You are currently viewing जेष्ठ पत्रकार, छायाचित्रकार अरविंद शिरसाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
पत्रकार म्हणून कार्यशैली निर्भिड... सुरेश प्रभू

जेष्ठ पत्रकार, छायाचित्रकार अरविंद शिरसाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

सावंतवाडी येथील जेष्ठ पत्रकार, छायाचित्रकार, गणित तज्ञ अरविंद शिरसाट यांचे आज पहाटे ५.३० वाजता त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६२ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. मिलाग्रीस हायस्कुलचे माजी शिक्षक शिरसाट सर यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
अरविंद शिरसाट हे गेली अनेक वर्षे पत्रकारिता करत होते. त्यांची उत्तम आणि अभ्यासपूर्ण लेखणी हीच त्यांची ओळख होती. अभ्यासपूर्ण लेख वाचायचा तर तो फक्त अरविंद शिरसाट यांचाच. सकाळ या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द घडविली होती. अनेक नवोदितांना पत्रकारिता क्षेत्राकडे वळवून त्यांनी कित्येक पत्रकार घडविले होते. पत्रकारितेत अनेकवर्षं काम केल्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती. उडानटप्पू या त्यांच्या सदरामुळे ते घराघरात पोचले होते. आबा बांबर्डेकर, नंदू इन्सुलकर या व्यक्तिरेखा त्यांनी जिवंत केल्या होत्या. आपल्या मिश्किल, विनोदी लेखणीतून त्यांनी दोन्ही पात्रांना लोकांपर्यंत पोचवले होते.
पत्रकार म्हणून निवृत्त झाले तरी त्यांच्यातला लेखक मात्र जिवंत होता. गेल्या काही काळापासून ते *सुक्यो गजाली* या सदराखाली संवाद मीडियातून लेखन करत होते. तसेच स्वलिखित चुटकुले लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ते सोशल मीडियावर आर्य मधुर या ब्लॉगच्या माध्यमातून कार्यरत होते. पत्रकारितेबरोबरच त्यांनी छायाचित्रकार, नाटककार व गणित शिक्षक म्हणून सुद्धा कार्य केले आहे. गणित शिकवताना कडक शिस्तीचे, कठोर भासणारे अरविंद शिरसाट बाहेर मात्र कमालीचे खोडकर होते. मिश्किलपणे बोलून आपल्या हसतमुख स्वभावाने लोकांना आपलेसे करण्यात ते माहीर होते.
त्यांचा पर्यावरण व गणिताचा दांडगा अभ्यास होता. इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांना सुद्धा ते शिकवत होते. राजकीय नेतेही त्यांच्याशी अदबीने वागायचे. पत्रकारितेतील त्यांच्या अभ्यासामुळे त्यांना पत्रकारिता क्षेत्रात मानसन्मान मिळाला होता.
पत्रकारितेतील झगमगता तारा आज पहाटे निखळून पडला.

*संवाद मिडियाकडून पत्रकारितेतील उत्तुंग शिखराला मानाचा मुजरा…..भावपूर्ण श्रद्धांजली *

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − nine =