You are currently viewing फोंडाघाट येथे शिक्षक दिन आणि निवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न

फोंडाघाट येथे शिक्षक दिन आणि निवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न

फोंडाघाट :

एकीकडे आपला देश सार्वभौमत्वकडे वाटचाल करत असताना, संस्कारक्षम पिढी तयार होणे आवश्यक आहे. तरच त्याला अर्थ प्राप्त होईल. आजच्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित आहे. साने गुरुजी डॉ. राधाकृष्णन यांचे, विद्यार्थी दशेपासून शिक्षकी पेशापर्यंतचा प्रवास आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे. त्या दृष्टीने निवृत्त शिक्षकांचा सत्कार व जिल्ह्यात आपल्या गावातील शिक्षक दिनाची संकल्पना ऊर्जा देणारी आहे, असे उद्गार माजी सभापती सौ. सुजाता हळदीवे – राणे यांनी काढले.

स्व. बापू नेरूरकर यांनी सुरू केलेला फोंडाघाट मधील शिक्षक दिन आणि निवृत्त शिक्षकांचा सत्कार आणि या उपक्रमाचा वारसा चालवणारे त्यांचे पुत्र संजय यांच्या कार्यक्रम सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच संतोष आग्रे,बाळासाहेब डोरले, राजू पटेल, शिवाजी पवार, कानडे गुरुजी, दिलीप पारकर, रंजन नेरूरकर, संजय सावंत, अनिल बांदिवडेकर, पारकरसर, चेतन नेरूरकर, फोंडेकर गुरुजी, अजित नाडकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलनाने व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. गावातील शिक्षिका वैभवी दिनेश फोंडेकर यांचा सत्कार ग्रामस्थांचे वतीने सरपंच संतोष आगरे आणि अजित नाडकर्णी यांनी भेटवस्तू देऊन केला. यावेळी साने गुरुजी आणि डॉक्टर राधाकृष्णन यांचे सह हा उपक्रम स्वर्गीय बापू नेरूरकर यांचे विषयी आणि आजच्या शिक्षण प्रणाली बद्दल, उपस्थितांमधून कानडेगुरुजी, राजू पटेल, दिलीप पारकर यांनी आपले विचार मांडले. निवृत्त शिक्षिका श्रीमती कदम यांनी, हा कौटुंबिक सत्कार आपल्याला भावी जीवनात प्रेरणा देईल असे सांगून आभार व्यक्त केले. अध्यक्ष संतोष आग्रे यांनी संजय नेरुरकर यांच्या आयोजनाचे कौतुक करून हा उपक्रम सदैव सुरू राहावा त्यासाठी सहकार्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत, आभारप्रदर्शन आणि सूत्रसंचालन सुंदर पारकर यांनी केले. परिसरातील शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा