You are currently viewing व्यक्तिविशेष

व्यक्तिविशेष

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका, कवयित्री सौ.कल्पना गवरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व…*

*व्यक्तिविशेष…*

साकव्य सदस्या माजी प्राचार्य आर.व्ही. नेरुरकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज डोंबिवली, योग शिक्षिका, लेखिका, कवयित्री, सूत्रसंचालक्, निवेदिका, दिग्दर्शक, अभिनेत्री, पप्पेटीयर, RJ(Nottingham, UK) असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ. कल्पना गवरे…. शाळा शिक्षिका, प्राचार्या पासून सुरू झालेला सौ.कल्पना गवरे यांचा प्रवास अनेक क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत अविरत सुरू आहे. सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र (CCRT) नवी दिल्लीचे त्यांना सदस्यत्व प्राप्त आहे. “भावना” हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
लेखन हा छंद म्हणून जोपासत विविध मासिक, वृत्तपत्रांतून त्यांचे काव्यलेखन, सामाजिक, शैक्षणिक विषयांवर अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. दूरदर्शन वरील “लेखक आपल्या भेटीस” या कार्यक्रमात प्रा.डॉ.राम कुलकर्णी, प्रा.श्याम तारे, श्री.संजय सोनवणे, प्रा.शुक्राचार्य गायकवाड आदी मान्यवर लेखकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. दूरदर्शन वरील “किलबिल” सदरात श्री.भरत जोशी व सौ.चित्ते- खानोलकर यांची मुलाखत घेतली आहे. नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनयात देखील त्यांनी आपली छाप पाडली आहे.
“आणि राघू बोलू लागला” हे त्यांचे नाटक दूरदर्शनवर सादर झाले आहे. विविध पथनाट्य, व नाटिका यांचे लेखन, दिग्दर्शन व सादरीकरण केले आहे.
शैक्षणिक व इतर विविध संस्थांमध्ये वेगवेगळे कथाकथनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. पर्यावरण संरक्षण, भारतीय संस्कृती व इतिहास, व विविध विज्ञान संबंधीच्या विषयांवर स्लाईड शो सादर केले असून छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन देखील केले. रोटरी क्लब डोंबिवलीचा शिक्षक पुरस्कार, रुस्तम इराणी फौंडेशन, कलासागर, करूया आदी मान्यवर संस्थांचे त्यांना पुरस्कार प्राप्त झाले असून लंडन येथे त्यांना पपेट्री अवॉर्ड मिळाला आहे.
सौ. कल्पना गवरे यांनी भारतात 150, लंडनमध्ये 16 पप्पेट शो केले असून भारतात 23, लंडनमध्ये 3, थायलंड 2, आणि बाली मध्ये 1 कार्यशाळा घेतली आहे, त्याचबरोबर त्यांनी 125 स्लाईड शो केले आहेत. साकव्य समूहासहित इतरही समूहांवरील साहित्यिकांच्या काव्यरचनांना चाल लावून गायन केल्याने अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा