You are currently viewing स्व.दादासाहेब काळमेघ… जसे दिसले तसे

स्व.दादासाहेब काळमेघ… जसे दिसले तसे

२५ व्या स्मृतिदिनानिमित्त एक आठवण: डॉ.नरेशचंद्र काठोळे

स्व.दादासाहेब काळमेघासारखा दृष्टी असलेला माणूस श्री शिवाजी शिक्षण संस्थेला अध्यक्ष म्हणून लाभला हे खरोखरच इतिहासात लिहून ठेवण्यासारखी गोष्ट आहे .या ना त्या कारणाने दादासाहेबांना जवळ जाण्याचा खूप योग आला. हा मोठ्या मनाचा ,विशाल काळजाचा आणि दूरदृष्टी असलेला माणूस जिथे गेला तिथे जिंकून आला. नेपोलियनबद्दल म्हणतात .ते आले त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले. मला दादासाहेबांच्या बाबतीत असेच म्हणावयाचे आहे .दादासाहेबांनी हेमंतरावावर आणि शरदरावांवर जेवढे प्रेम केले असेल तेवढेच प्रेम त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांवर केले .हा माझा हा दुसऱ्याचा हा विचार त्यांनी कधी केला नाही. मला आठवते श्री दादासाहेब काळमेघ हे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आसताना मी त्यांचा मोठा जाहीर सत्कार विमलाबाई देशमुख सभागृह मध्ये घेतला होता.मराठीतील सुप्रसिद्ध दलित साहित्य डॉ. भाऊ लोखंडे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दादासाहेबांनी लिहिलेले दादाचे अभंग या पुस्तकाचेही प्रकाशन या कार्यक्रमात झाले .सर्व सभासद विरोधात असताना आणि केवळ दादासाहेब अध्यक्ष असताना दादासाहेबांना जी कसरत करावी लागली तो मोठा इतिहास आहे. पण दादासाहेब डगमगले नाहीत. ते अखेरपर्यंत आपल्या निष्ठेशी प्रामाणिक राहिले .
*एसटीमध्ये दादासाहेब.* दादासाहेब नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते .मी काही कामानिमित्त नागपूरला एसटी बसने निघालो होतो .कोंढाळीला चहापाण्यासाठी गाडी थांबली. मी बसमधून खाली उतरण्यासाठी दार उघडले .दार उघडताच मला समोर दादासाहेब दिसले .मी त्यांना नमस्कार केला .दादासाहेब मी काही म्हणण्यापूर्वी मला म्हणाले .जागा आहे काय ? एसटी भरगच्च भरलेली होती. मी त्यांना माझी जागा देऊ केली. सोबत मोतीराम महाराज होते .त्यांना देखील जागा करून दिली. दादासाहेब म्हणाले काठोळे मी नागपूरला निघालो होतो .गाडी बंद पडली .आता नागपूरला फोन करा. गाडी बोलवा .त्याला वेळ लागेल .पेट्रोल खर्च होईल. त्यापेक्षा मी बसने जाण्याचा निर्णय घेतला आहे. एका विद्यापीठाचा कुलगुरू एका साध्या लाल रंगाच्या एसटी बसमधून प्रवास करतो ही फार मोठी गोष्ट मला वाटली . दादासाहेब कुलगुरू होण्यापूर्वीची गोष्ट .राष्ट्रीय सेवा योजनाने ग्रीष्मकालीन शिबीर पाटणसांगवी या गावात ठेवले होते. एक दिवस आम्हाला संयोजक कोराडी प्रकल्प पाहायला घेऊन गेले. निघतांना आमची बस गाडी फेल झाली .आता या घटनेला साधारणपणे 45 वर्ष झाली असावी .27 मे 1974 चा तो दिवस होता .माझ्या माहितीप्रमाणे प्रा डॉ श्रीनिवास खांदेवाले हे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख होते .त्यांनी सर्व मुलांना आवाहन केले. आज पंडित जवाहरलाल नेहरू यांचा दिवस आहे. त्याला आपण पाटणसांगवीपर्यंत पायी जाऊ या. आम्ही सर्वजण पायी निघालो. वाटेत एक पांढरी गाडी समोर जाऊन थांबली. पाहतो तर त्यातून दादासाहेब खाली उतरले. त्यांनी चौकशी केली आणि सगळी मुले पायी जात आहेत तर त्यांनी लगेच सर्वांना थांबवले आणि नागपूरला फोन करून सर्वांसाठी गाड्या बोलावल्या .मित्रांनो स्वतः बसमध्ये प्रवास करणारा कुलगुरू आणि विद्यार्थ्यांसाठी गाड्या बनवणारा कुलगुरू याला दृष्टी लागते . ती दृष्टी दादासाहेबांना जवळ होती .

माननीय दादासाहेबांना कीर्तनाचा छन्द होता .त्यांची कीर्तने संपूर्ण महाराष्ट्रात झाली आणि त्यावर टीका टिप्पणीही तेवढीच झाली. लोक म्हणायचे. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कुलगुरू आणि कीर्तन करतो .मला नेहमी वाटायचे की आपला स्वतःचा वेळ हा माणूस समाजाला देत आहे .कीर्तन करीत आहे. लोकांना जागा करत आहे. एवढा प्रवास करीत आहे. खरे तर ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांना छंद तर होता.पण त्या छंदाच्या माध्यमातून समाज जागृतीचे त्यांनी जे काम केले ते पाहिल्यानंतर असे वाटते की गाडगे महाराजांचा कीर्तनाचा वारसा आहे तो दादासाहेबांनी यानिमित्ताने पुढे नेलेला आहे. आज आपण पाहतो कीर्तनाचे माध्यम हे प्रभावी झालेले आहे .हजारो कीर्तनकार आज तयार होत आहेत.पण त्याची पाळेमुळे दादासाहेबांच्या त्या प्रेरणेमध्ये आहेत .
.दादासाहेब कोणताही निर्णय ताबडतोब घ्यायचे मागेपुढे पाहायचे नाहीत.एकदा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयांमध्ये ते पाहणीसाठी गेले .तेव्हा ते संस्थेचे अध्यक्ष होते .महाविद्यालयात पाहत असताना ते प्रयोग शाळेमध्ये गेले .प्राचार्यांनी एका तरुणाचा परिचय करून दिला .प्राचार्य म्हणाले दादासाहेब हा मुलगा एमएससी गणित झालेला आहे .याला नोकरी नाही म्हणून हा येथे सहाय्यक म्हणून लागला आहे. दादासाहेब पटकन म्हणाले अरे भंडारा जिल्ह्यात पवनीला आपलं कॉलेज निघाले आहे .जा त्याला ताबडतोब पाठवा आणि प्राध्यापक म्हणून रुजू करुन घ्या. मित्रांनो आज आपण पाहतो प्राध्यापकांच्या या निवडणुकीसाठी जाहिरात मुलाखती ओळखीपाळखी लागतात .पण दादासाहेबांच्या दैनंदिनीमध्ये हा प्रकार नव्हता .त्यांना एखादी गोष्ट पटली तर ते ताबडतोब निर्णय घ्यायचे. , आमचे एक मित्र आहेत प्राचार्य रा गो चवरे .ते आता प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे वडील आणि दादासाहेब सोबत काम करीत होते. प्राध्यापक चवरे मराठीमध्ये एम ए झाले .नागपूर विद्यापीठातील एका महाविद्यालयांमध्ये मराठीची जागा निघाली. तेव्हा दादासाहेब कुलगुरू होते .रामदास चवरे त्यांना नागपूरला भेटायला गेले आणि त्या कॉलेजबद्दल सांगितले .दादासाहेबांनी ताबडतोब त्या महाविद्यालयाला फोन केला आणि ताबडतोब रुजू करून घेण्यास सांगितले. केवढी ही तत्परता. मित्रांनो आजच्या काळात अशी तत्परता फार कमी पाहायला मिळते. , आमचे मित्र प्रा. सुभाष बेलसरे हे आमच्या अमरावती जिल्ह्यातले. ते एका महाविद्यालयांमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते .पुढे संस्थेने त्यांना काढून टाकले काढून टाकले.टाकण्याचे कारण म्हणजे संस्थाचालकाचा मुलगा मराठीत एम ए झालेला होता.,सुभाष बेलसरे यांना प्रश्न पडला .आता काय करायचे .आपले वर्ष खाली जाणार म्हणून ते दुसऱ्या विषयात एम ए करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी नागपूरला गेले .खाजगी विद्यार्थी असल्यामुळे बँकेचा ड्राफ्ट त्यांना पाहिजे होता. त्यासाठी ते बँकेत गेले. योगायोगाने दादासाहेब त्या बँकेत आले. तेव्हा ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते .त्यांनी सुभाषला पाहतात प्रश्न केला. कारे सुभाष इथे कसा काय ? मूर्तिजापूर काय म्हणते ?सुभाषने आपबिती सांगितली .संस्थेने त्यांना काढून टाकले होते. दादासाहेबांनी सुभाषला गाडीत बसविले आणि नागपूर विद्यापीठामध्ये लिपिक म्हणून लावून घेतले .पुढे हेच सुभाष बेलसरे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक म्हणून विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले. सर्वसामान्य माणसाची दखल घेणारा दिलदार हृदयाचा माणूस आज आपल्यात नाही आहे .परंतु त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जे चैतन्य निर्माण केले आहे ते आजही कायम आहे .त्यांच्या बाबतीत एवढेच म्हणावे लागेल झालेत बहु होतील बहु परंतु या सम हा. दादासाहेबांचा आज स्मृती दिन. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. प्रा. डाँ. नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती 9890967003.प्रकाशनार्थ.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 2 =