You are currently viewing दीपक केसरकरांच्या विरोधात सेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे विभागवार मेळावे

दीपक केसरकरांच्या विरोधात सेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे विभागवार मेळावे

ना.दीपक केसरकर यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेली शिवसेना “जैसे थे राहणार की पुन्हा जुने दिवस पाहणार?”

संपादकीय…..

महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकंप होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने महाराष्ट्रात नवीन युतीचे सरकार स्थापन केले. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते असलेले सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटात सामील झाले, त्यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे सावध झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्ष बांधणीसाठी गावागावात दौरे करू लागला. सावंतवाडीला लागून असलेल्या माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक आज माजगाव येथे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसाठी सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, बाळा गावडे, विभागीय अध्यक्ष, उपतालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, बुथ प्रमुख, महिला प्रमुख, सरपंच, उपसरपंच व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना पक्ष कोकणात पुनर्बांधणीसाठी खुद्द हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानात उतरले होते. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली काही निवडक नेते सिंधुदुर्ग मध्ये सेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी कमालीची कसरत करत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांनी सिंधुदुर्गात येऊन सभा घेतल्या. त्यांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी सभांना गर्दी सुद्धा झाली. परंतु कणकवली मालवण मतदार संघातून नारायण राणे यांच्या विरोधात परशुराम उपरकर यांनी लढविलेल्या विधानसभेला मात्र उपरकर यांना आपले डिपॉझिट देखील वाचविता आले नव्हते. त्यामुळे नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही असे केलेले विधान खरे ठरले होते. राणे काँग्रेसवासी झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद राणे यांच्या अधिपत्याखाली आली ती आजतगायत राणे यांच्या ताब्यात आहे. काही अपवाद वगळता इतर स्वायत्त संस्थाही राणेंच्या अधिपत्याखाली राहिल्या. परंतु राष्ट्रवादीच्या माध्यमातून दीपक केसरकर यांनी त्यावेळी सावंतवाडी मतदारसंघ अभेद्य राखला होता, आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ दीपक केसरकर हे एकमेव नेते होते त्यांनी राणेंना शहा दिला होता.
दीपक केसरकर यांनी शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादी सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा अनुभवला आणि हजारोंच्या उपस्थितीत आमदार दीपक केसरकर यांना शिवसेना पक्षात प्रवेश देत मनगटावर शिवबंधन बांधले होते. ना. दीपक केसरकर यांनी राणे यांच्या विरोधात दहशतवादाची लढाई तीव्र करून राणे यांच्या जवळपास २५ वर्षाच्या कारकिर्दीला ब्रेक लावत सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंना लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत पराभवाची चव चाखायला लावली. आणि त्यामुळेच राणेंना शह देणारा नेता अशी स्वतःची ओळख संपूर्ण राज्यात आमदार दीपक केसरकर यांनी निर्माण केली होती. दीपक केसरकर यांनी राणेंना शह दिल्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दीपक केसरकर यांना शिवसेना पक्षात प्रवेश देण्यात उत्सुक होते. २००९ च्या निवडणुकीत शिवसेना राजापूर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाने पराभूत झालेली होती, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी तब्बल दीड लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला आणि नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांना पराभव दाखवून दिला. या चमत्काराचे श्रेय देखील नारायण राणे यांच्या विरोधात मतदारांमध्ये जागृती निर्माण करणारे दीपक केसरकर यांचेच होते. कुडाळ मालवण मतदारसंघातून आम.वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव करत जॉईंट किलर ठरले तरी किंग मेकर मात्र दीपक केसरकर हेच होते. दीपक केसरकर यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा सत्तेच्या रेस मध्ये कोकणात पुढे आणले आणि शिवसेनेचे कट्टर दुश्मन समजले जाणारे नारायण राणे यांना पराभव दाखवून दिले. याचेच बक्षिस म्हणून आमदार दीपक केसरकर यांना युतीच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.
दीपक केसरकर यांनी कोकणात रसातळाला गेलेली शिवसेना पुन्हा उर्जितावस्थेत आणत सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेला चांगले दिवस येण्यासाठी कारणीभूत ठरले. २०१४ नंतरच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना जोमाने वाढली. गृहराज्यमंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून विकास कामे ही सुरू केली. परंतु दीपक केसरकर यांचे शिवसेनेमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेले प्राबल्य शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या इतर नेत्यांना मात्र खूपत होते. त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दीपक केसरकर यांच्या विरोधात कान भरण्यात आले आणि शिवसेना नेतृत्वाने दीपक केसरकर यांना २०१९ च्या निवडणुकीनंतर हळूहळू बाजूला सारत मंत्रिपदापासूनही वंचित ठेवले. शिवसेना नेतृत्वाकडून दीपक केसरकर यांच्यावर केलेला अन्याय पाहता, शिवसेना नेतृत्वाने केवळ नारायण राणे यांच्या विरोधातील हुकमी एक्का म्हणून दीपक केसरकर यांचा वापर करून घेत शिवसेना पक्ष जो कोकणात तिसऱ्या नंबर वर फेकला गेला होता तो पुन्हा एकदा पहिल्या नंबर वर आणला आणि उसाचा दांडा चघळून त्याचा चोथा झाल्यावर फेकून देतात त्याप्रमाणेच दीपक केसरकर यांच्याकडून काम झाल्यानंतर त्यांना संघटनेपासून बाजूलाच फेकून दिल्याचे चित्र दिसून येत होते. दीपक केसरकर हे शिंदे गटासोबत राहून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्त झाले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालक मंत्री म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा जोमाने वाढलेले नारायण राणे यांचे प्रस्थ रोखण्यासाठी किंवा राणेंना शह देण्यासाठी शिवसेनेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरे नेतृत्व कोण? हा मात्र प्रश्न उभा राहिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − one =