You are currently viewing भारतातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपमध्ये प्रवेश

भारतातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपमध्ये प्रवेश

 

2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे सुरूच आहे. नुकतेच काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना कुरुक्षेत्र, हरियाणातून उमेदवारीही दिली. आता नवीन जिंदाल यांची आई आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनीही काँग्रेसची साथ सोडली आहे. बुधवारी त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.

सावित्री जिंदाल यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती देताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, “मी आमदार म्हणून 10 वर्षे हिसारच्या लोकांचे प्रतिनिधित्व केले आहे आणि मंत्री म्हणून हरियाणा राज्याची निःस्वार्थपणे सेवा केली आहे. हिसारचे लोक माझे कुटुंब आहेत आणि माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस नेतृत्वाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची मी सदैव ऋणी राहीन ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा आणि आदर दिला.”

सावित्री जिंदाल यांचा मुलगा आणि जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल) चे चेअरमन नवीन जिंदाल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातच आता सावित्री जिंदाल यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. नवीन जिंदाल यांना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

सावित्री जिंदाल यांची राजकीय कारकीर्द

ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल हिसार मतदारसंघातून आमदार आणि 10 वर्षांपासून हरियाणा सरकारमध्ये मंत्री होत्या. जिंदाल यांचे पती आणि जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओपी जिंदाल यांचे 2005 मध्ये विमान अपघातात निधन झाल्यानंतर हिसार मतदारसंघातून हरियाणा विधानसभेवर सावित्री जिंदाल निवडून आल्या.

सावित्री जिंदाल यांनी 2009 मध्ये हिसारमधून पुन्हा निवडणूक जिंकली. ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. 2006 मध्ये त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. मात्र, 2014 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सावित्री जिंदाल यांना हिसारमधून पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदाल यांचे नाव आघाडीवर आहे. त्या 84 वर्षांच्या आहेत आणि जिंदाल ग्रुपचा मोठा व्यवसाय सांभाळतात.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 28 मार्च 2024 पर्यंत, सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती 29.6 अब्ज डॉलर आहे. भारतीय चलनात हे सुमारे 2.47 लाख कोटी रुपये आहे. जागतिक स्तरावर, सावित्री जिंदाल जगातील अब्जाधीशांच्या यादीत 56 व्या स्थानावर आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 7 =