You are currently viewing राजा शिवाजी चौकात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे बबन साळगावकर यांच्याकडून स्वागत..

राजा शिवाजी चौकात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे बबन साळगावकर यांच्याकडून स्वागत..

बबन साळगावकर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक

शिवसेना कोणाची? असा वाद पेटलेला असताना आणि शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडून तब्बल ४० आमदार उठाव करून बाहेर पडल्याने उद्धव ठाकरेंना प्रथमच मैदानात उतरण्याची वेळ आली. अनेक आमदार, खासदार शिवसेना शिंदेगटात सामील झाल्यामुळे शिवसैनिकांना शिवसेना पक्षात थोपविण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी कंबर कसली आणि राज्यभर शिवसंवाद यात्रा काढली आहे. आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आले असता सर्वप्रथम त्यांनी शिंदेगटाचे मुख्य प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात सभा घेण्यासाठी येत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिथे पहिली शिवसेना शाखा स्थापन झाली त्या राजा शिवाजी चौकात पूर्वाश्रमीचे शिवसेना उपजिल्हाध्यक्ष आणि आता राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते असलेले बबन साळगावकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी राजा शिवाजी चौकात बबन साळगावकर उभे असताना त्यांच्या सोबत माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, सुरेश भोगटे, विलास जाधव त्याच प्रमाणे रवी जाधव, बंटी माठेकर आदी बबन साळगावकर समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. राजा शिवाजी चौक ही शिवसेनेची जिल्ह्यातील पहिली शाखा असून येथेच आदित्य ठाकरेंचे स्वागत होणे महत्त्वाचे आहे असे सांगून या स्वागतप्रसंगी राजा शिवाजी चौकात बबन साळगावकरांनी आम.दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. शरद पवारांनी दीपक केसरकरांना आमदारकीचे तिकीट दिले परंतु राष्ट्रवादीच्या पाच वर्षांच्या आमदारकी मध्ये केसरकर कधीच स्थिर राहिले नाहीत. पॉपकॉर्न च्या भांड्यात तडफडणाऱ्या पॉपकॉर्न सारखे मंत्रिपदासाठी तडफडत राहिले. आम्ही त्यांना निवडून आणले परंतु नारायण राणेंचा दहशतवादाचा मुद्दा पुढे करत त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केला. परंतु आता ते म्हणतात, नारायण राणे ज्येष्ठ आहेत, त्यांच्या सोबत एकत्र बसण्यास आपली काही हरकत नाही. म्हणजे जनतेचा विश्वासघात करून स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी नारायण राणेंचा दहशतवाद, कन्येच्या घरावर गुंड पाठवले असे सांगितले आणि लोकांची दिशाभूल केली त्याची उत्तरे त्यांना द्यावी लागतील.
बबन साळगावकर यांनी पुढे बोलताना, केसरकरांचे शिवसेनेतील आयुष्य २५/३० दिवसांचे असताना उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद दिले, परंतु तुम्ही तिथेही गद्दारी केलीत, कितीवेळा गद्दारी करून लोकांना फसवणार? असा प्रश्न उपस्थित करत लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी आपण आदित्य ठाकरेंचे स्वागत करत असल्याचे सांगितले. दहशतवाद वादाचे चित्र उभे करत सातत्याने पक्षांतर करून कार्यकर्त्यांचे अतोनात हाल होत असल्याचे सांगत केसरकरांनी कार्यकर्त्यांचा विचार केला नाही असे म्हणाले. आमदार दीपक केसरकर यांनी काल मीडियाशी बोलताना “जी चूक शरद पवारांनी केली ती चूक आदित्य ठाकरेंनी करू नये” असा सूचक इशारा दिला होता, याची आठवण करून देत केसरकर थंड दहशतवाद निर्माण करत असल्याचे सांगितले. आम्ही केसरकरांवर प्रेम केलं, परंतु त्यांनी खालच्या पातळीवर राजकारण करून राजकारणात, पक्षात, उद्योगपतींमध्ये आपली विश्वासार्हता गमावली आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत सत्तांतर होणार असल्याचेही सांगितले.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर साडेसात वर्षे दीपक केसरकर यांच्याच पाठिंब्यावर सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते,परंतु आमदारकीच्या निवडणुकीच्यावेळी त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी च्या तिकिटावर केसरकरांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना पाच हजाराचा टप्पा गाठणे देखील कठीण झाले होते. बबन साळगावकर हे स्वतः राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचे वारंवार सांगत होते. शिवसेनेचे शिवबंधन बांधण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत बाबू कुडतरकर हे शिवसेनेचे उमेदवार होते आणि त्यावेळीही बबन साळगावकर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि सपशेल पराभव पदरी पडला होता. आम.केसरकर शिवसेनेमध्ये असताना शिवबंधन बांधण्यास नकार देणारे बबन साळगावकर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी राजा शिवाजी चौकात उभे राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे बबन साळगावकर नक्की कुठल्या भूमिकेत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =