You are currently viewing कणकवली येथे घडला धक्कादायक प्रकार

कणकवली येथे घडला धक्कादायक प्रकार

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली लाखोंचा गंडा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कुणीही यावं आणि फसवून जावं’ अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील नागरिकांची आहे. आजपर्यंत जिल्ह्यात संचयनी, कल्पवृक्ष, पॅनकार्ड, जपान लाईफ अशा कितीतरी कंपन्या आल्या, मोजक्या काहींची लाईफ बदलली परंतु जिल्ह्यातील भोळ्या भाबड्या कित्येक लोकांना गंडा घालून लाखो रुपये गडप करून पळून गेल्या. जिल्ह्यातील रोजगाराच्या दृष्टीने अथवा पोटापाण्याचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न करणारे युवक – युवती, व्यावसायिक आदी अनेक लोक अशा योजनांच्या खाली भरडले गेले आणि फसवणुकीला बळी पडले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहातच कोल्हापूर येथील दोन भामट्यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत आरोग्य विषयक योजना गावागावात, घराघरात पोहोचविण्यासाठी डाटा ऑपरेटर आणि तालुका समन्वयक आवश्यक आहेत, असा बनाव करून जिल्ह्यातील अनेक युवक युवतींना नोकरीचे आमिष दाखवून प्रत्येकी पाच हजार रुपये भरून घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तब्बल 225 युवक युवतींनी कणकवली नगर वाचनालय सभागृहात सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत प्रशिक्षणात भाग घेतला होता. कोल्हापूर येथून आलेल्या दोन भामट्यांनी आरोग्य विषयक योजना गावागावात पोहोचविण्यासाठी डाटा ऑपरेटर पदासाठी 15 हजार रुपये तर तालुका समन्वयक पदासाठी 21 हजार रुपये पगार दिला जाईल अशी आमिषे दाखविली.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असे केंद्रीय पातळीवरील गोंडस नाव जोडल्यामुळे अनेकांना नोकरीची आशा निर्माण झाली आणि त्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली नगर वाचनालय सभागृहात सुरू असलेल्या प्रशिक्षण ठिकाणी भेट दिली असता त्यांना सदरच्या प्रशिक्षण संदर्भात संशय आल्याने त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांकडे या प्रशिक्षणासंदर्भातील आपल्याकडे लेखी आदेश आहेत का? अशा प्रकारची विचारणा केली आणि उलट सुलट चौकशी करता पण प्रधानमंत्री योजना अंतर्गत कोणतेही लेखी आदेश सदरच्या अधिकाऱ्यांकडे आढळून आले नाहीत. त्यामुळे आरोग्य विषयक योजना असे गोंडस नाव देऊन सुरू असलेला हा प्रकार म्हणजे फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आल्याने कणकवली पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली. सदरचा प्रकार गंभीर असल्याने दोन्ही अधिकाऱ्यांना कणकवली पोलीस ठाणे येथे नेण्यात आले आणि पुढील कारवाई सुरू केली. कोल्हापूर येथील याच दोन भामट्यांनी रत्नागिरी येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत रत्नागिरीतील जवळपास 70 महिलांना अशाच प्रकारचे प्रशिक्षण देऊन पैसे उकळल्याचे उघड झाले आहे.
देशात सरकार बदलले, नोकऱ्यांची हमी देण्यात आली, लाखो बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील अशा प्रकारच्या वल्गना केल्या गेल्या, परंतु नोकरीच्या नावाने आजही युवक- युवती बेरोजगार म्हणून फिरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर नैसर्गिक साधन संपत्ती विपुल आहे, परंतु जैवविविधतेला बाधा येऊ नये म्हणून काही ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या रोजगार, प्रकल्प यांना विरोध होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवक युवतींना परत जिल्ह्यात किंवा मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकऱ्यांच्या शोधार्थ जावे लागते. परंतु कित्येकांना मोठ्या शहरात राहणे परवडणारे नसल्याने अनेक बेरोजगार वाम मार्गाला आणि गैर धंद्यांकडे वळलेले आहेत. जिल्ह्यातील युवा पिढीच्या हाताना काम देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नेते, आमदार, खासदार, मंत्री यांच्याकडून देखील कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे नोकरीच्या नावावर नेहमीच बाहेरून येणाऱ्या भामट्यांकडून किंवा दलाल, एजंट इत्यादींकडून जिल्ह्यातील बेरोजगारांची फसवणूक आणि आर्थिक पिळवणूक होत असते. अलीकडे जिल्ह्यात नोकरीच्या नावाने गंडा अशी अनेक प्रकरणे पुढे येत असल्याचे आपण वर्तमानपत्र, सोशल मीडिया आदींच्या माध्यमातून वाचतच असतो. जिल्ह्यातील गोरगरीब पालकवर्ग घाम गाळून, कष्ट करून आपल्या उतार वयासाठी जमवलेली पुंजी देखील नोकरीच्या आशेने अशा भामट्यांच्या हाती देऊन कंगाल झालेले आहेत. राज्यात सत्ता येतात, जातात, कोणी मंत्री संत्री होतात, परंतु जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल यासाठी जिल्ह्यातील एकही मंत्री, नेता प्रयत्न करताना दिसत नाहीत. निवडणुका आल्या की भाषण बाजी करून पोकळ आश्वासनांची खैरात टाकली जाते. रात्रीच्या मटण, दारूच्या पार्ट्या घालून मतांची बेगमी केली जाते, परंतु भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी नसलेला युवक या मटण, दारूच्या पार्टीत चार दिवस मजेत घालवतो आणि निवडणुकीचे वारे ओसरले की पुन्हा एकदा कामधंदा नसल्याने बेरोजगार म्हणूनच गणला जातो.
जिल्ह्यात आजपर्यंत अनेक कंपन्या, भामटे फसवणूक करून पळून गेले परंतु आमिषे, आणि आशा अशा दोन बोटींवर स्वार झालेले केवळ बुडाल्याचीच उदाहरणे आपल्याला दिसून येतात. सहज आणि कुठलेही कष्ट न करता दारापर्यंत चालून नोकऱ्या येत नसतात तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पैसे घेऊन नोकऱ्या देणे हे आजच्या डिजिटल युगात सोपं राहिलेलं नाही हे जिल्ह्यातील गोरगरीब भाबडी जनता कधी ओळखणार? हा न उलगडणारा प्रश्न बनला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =