You are currently viewing सुखद प्रवास कवी जीवनाचा

सुखद प्रवास कवी जीवनाचा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलासजी (आप्पा) कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लेखिका कवयित्री डॉ.ज्योती रामोड यांनी आप्पांवर उधळलेली स्तुतीसुमने

बालकाच्या जन्मापासून ते मानवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत व्यक्तीची जडणघडण वेगवेगळे वातावरण, जीवन प्रवासात मिळत जाणाऱ्या व्यक्ती, आयुष्यात घडणारे प्रसंग यानुसार परिवर्तित होत जाते. असाच सुंदर कवी जीवनाचा प्रवास श्री. विलास कुलकर्णी यांचा आहे. व्यक्तीच्या जीवनात जे बदल घडत जातात त्याच्या पाठीमागे प्रेरणा आणि मार्गदर्शन यांचा पाठिंबा असतो. बेटा तू काहीही कर पण इतरांपेक्षा वेगळं कर हा विचार मनात रुजवनारी आई प्रेरणेचे मुख्य स्थान आहे. त्याचबरोबर अशीच प्रेरणा श्री.कुलकर्णी यांना त्यांच्या विद्यालयीन जीवनात शिक्षक म्हणून लाभलेले श्री.देशमुख सर यांच्या कडून मिळाली. मित्रासाठी लिहिलेली दोन पानी कविता त्यांच्या कवी जीवनाचा पहिला टप्पा होय.
विद्युत अभियंता म्हणून कार्य करत असताना सर्वांच्या प्रेम, उत्तेजन आणि विश्वासामुळे श्री.  कुलकर्णी यांनी त्यांच्या व्यवसायिक क्षेत्राच्या अगदी वेगळे कवी, लेखक, चित्रकार आणि ज्योतिष निसर्ग उपचार या भूमिकेतून समाजामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभियंता म्हणून मुंबईतील प्रत्येक घराघरात अखंड प्रकाश झळकत रहावा यासाठी झटून प्रयत्न करताना व्यक्तीच्या मनाला उजाळा देण्याचेही कार्य त्यांनी केले आहे. अभियंता म्हणून विविध विद्युत प्रकल्प तडीस नेताना लेखक म्हणून प्रबोधनाच्या कार्यात ते काव्यातील लेखनातील वेगळेपणामुळे अग्रभागी आहेत. अशा प्रकारचे एकाच वेळी विविध कार्य करणारे समाजात खूप कमी व्यक्ती आहेत. आपल्या लिखाणाच्या प्रतिभेतून निसर्ग आणि मानवी जीवन यांचा सहसंबंध प्रतिबिंबित केला आहे.
व्यक्तीचा व्यवसाय पोट भरायचं कसं हे शिकवतो पण व्यक्तीच्या अंगातील कला जीवन कसे जगायचे हे शिकवते. या उक्तीची जाणिव श्री. कुलकर्णी यांच्या जीवन प्रवासाकडे पाहून होते. निसर्गातील मधूरता व्यक्तीच्या जीवनात उतरल्यावर आयुष्य किती सुंदर होऊ शकते याची कल्पना त्यांच्या मधूरता या कवितेतून येते. समाजाला आणि व्यक्तीला नवी दृष्टी, विचार, भावनिक अमूर्त दृष्टीकोण कवी आपल्या मार्मिक आणि अर्थपूर्ण विचारातून प्राप्त करून देतो. लिखाणामध्ये फक्त कविताच नाही तर अध्यात्मिक लावणी, विनोदात्मक लावणी उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे. लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे साध्या-सरळ मानवाच्या मनापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्या लिखाणातून वाचकाच्या मुखावर हास्यत्मक भाव निर्माण होत परिवर्तनाची हळुवार चाहुल लागते.
विस्तारित वैचारिक दृष्टिकोन आणि कल्पनेतील सखोल प्रासंगिकता यातून होणारे अध्यात्मिक परिवर्तन आपल्या लेखणीतून श्री. कुलकर्णी यांनी मांडलेले आहे. भेट या विषयावर जवळ-जवळ 88 कवितेचा संग्रह आपला व्यावसायिक गाभारा सांभाळत लेखकाने केला आहे. भेट ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी कधी एखाद्या व्यक्तीची भेट जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणते तर कधीकधी जगण्याचा नवीन धडा शिकवून जाते. जीवनात येणारी माणसं निघून जातात. आपण करत असलेल्या व्यवसाय कधीतरी सुटून जातो पण व्यक्तीच्या अंगी असलेली कला त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या सोबत असते. आपली आवड, छंद नित्यनेमाने आपले जीवन घडवत असतात. जीवनात अशा बर्‍याच घटना घडून जातात त्या वेळी व्यक्ती स्वतःला एकटा समजतो अशा वेळी त्याची कला मात्र त्याला नकळतपणे साथ देत असते. आयुष्यातील कोणत्याही संकटातून पुन्हा उभे राहण्याची शक्ती व्यक्तीला कलेतून प्राप्त होते.
समाजात जीवन जगताना आपण बरेच व्यक्ती परिस्थितीला हताश, दुःखी,निराश झालेली पाहतो. त्यांना जगण्याची नवी उमेद, सकारात्मक विचार शैली विविध काव्य आणि लेखातून होते. निसर्गातून प्राप्त होणाऱ्या अगणित शक्ती त्याग, सहनशीलता,सहकार्य, एकनिष्ठता, विश्वास, प्रेम, संयम, दूरदृष्टीकोण, नैतिकता व्यक्तीने स्वतःच्या जीवनात कशी आणावी. जीवन हे एकदाच मिळते अहंकारात एकट्याने जगण्यापेक्षा नम्रतेत सगळ्यांसोबत जगावे हा जीवनाचा मूलगामी मंत्र श्री. कुलकर्णी यांनी आपल्या विविध कविता, लेख याच्या माध्यमातून दिला आहे. प्रसारमाध्यमात गुरफटलेली आजची तरुण पिढी अध्यात्मिक आणि वैचारिक विकासापासून दूर होत आहे. या पिढीला पुन्हा आपल्या आध्यात्मिक मार्गावर आणण्यासाठी आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्याच्या पैलूतून कवीने परिवर्तनात्मक संदेश आपल्या लिखाणातुन दिला आहे.
चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेने वाढतो त्याचप्रमाणे श्री. कुलकर्णी यांचे साहित्यक्षेत्रातील कार्य दिवसेंदिवस वाढत जावो. त्यांच्या नवनवीन कविता,लेख वाचकांना वाचायला मिळत जावो. आवड असली की सवड मिळते या उक्तीप्रमाणे त्यांचे कार्य आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात कायम व्यस्त असणाऱ्या पिढीला त्यांच्या कविता वाचल्यावर मानसिक समाधान मिळते. शेवटी समाधान हे कुठल्या बाजारात विकत मिळत नाही तर व्यक्तीच्या विचारावर अवलंबून असते. असेच सकारात्मक, सुखी, आनंदी आणि समाधानी विचार कवितेच्या रूपातून समाजाला नवी दिशा देत आहेत.
एकत्र येणे ही सुरुवात
एकमेकांसोबत राहणे  ही प्रगती
एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश
आणि एकमेकांचा आदर करणे म्हणजे संस्कृती.
या सर्व गोष्टींच्या अनमोल संगमातून श्री. कुलकर्णी यांची यशस्वी वाटचाल चालू आहे. त्यांच्या अंगी असलेला संयम, कामाबद्दल एकनिष्ठता, कलेबद्दल नितांत आपुलकी, इतरांबद्दल त्याग भावना, अध्यात्मिक परिवर्तनाची कास, समाज परिवर्तनासाठी संघर्ष यातून लेखनाच्या उज्वल परंपरेचा वारसा पुढच्या पिढीला देण्याचे उत्कृष्ट कार्य आपल्या मार्मिक व अर्थपूर्ण  विचारातून करत आहेत. फुलाचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने पसरतो पण व्यक्तीच्या कार्याची महती समाजाच्या चहू दिशांना पसरते. कुशल विद्युत अभियंता ते कवी व लेखक म्हणून श्री. कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवन प्रवास समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. श्री कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घआयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
लेखिका
डॉ. ज्योती रामराव रामोड.
बाबुरावजी घोलप महाविद्यालय
पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा