You are currently viewing सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणाऱ्या घाट मार्गाचा प्रश्न तात्काळ सोडवा – पाटगाव ग्रामस्थांची मागणी

सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणाऱ्या घाट मार्गाचा प्रश्न तात्काळ सोडवा – पाटगाव ग्रामस्थांची मागणी

शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांना निवेदन सादर

सावंतवाडी

कोल्हापूर-सिंधुदुर्गला या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंजिवडे-पाटगाव घाटमार्गाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा अशी मागणी पाटगाव (जि.कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. याबाबतचे सह्यांचे निवेदनही त्यांना देण्यात आले. केसरकर हे पाटगाव येथे आले असता सरपंच विलास देसाई, नंदकुमार ठाकूर यांच्यासह अजिंक्य ग्रुप कला क्रिडा मंडळाने स्वागत केले. त्यानंतर त्यांनी भद्रकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच सार्वजनिक गणपती बरोबरच घरगुती गणपतीचेही दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी निवेदन दिले. तसेच घाटमार्गाबाबत चर्चा केली. आंजिवडे घाटमार्ग झाला तर पाटगावचा पर्यटनदृष्ट्या विकास होईल. पाटगाव व आंजिवडे पासून काही अंतरच घाटमार्ग आहे. हा अत्यंत कमी घाटमार्ग असल्याने शासनाला कमीत कमी खर्चात मार्ग करता येईल, शासनाचा निधीही कमी लागेल आणि महत्वाचे म्हणजे दोन्ही बाजूचा विकास होणार आहे, असे ग्रामस्थांकडुन सांगण्यात आले व तसे निवेदनही दिले. यावर केसरकर यांनी घाटमार्गा बाबत सखोल माहिती घेतो. मी यापूर्वी मार्गाच्या सर्व्हे साठी निधी दिला आहे. तो सर्व्हे अहवाल आला असेल त्यानंतर अधिकाऱ्यां समवेत प्रत्यक्ष पाहाणी करूया हा घाटमार्ग झाला पाहिजे. यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. निधीची कुठेही कमतरता येणार नाही. हा घाटमार्ग प्रश्न मार्गी लावू, असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले. माझे आणि पाटगावचे जवळचे नाते असून भद्रकाली देवी आजोळची देवी आहे. त्या निमित्ताने इथे येणे होत आहे. घाटमार्गाचा प्रश्न सोडवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी सरपंच विलास देसाई, उपसरपंच महेश पिळणकर, माजी सरपंच नंदकुमार ठाकूर, संजय पिळणकर, संतोष पिळणकर, प्रमोद तेंडोलकर, प्रितम देसाई, वसंत देसाई, शरद पाळेकर, रमेश केसरकर, सचिन कोठावळे, यतिन पिळणकर, सुहास केसरकर, अमित वर्दम, सुजित पिळणकर, उत्तम पिळणकर, उमेश पिळणकर, विशाल देसाई, अभय पिळणकर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 9 =