You are currently viewing नाम. रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी सावंतवाडीतील भाजपा कार्यकर्त्यांचे दोन वेगवेगळे गट

नाम. रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी सावंतवाडीतील भाजपा कार्यकर्त्यांचे दोन वेगवेगळे गट

सावंतवाडी भाजपामध्ये जसं दिसतं तसं नाही?

सावंतवाडी नगर परिषदेवर आमदार नितेश राणे आणि नामदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाची सत्ता आली होती. परंतु सावंतवाडी नगरपालिकेवर सत्ता आल्यानंतर पहिले काही दिवस वगळता नगरपालिका पदाधिकाऱ्यांमध्ये सारं काही आलबेल नसल्याचेच समोर येत होते. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या विचारांशी विचार जुळत नसल्याने माझी आरोग्य सभापती विधीज्ञ परिमल नाईक, माजी आरोग्य सभापती नगरसेवक सुधीर आडीवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक यांचा वेगळा गट झाल्याचे अनेक वेळा दिसून येत होते.
मुंबईतील डोंबिवली इथून विधानसभेवर निवडून गेलेले नामदार रवींद्र चव्हाण हे भाजपाची सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत असतात. सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे त्यांचा फार्म हाऊस असून बऱ्याचदा तिथेच त्यांचा निवास असतो. सावंतवाडी शहरातील भाजपचे पदाधिकारी माजी नगराध्यक्ष, व इतर माजी नगरसेवक, नामदार रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी व कोकणातील रस्ते सुधारण्याबाबत निवेदन देण्यासाठी दोन वेगवेगळ्या गटाने त्यांची भेट घेत निवेदन दिले. सर्वप्रथम पंचायत समितीचे माजी उपसभापती कोलगाव येथील महेश सारंग नामदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत माजी आरोग्य सभापती व माजी नगरसेवक विधीज्ञ परिमल नाईक, माजी नगरसेवक व आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक इत्यादी होते. दुसरा गट म्हणजे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी देखील नामदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांसंदर्भात निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदवळे, विधीज्ञ अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर इत्यादी भाजपा पदाधिकारी होते.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी नामदार दीपक केसरकर यांच्या अधिपत्याखाली असलेली सावंतवाडी नगरपरिषद भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे खेचून घेत सत्ता मिळवली होती. ही सत्ता मिळवताना आमदार नितेश राणे हे सावंतवाडी येथे ठाण मांडून बसले होते, तर नामदार रवींद्र चव्हाण हे पडद्यामागून मुख्य भूमिकेत वावरत असल्याचे सर्वसामान्य सावंतवाडीकरांना ज्ञात आहे. सावंतवाडी नगरपालिकेवर सत्ता स्थापन करताना सावंतवाडीतील भाजपा पदाधिकाऱ्यांची एकजूट असल्याचे दिसून आले होते. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली विधीज्ञ परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, अनिल निरवडेकर, अजय गोंदावळे, आदी सर्व पदाधिकारी सावंतवाडी नगरपालिकेवर सत्ता येण्यासाठी जीवाचे रान करत होते. परंतु सत्तेची दोन वर्षे पूर्ण होताच सावंतवाडी नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पडून माजी नगराध्यक्ष संजू परब व माजी नगरसेवक विधीज्ञ परिमल नाईक असे दोन गट पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील किंवा दोन्ही गटांना एकत्र येऊन काम करावे लागेल हे मात्र निश्चित…!

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 10 =