आता आयुष्य सुखात जगायचे असेल तर मटक्याशिवाय पर्याय नाही असे फलक शहरात झळकले तर आश्चर्य वाटण्यासारखे नक्कीच नाही….!
सावंतवाडी बाजारपेठेतील वाघ पाणंद ही वर्दळीच्या जागा…एका शाळेच्या इमारतीची मागील बाजू…म्हणजे जिथे ज्ञानदानाचे पवित्र काम चालते तिथे सुदधा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मटक्याच्या स्टॉल उभारणीचे काम प्रगतीपथावर असून सावंतवाडी नगरपालिका मात्र निद्रावस्थेत आहे. उद्या तिथे फिरणारी कुशनची खुर्ची घालून रिकामी पुडे, बिस्किटे, अगरबत्ती आदी फुटकळ सामान विक्रीच्या नावावर लावून मटका किंग बसणार आणि लोकांच्या जीवावर मजा मारणार…गोरगरीब मात्र पैसे येण्याच्या आशेने त्यात मरणार. सावंतवाडी नगरपालिकेवर प्रशासक असल्याने कठोर कारवाई होणे अपेक्षित होते, परंतु शहरात राजरोसपणे उभारले जाणारे मटका स्टॉल पाहिले असता, *”दाल में कुछ काला हैं!“* असा संशय बळावत चालला आहे.
शहरात जिथे जावे तिथे केवळ मटक्याचा एकच धंदा तेजीत सुरू असल्याचे चित्र उभे राहिल्याने भविष्यात शहराचे नाव मटक्यासाठी प्रसिद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे. सावंतवाडी शहरातून पो.नि. कोरे यांची बदली होऊन पो.नि. फुलचंद मेंगडे यांची नियुक्ती झाल्याने लोकांच्या त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत, परंतु शहरात राजरोसपणे सुरु असलेल्या मटाक्यांच्या धंद्यामुळे सारेच आलबेल दिसत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा