You are currently viewing काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आणि माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत समर्थकांमध्ये दिलजमाई…?

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आणि माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत समर्थकांमध्ये दिलजमाई…?

पर्यटनस्थळी एकत्र आल्याचे फोटो व्हायरल.

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमध्ये नारायण राणे यांच्या पक्षत्यागा नंतर गेली काही वर्षे वाद सुरू होते. विकास सावंत हे अध्यक्ष असताना त्यांचे समर्थक पक्षाच्या विविध पदांवर कार्यरत होते, परंतु काँग्रेसला मात्र जिल्ह्यात “अच्छे दिन” येत नव्हते, पक्षांतर्गत वादांमुळे निवडणुकांमध्येही अपयशच येत होते. जिल्ह्यात पक्षाची होत असलेली वाताहात पाहता वरिष्ठ पातळीवर घडामोडी होऊन चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. परंतु बाळा गावडे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी निर्माण झाली होती.

विकास सावंत समर्थक कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत यांनी तर बाळा गावडे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर उघडउघड बंड पुकारले होते. बाळा गावडे यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करताना कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र उर्फ एम एम सावंत यांची तालुकाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून वर्दी लावली होती. महेंद्र सावंत यांनी हा अपमान वाटल्याने मिडियामधून सातत्याने त्यांनी बाळा गावडे यांची बदनामी सुरू ठेवली व बाळा गावडे हे अधिकृत जिल्हाध्यक्ष नाहीत हे लवकरच समजेल अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सर्वकाही आलबेल वाटत असतानाही अंतर्गत धुसफूस सुरूच होती. बाळा गावडे यांनी कोणाच्याही टीकटिपण्णी कडे लक्ष न देता पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि प्रभारी वरून जिल्हाध्यक्ष म्हणून कायमस्वरूपी त्यांची निवड जाहीर झाली.
पर्यटन स्थळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आणि महेंद्र सावंत यांचे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते इर्शाद शेख यांच्या बरोबरचे एकत्रित फोटो व्हायरल झाले आणि जिल्हाध्यक्ष आणि महेंद्र सावंत यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र समोर आले. व्हायरल झालेल्या फोटोत काँग्रेसचे निष्ठावंत विलास गावडे व काँग्रेसचे सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर यांचेही फोटो आहेत. परंतु या दोघांचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्यासमवेत फोटो नाहीत. रवींद्र म्हापसेकर हे विकास सावंत यांचे कट्टर समर्थक, त्यामुळे विकास सावंत यांनी मर्जी राखण्यासाठी तर रवींद्र म्हापसेकर यांनी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्यासोबत फोटो घेतला नाही का? असा प्रश्न उभा राहिला आहे.
एकंदरीत जिल्हा काँग्रेसच्या आजी माजी कार्यकर्त्यांमध्ये होत असलेली दिलजमाई जिल्हा काँग्रेसच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.. आजच्या या भेटीनंतर अशीच दिलजमाई पक्षवाढीसाठी राहते की नाही हे मात्र येत्या काळात दिसून येईलच…परंतु हे ही नसे थोडके…

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 13 =