You are currently viewing कोविड 19 मुळे विधवा झालेल्या महिलांसाठी गुरुवारी सर्व तालुक्यात ‘शिबीर एक लाभ अनेक’ उपक्रम

कोविड 19 मुळे विधवा झालेल्या महिलांसाठी गुरुवारी सर्व तालुक्यात ‘शिबीर एक लाभ अनेक’ उपक्रम

तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी शिबीर यशस्वी करावे –दत्तात्रय भडकवाड

सिंधुदुर्गनगरी

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे एकल/विधवा झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य योजनेंतर्गत ‘जिल्ह्यात सर्व तालुक्यात एकाच वेळी एकाच दिवशी शिबीर एक लाभ अनेक’ हा उपक्रम होत आहे. गुरुवार 25 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालयात होणाऱ्या या शिबीरात लाभार्थ्यांना लाभ देऊन तहसिलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी यशस्वी करावे अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केली.

            जिल्हा कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. याबैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक व्ही.डी. कदम, बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड अरुण पणदूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) महेश धोत्रे, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) मुश्ताक शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, चाईल लाईनचे प्रकल्प समन्वयक प्रियांका घाडी आदी उपस्थित होते. या बैठकीला तहसिलदार,  गटविकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक करुन सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने तालुका निहाय एकूण विधवांची संख्या, दिव्यांग, पात्र लाभार्थी, लाभ दिलेले आणि प्रलंबित याबाबत सविस्तर माहिती दिली.

            निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड म्हणाले, जिल्ह्यातील सर्व विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात एकाच दिवशी तहसिलदार कार्यालय याठिकाणी गुरुवारी 25 ऑगस्ट रोजी शिबीर एक लाभ अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत होणाऱ्या या शिबिरात दोन योजनांकरिता एक या प्रमाणे टेबलची व्यवस्था करण्यात यावी. आपापल्या तालुक्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्याबाबत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता त्यांच्याकडून करुन घ्यावी. त्यासंदर्भात प्रचार प्रसिद्धी करावी आणि लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावा. एकाही लाभापासून लाभार्थी वंचित राहणार नाही याबाबत सर्वांनी प्रयत्न करावेत. एखाद्यावेळी कागदपत्रांची पुर्तता त्यांच्याकडून होत नसल्यास संबंधित यंत्रणेकडून करुन घ्यावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा. हे शिबीर 100 टक्के यशस्वी करावे, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा