You are currently viewing ती

ती

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर (गोवा) लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना*

*ती*

अनवट वाट तुडवताना….
तळपायाच्या चिरेतून ठिबकणारे रक्त
रस्त्यावर उमटलेली निशाणी
जमावात असूनही ती एकटी
जमिनीतून कंदमुळे खोदत….
रानवाटा तुडवताना….
ती, पोटाची खळगी भरत राहिली…..
वर्तमानाच्या पाठीवर….. भूतकाळातील
वास्तवतेच्या विस्तवाचे दग्ध असह्य चटके
सह्य करत….. तांबड्यातून उगवलेल्या सूर्याला….
क्षितिजापल्याड जाताना चक्क काळोखात गुरफटताना पहात राहिलेली ती……,
पुन्हा परत येणाऱ्या लाल गोळ्याच्या वाटेवर बसून राहिली ती…. तिचीच ती…..!
दादल्यानेच केलेली आयुष्याचे स्मशान….
तान्ही पोरं टाकून पसार झालेल्या त्याच्या वाटेवर डोळे लावून बसलेली ती………
डोळ्यांच्या खोबणीतून अस्वस्थता, कासाविशी …… घरंगळत जात राहिली…
झोपडीच्या उंबऱ्याला, तुटक्या मुटक्या टेकुला बघत होती ती……
लाव्हागत दगड झालेलं मन, मठ्ठ माथ…..
ऐन तारुण्यात काळ्याभोर केसांत पांढऱ्याची वाढ होत राहिलेली…..
वर्तमानाच्या फटकाऱ्याच्या प्रहारात….
उद्याचा एकेक प्रहर मोजत बसलेली ती……!
सुकाणूच नसलेली जीवन नौका वल्हवताना…….
जीवाची घालमेल बघत राहिली…..
दादल्याबरोबरच्या संसाराची चित्रं डोळ्यासमोर नाचत राहिलेली……
स्वयंपाकातील किणकिण…. ते नाजुक लाजरे हसणे….. त्याच्या सहवासाचा हवाहवासा वास….. ती कुजबुज …. ते
खिदळणे…..
गर्भातील्या त्या, हव्याहव्याशा जीवाचे हुंकार…….. हालचाल…..
सार काही भडाभडा डोळ्यात रेखाटत राहिलेली ती…..
तिची ती…. तीच्याताच सामावलेली…..
निराधार मनाला थोपटत…..
झोपडीच्या फाटक्या छताला बघत….
आयुष्याचे फटकारे ऐकत होती ती….!
अस्तित्वहीन होऊन राहिलेली ती,
नास्तित्वात स्वतःच्याच अस्तित्वाला शोधत होती ती….. एकटीच….

ऐन तारुण्यात दादल्यासवे थिरकत होती ती……..,
आता, स्नेह मायेच्या कोवळ्या डहाळ्याना ….. पाचोळ्यात बघत राहिलेली ती……
आरपार थिजून गेली होती ती….!!

मानसी जामसंडेकर
गोवा

 

 

 

 

.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + nineteen =