You are currently viewing वाईट दिवसात तुम्ही आलात, .. बरं वाटलं

वाईट दिवसात तुम्ही आलात, .. बरं वाटलं

मातोश्रीवरील बाळा गावडे शिवसेना प्रवेश प्रसंगी उद्धव ठाकरे यांचे उद्गार

चंद्रकांत उर्फ बाळा गावडे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे जवळपास ९० टक्के लोकप्रतिनिधी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेले होते. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधींसोबत चंद्रकांत उर्फ बाळा गावडे हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले.
नारायण राणे यांनी काही वर्षे काँग्रेसमध्ये मंत्रिपद भूषवले,परंतु मुख्यमंत्रीपदी काँग्रेसने संधी न दिल्याने काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला व काही काळानंतर स्वतःचा पक्ष देखील भाजपमध्ये विलीन करून भाजपवासी झाले. नारायण राणे यांच्यासोबतचे त्यावेळीचे त्यांचे काही जुने कार्यकर्ते काँग्रेसमध्येच राहिले तर काही शिवसेनेमध्ये स्वगृही परतले होते. सावंतवाडी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम केलेले काँग्रेसचे बाळा गावडे यांनी मात्र काँग्रेसमध्येच राहणे पसंद केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत जिल्हाध्यक्ष पदावरून पाय उतार होताच, बाळा गावडे यांच्याकडे काँग्रेसने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये बाळा गावडे यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेतली जाणार अशा बातम्या पसरल्या होत्या. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बाळा गावडे यांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब केले.
याचवेळी शिवसेना पक्षात बंड होऊन एकनाथ शिंदे सह सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर शिंदे गटात सामील झाले. भाजपच्या सोबतीने महाराष्ट्रात शिंदेगटाने सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडून अनेक नेते लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार व अनेक मातब्बर नेते गेल्यामुळे शिवसेनेकडे जुन्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा आपली वाट वळवली आहे. सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेकडे नेतृत्वाची असलेली संधी याचा फायदा घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी तडकाफडकी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत तडक मातोश्री गाठले आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश करत शिवबंधन बांधले. आपले जुने शिवसैनिक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे पुन्हा एकदा स्वगृही परतल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळा गावडे यांच्या प्रवेशावेळी *वाईट दिवसात तुम्ही आलात मला खूप बरे वाटले,विसरणार नाही* असे भावुक उद्गार काढले. बाळा गावडे यांनी देखील येणाऱ्या काळात ही संघटना पुन्हा एकदा जोमाने उभी राहण्यासाठी व पक्षाला बळकटी देण्यासाठी आपण झोकून देऊन काम करणार अशी ग्वाही दिली. एकीकडे शिवसेनेला सोडून अनेक लोकप्रतिनिधी, नेते, शिवसेना शिंदे गटाकडे सत्तेत समाविष्ट होत असताना शिवसेनेचे मध्यंतरीच्या काळात दुर्लक्षित राहिलेले शिवसैनिक, नेते, लोकप्रतिनिधी हे मात्र आलेल्या संधीचा फायदा घेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षांमध्ये सामील होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 9 =