You are currently viewing पाऊस-सखा

पाऊस-सखा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी मोहन जोशी लिखित अप्रतिम ललितलेख

पावसाळी हवा,
पावसात भिजलेली झाडं,वेली,फुलं….जणू ओलेता पदर घट्ट अंगाशी पकडून उभी आहेत असा भास त्यांच्या कडे पहाताना होतो…..खिडकीतून तासनतास पडणाऱ्या पावसाकडे आणि चिंब भिजून कुडकुडणा-या पक्ष्यांकडे,वा-याने डोलणा-या झाडांकडे,
त्यांच्या पानातून टपकणा-या पाण्याकडे तासनतास बघत बसावेसे वाटते.कधी
कधी कावळा,चिमणी आपल्या घराच्या वळचणीला निवारा शोधतात…तेव्हा त्यांना दाणे टाकले जातात पण ते मात्र एखाद्या संन्यस्थासारखे शांतपणे बसतात…..मधेच पंखांची फडफड करुन ओलेते कपडे झटकावेत,सुकवावेत तसे पंख झटकतात…
चोचीने स्वतःच अंग स्वच्छ करतात….त्यांची ही कृतीसुध्दा भान हरपून पहात रहावीशी वाटते…..
संतत धार पाऊस पडू लागली की गावाकडे कौलारु घराच्या छपरातून पागोळ्या गळू लागतात.
दोन तिन पाऊस झाले की पागोळ्याच पाणी कसं स्वच्छ, स्फटिका
सारख पारदर्शक होतय.अशावेळी
घरातली मोठी पातेली,
बादल्या ड्रम मग आम्ही पागोळ्याखाली लावायचो…पाऊस असेपर्यंत नदीविहिरीवर पाण्याच्या खेपा हा माझा सखा कमी करायचा.पागोळ्याच्या पाण्यात कपडे धुणं,भांडी,आंघोळीच पाणी,घर सारवणं व्हायचं.प्यायच पाणी तेवढच विहिरीवरनं आणायचं तेव्हा विहिरीच वरती आलेल पाणी बघायला आम्ही मुलं आईबरोबर जात असू..
धो,धो पडणारा पाऊस विहिरीला काठोकाठ भरायचा.ते पाणी पाहिलं की मनही काठोकाठ भरलय असच वाटायचं. अशा काठोकाठ भरलेल्या विहिरीतून कळशी बुडवून पाणी काढायला फार गंमत वाटे….पाऊस थोडा विरळ झाला भुरभुरायला लागला की पागोळ्याच पाणी कमी व्हायचं.
तेव्हा मात्र कपडे धुवायला धुणं घेऊन आम्ही ओढ्यावर जाव लागे. कधीकधी आईबरोबर मी पण
ओढ्यावर कपडे
धुवायला जायचे.एकदा असच दुपारच्या वेळी तीन साडेतीन वाजता आम्ही दोघी कपड्याच्या बादल्या घेऊन ओढ्यावर गेलो होतो.
थोडे कपडे धूवून झाले आणि काही माणसं ओढा आला,ओढा आला पळा,पळा…चला वरती चला अशी ओरडत येत होती…
आईनं माझा हात पकडला आणि धावतच जवळच्या उंच टेकडीवर मला ओढतच घेऊन गेली.आम्ही अजून वरती पोहोचतोय तोवर धाडधाड धाडधाड असा आवाज करत एका बाजूने पाण्याचा प्रचंड लोट धावत,उड्या घेत येत होता जणू ओढा फूटल्याप्रमाणे वेगाने,
…आमच्या बादल्या ,
सगळे कपडे स्वतः
बरोबर घेऊन गेला.
..आधीच धावल्याने धापा टाकत होते मी.
त्या अक्राळ विक्राळ ओढ्याच रूप पाहून मी तर हबकून गेले होते.
मी आईला विचारलं.. आई एवढ पाणी कुठनं आल एकदम?
आई म्हणाली अग आपल्या गावाच्या वरच्या अंगाला ढग फुटी झाली असलं….असाच असतो पाऊस…एका ठिकाणी पडत नाही तर दुसरीकडे धो,धो कोसळतो….
अग पण ढग फुटी म्हणजे काय?
तर म्हणाली….. अग पाण्यान गच्च भरलेला मोठा ढग रिमझिम बरसण्यापेक्षा फटकन सगळंच पोटातल पाणी एका ठिकाणी पाडतो त्याला ढगफुटीम्हणतात.
त्या दिवशी मला पावसाच्या गोंडस रूपाची दुसरी बाजूही मनात धसका निर्माण करुन गेली
नजरेसमोरुन आपले कपडे , माझा आवडता ड्रेस, बादल्या वाहून जाताना उघड्या डोळ्यांनी आम्ही पहात होतो पण काहीही करता येत नव्हतं तेव्हा कुसुमाग्रजांची कविता आठवली…
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
इथे आम्ही वाचलो होतो पण घरी पोहोचेपर्यंत डोळ्यात अचाट पाहिलेल्या पाण्याच्या लोंढ्याची भिती आणि पापणीत अश्रुंचा पूर घेऊन…..
असा हा पाऊस कधी प्रेमाची रिमझिम करेल तर कधी धुसमुसळा होऊन तडतड ताशे वाजवेल,कधी थेंबाचे मधूर नर्तन तर कधी किरणांच्या घसरगुंडी वरुन टप्पटपोरे थेंब सरसर घसरत क्षणात ऊनपावसात लपाछुपी खेळेल,तर कधी छान दडी मारुन लपूनही बसेल.कधी नदीनाले
तुडुंब भरेल तर कधी ढग फाटून गावं बुडवेल…….
ब-याचदा अस वाटतं की मानवी मनाची सगळी आवर्तनं तो शिकलाय..
हो ना?

प्रा.सौ.मानसी मोहन जोशी..ठाणे प.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + one =