You are currently viewing एअर अलायन्सचा प्रवास कोकणवासीयांसाठी ठरतोय …

एअर अलायन्सचा प्रवास कोकणवासीयांसाठी ठरतोय …

“देवाक काळजी !”

सिंधुदुर्ग विमानतळाचे भवितव्य काय?

आज माझ्या ११० व्या विमान प्रवासाचा योग होता. गेल्या आठवड्यात गणपती विसर्जन करुन काही कामासाठी मुंबईला आलो होतो. आज परत मालवणला जायचे होते – अनायासे विमानाचं तिकिट मिळालं आणि तेही किमान दरात. पण कधी नाय तो अलायंस एअर चा कोकणी स्वभाव अनुभवाला आला. ह्या तिकिटाला वेब – चेक इन किंवा सेल्फ चेक इन प्रकार नसल्याने काऊंटरवर जाणे कंपल्सरी. तिकडे गेल्यावर बाईने गुड न्युज म्हणून बोर्डिंग पास आणि बॅड न्युज म्हणून “फ्लाईट उशीरा किंवा कॅन्सल” होऊ शकते हां……असा “मैने तो पेहलेही बोला था” सारखा स्पष्ट इशारा दिला. पण आता आपण करणार तरी काय ? देवाक काळजी म्हणून सिक्युरीटी चेकिंगचा विधी (काढा – पुन्हा परिधान करा) पार पाडून थेट बोर्डिगचा गेट गाठला.

लहानपणी मुंबई गोवा रस्ता फार जोखमीचा होता. एकावेळी दोनच गाड्या चालु शकतील एवढी जागा आणि भयंकर घाट. भरपूर अपघात बघितले, भरपूर अपघातांबधद्दल पेपरमध्ये वाचले आणि २-३ अपघात स्वत:देखील अनुभवले; पण गावी जाणं कधी कमी झालं नाही. कारण आपलं क्लियर आहे…….देवाक काळजी !! पुढे ट्रेनची सोय झाली. अगदी ट्रेनच्या दारात बसुन केलेल्या प्रवासापासून पुढे जनरल , थ्री टायर , टु टायर (आम्ही म्हणतव टायर; तुका काय ? ) , अगदी फर्स्ट क्लास केबिनपर्यंत टप्प्याटप्प्याने माझी उत्क्रांती झाली. पावसात दरड कोसळली तर ट्रेन भरपूर उशीरा पोहोचते……पण ती सगळी काळजी देवालाच ना !! त्यामुळे आतापण काय होईत ता देवाक माहिती. धावपट्टी नविन आहे, ती व विमान दोन्ही लहान आहेत; अशा गोष्टींना तळकोकणातला माणूस भीक घालत नाही. आपलं सगळं खातं देवाच्या हाती.

११ वाजताचा बोंर्डिग टाईम – एअर अलायंसचा एकही स्टाफ दिसेना – मला लक्षात आलं नक्की लोचा आहे. तरीही आपली कोकणी माणसं काय कमी नाय हा !! अलायंसचो स्टाफ नाय तर काय झाला ? इंडिगोच्या स्टाफला परत परत विचारून गावकर्यांनी वैताग आणला. ११:३० ला अलायंसची दोन माणसं आली. एक पन्नाशीच्या अलिकडचा, मिशीवाला, आधीच वैतागलेला माणूस आणि दुसरी जरा विशीच्या पलिकडची, सुंदर, हसतमुख मुलगी. अगदी नाट्यमय प्रकारासाठी नेमलेली बॅड कॅाप – गुड कॅाप जोडी.

१२ वाजेपर्यंत ह्यांना काहिच आदेश नाहीत. फलकावर विमान “वेळेवर” दाखवत होतं. तरीही कोकणी माणूस ॲाप्टिमिस्टीक आणि अलायंस कर्मचार्यांचे हावभाव “देवाक काळजी”. जर अजुनही विमानाची शक्यता होती; तर इंडिगोसारख्या वाट बघत बसलेल्या एअर होस्टेस किंवा वैमानिकही आमच्या बाजुला दिसेनात. शेवटी अलायंसच्या एका फ्लाईट इंजिनियरनेच पुढे होऊन चौकशी केली ; तर कळलं फ्लाईट कॅन्सल. बॅड कॅाप फोनवर रागारागत बोलत होता – “मै कुछ नही बोलता ; सबको आपकेपास भेजता हूं.”; असं म्हणून त्याने आम्हाला गुड कॅापकडे सुपुर्द केलं. “कशी नशिबाने थट्टा आज मांडली” असा विचार करत आम्ही फ्लाईटचा विषय सोडून त्या तरुण सुंदरीच्या मागेमागे चालु लागलो.

सिक्युरिटी बेरीयर क्रोस करुन परत जाताना नाव नोंदणी व तिकिटावर कॅन्सलचा स्टॅम्प मारायचा असतो. तिकडे बाई चक्क आमच्यावर वैतागायला लागलीं. “रांगेत उभे रहा आधी” – मी म्हटलं “अगं बाई तु का वैतागतेस ? वैतागायला तर आम्ही हवं”. माझा चढलेला पारा बघुन ती खुदकन हसली आणि म्हणाली “सर माझं काय…..नेहमीचच आहे हे”. त्या मुलीचा स्क्रू ढिला असल्याचं माझ्या लक्षात आलं पण तो टाईट करायला आपल्याकडे वेळ नव्हता.

पुढे थेट एअरपोर्टच्या बाहेर पडायला गेलो ; तर पोलिसांनी एअरलाईन कंपनीकडून नोंदणी व एक्सिट स्टॅम्प मारुन आणायला सांगितला. अलायंसच्या काऊंटरवर गेलो; तर त्यांनी स्टाफ कमी म्हणून एअर इंडियाच्या काऊंटरवर जायला सांगितलं. एअर इंडियावाल्यांनी आधी नाही आणि चढता पारा बघून ठिक आहे सांगितलं. एअर इंडियाची मुलगी बाहेरपर्यंत सोडायला आली. तिचे मी आभार मानले. तेव्हा माझे “सहप्रवासी जे प्रवास करु शकले नाहीत” ते जत्रेत गरम भजी शोधत असल्यासारखे इकडेतिकडे फिरत होते. मी त्या मुलीला म्हणालो “अगं अलायंसवाल्यांनी नीट सगळ्यांना मार्गदर्शन करायला हवं होतं ना ?” ती म्हणाली “अहो सर ती कशी करतील ? कारण ती वेडी लोकं आहेत आणि त्यांना काहीही काम करता येत नाही”. थॅनोसने चुटकी वाजवून अर्ध जग नष्ट करावं; तसं तिने माझी शंका व राग फटकन नष्ट केला.

तर अशाप्रकारे “देवाक काळजी” ह्या कोकणी बाण्याचा संसर्ग अख्ख्या एअरलाईन कंपनीला झालेला आहे. तो योग्यकी अयोग्य तो ज्यांचा त्याने ठरवावे. मोदीजी पण तरुण वयात देवगडला रहायला होते – जनरल नॅालेज म्हणून सांगतो.😜 शेवटी आज रात्रीच्या बसचं तिकिट काढलेलं आहे – शेवटी काय – देवाक काळजी !!

डॉ.सुनील परब…

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 10 =