You are currently viewing हेरगिरी (भाग-२) – ब्रिगेडियर सुधीर सावंत

हेरगिरी (भाग-२) – ब्रिगेडियर सुधीर सावंत

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख –
हेरगिरी (भाग-२)

ड्रग्स हे पाकिस्तानचे मोठे हत्यार आहे. अफू व अफूपासून तयार होणारी हिरोईन ही आंतरराष्ट्रीय राजकरणात थैमान घालत आहे. अफू, कोकेन, औषधी ड्रग्समुळे प्रचंड पैसा माफियाच्या हातात जातो. त्यातून ते सरकार सुद्धा विकत घेऊ शकतात, झाले ही तसेच. अनेक देशामध्ये या माफियाचे सरकार आहे. ड्रग्सचा प्रचंड पैसा माफिया कायदेशीर उद्योगात गुंतवते, म्हणून गेल्या ३० वर्षामध्ये अनेक उद्योगपती अचानक निर्माण झाले. हे सर्व ड्रग्स माफियाच्या पैशावर निर्माण झाले. पैशामुळे राजकारणातून आपल्या विरोधकांना बाजूला काढले व गुन्हेगारांना राजकारणी केले. म्हणून जगामध्ये प्रचंड भ्रष्टाचार, लाचलुचपत आणि माफियाची दहशत वाढत गेली. गुप्तहेर खात्याच्या सर्व प्रमुखांनी व्होरा समितीमध्ये हेच म्हटले आहे. “या देशावर सरकारचे राज्य नसून माफिया, राजकीय नेते आणि भ्रष्ट अधिकार्‍यांचे समांतर सरकार राज्य करत आहे”. १९९३ च्या बॉम्ब स्फोटानंतर मी १०० खासदारांच्या सह्या घेवून व्होरा समिती गठीत केली होती. त्याचबरोबर, मी ड्रग्स आणि आतंकवाद यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करून घेतली होती. अर्थ राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या समितीत मी ४ वर्ष काम केले. पण सरकारने या समितीचा अहवाल दाबून टाकला. त्यावेळीच जर सरकारने आणि नंतरच्या सरकारने कृती केली असती तर भारतात इतके वर्ष चाललेला आतंकवाद आणि हिंसा झाली नसती.

आता ड्रग्स माफियाच्या हातात अनेक उद्योगपती आहेत. बॉलीवुड आहे आणि यांच्या हातात राजकारणी आहेत. म्हणून समांतर सरकार राज्य करते हे विधान पर्याप्त आहे. ड्रग्समुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील संदर्भच बदलले आहेत. ड्रग्समुळे निर्माण झाले आहेत डॉन. या डॉनकडे इतकी संपत्ती झाली आहे की, जगातील पहिल्या १० श्रीमंत माणसात डॉन लोकांची एंट्री झाली आहे. त्यात दाऊद इब्राहीम हा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताचा गुन्हेगारी विश्वाचा सम्राट आहे. युनोने त्याला अलक़ैदाचा पाठीराखा म्हणून जाहीर केले आहे. त्याला जागतिक आतंकवादी जाहीर करण्यात आले आहे. याबद्दल ट्रम्प आणि पाकिस्तान प्रधानमंत्री इम्रान खान मध्ये फेब्रुवारी मध्ये शिखर वार्ता झाली. त्यात आतंकवादावर चर्चा झाली. पण अमेरिकेने नेहमीप्रमाणे पाकला आपला मित्र जाहीर केला. अमेरिकेचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे वेगळे असतात. म्हणूनच १९८० नंतर जगात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगाला आपल्या दावणीला बांधत आहेत. ड्रग्स हे आजकाल पैशाचे सर्वात मोठे स्तोत्र आहे. प्रचंड पैशातून ड्रग्स डॉन प्रत्येक देशातील सत्तेवर कब्जा करत आहेत.

ह्या ड्रग डॉनना प्रत्येक देशातील गुप्तहेर संघटनानी मोठे केले आहे. दुसऱ्या देशात हेरगिरी करणे सोपे नसते. म्हणून जसे पाक ISI ने दाऊद टोळीला आपले हस्तक बनवले. तसेच प्रत्येक देशातील गुप्तहेर संघटना शत्रू देशातील संघटित गुन्हेगारांना वापरते. हे सर्वश्रुत आहे की १९९३ ला मुंबईत घडलेला बॉंबस्फोट ISI च्या मदतीने दाऊद टोळीने घडवला. त्याचप्रमाणे जगात सगळीकडे अधिकृत सरकार गुन्हेगारांना आसरे देते. गुन्हेगारांचा वापर हेरगिरीसाठी आणि शत्रू देशात दहशतवाद घडवण्यासाठी करतात. ओसामा-बिन-लादेनला पाकिस्तानच्या मिलिटरी अकॅडमी जवळ मारण्यात आले. ते पाकिस्तानच्या ISI च्या मदतीशिवाय शक्य नव्हते. पण पाकिस्तान असे भासविते कि त्यांना माहितीच नाही. म्हणून अमेरिकेने ओसामाला कैद न करता निर्दयपणे मारले व समुद्रात फेकून दिले. वास्तविक ओसामाला जिवंत ठेवून त्याच्याकडून त्याच्या संघटनेची माहिती घेता आली असती आणि आतंकवादाला पूर्ण विराम देता आला असता. पण ओसामाला मारून त्याला शहीद करण्यात आले आणि आतंकवाद चालूच राहिला.

त्याला मोठे कारण म्हणजे ओसामाला पाकिस्तान ISI आणि अमेरिकन गुप्तहेर विभाग CIA यांनीच उभे केले. रशिया विरुद्ध वापरले आणि त्याचा उपयोग संपला तेव्हा मारून टाकले. पाकिस्तानचा मोठा भाग आतंकवाद्यांच्या हातात आहे. तालिबानचे पाठीराखे आणि दाऊदचे पाठीराखे ISI हे एकच आहेत. आता अमेरिकेला अफगाणिस्तान मधून पलायन करायचे आहे. त्या कामात तालिबानला शांत करायचे काम पाकला अमेरिकेने दिले आहे. त्यात दाऊद टोळी तालिबानला जोडण्याचे काम करत आहे. दाऊदचा संबंध तलीबानबरोबर ड्रग्समुळे आला. अफगाणिस्तान हे जगातील ९०% ड्रग्सचा पुरवठा करते. त्यावर दाऊद टोळीचे पूर्ण नियंत्रण आहे. अफगाणिस्तान मधून ड्रग्स पाकिस्तानमध्ये तालिबान आणते. त्याबद्दल त्यांना प्रचंड पैसा व हत्यारे मिळतात. मग ISI आणि दाऊद टोळी ड्रग्सला भारतात पेरते. काश्मिर आतंकवाद हा ड्रग्सचा आतंकवाद आहे. म्हणूनच काश्मिरमध्ये एकही खासदार आमदाराचा खून झाला नाही. उलट १०,००० सैनिकांची हत्या झाली.

ओसामा-बिन-लादेनला निर्माण अमेरिकेनेच केले. त्याचा पूर्ण फायदा पाकिस्ताने उचलला. सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या मदतीचा फायदा घेत भारतात आतंकवाद निर्माण केला. ८० चे दशक भारतीय सैन्याला फार भारी पडले. पंजाब, काश्मीर, आसाम, श्रीलंका येथे एकाच वेळी घनघोर युद्धाला सामोरे जावे लागले. अमेरिकेने पाकला सर्वोतोपरी मदत केली. युद्धसामुग्री, आधुनिक हत्यारे, आर्थिक मदत सर्व दिले. पूर्ण अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था अफुवर अवलंबून आहे. अमेरीकेने आणि पाकने अफूच्या तस्कऱ्यांना, शेतकऱ्यांना आणि तेथील डॉनला मदत केली. म्हणून त्यांनी रशिया विरुद्ध संघर्ष केला. तालिबान सरकार आल्यावर त्यांनी अफुवर बंदी आणली. म्हणून qसर्व शेतकरी व डॉन तालिबान सरकारविरुद्ध गेले व अमेरीकन हल्ल्याला मदत केली. त्यात तालिबानचा २००२ पर्यंत खात्मा झाला. पण पुढे जावून तालिबानने अफूच्या तस्करीला पाठींबा दिला. म्हणून दाऊद त्यांचा लाडका झाला. तसेच सर्व आतंकवादी लोक अफूच्या तस्करीत शामिल झाले. म्हणून गेल्या २५ वर्षात अफूचे तस्कर सर्व दाऊदच्या नेतृत्वाखाली काम करू लागले व दाऊद जगातील सर्वात शक्तिशाली डॉन झाला आहे. त्यात पाकिस्तान ISI चा त्याला पूर्ण पाठींबा नव्हे तर भागीदारी आहे.

अफगाण, पाकिस्तान आणि भारतातील नेते दाऊदच्या खिशात आहेत. आज ह्या सर्व देशांना दाऊद चालवतो. आफ्रिका आशियातील अनेक सरकारे त्याच्यावर अवलंबून आहेत. कधी नव्हे तेवढी शक्ती दाऊदमध्ये एकवटली आहे. अमेरिकेचा देखील कुठे तरी छुपा पाठींबा असणारच. ह्या सर्वाचा परिणाम आपल्याला मुंबईत दिसत आहे. सुशांत सिंह केस मधून बॉलिवूड ड्रग्स दुनियेचा स्फोट झाला. दीपिका पदुकोन, कंगना राणावत, श्रध्दा कपूर, रिया अशा अनेक सिनेतारकांना Narcotics Control Bureau (NCB) ने चौकशीसाठी बोलावले. कसली चौकशी? तर ड्रग्स कोणी आणि केव्हा घेतले. त्यासाठी NCBने गुप्त मोबाईल वरील संभाषणाचा वापर केला आहे. NCB कुणालाच माहीत नव्हती, म्हणून त्या अधिकाऱ्यांनी संधीचा फायदा घेऊन सिनेतारकांना या ड्रग्समध्ये ओढले व प्रचंड प्रसिद्धी मिळवली. पण त्यांनी ड्रग माफिया विरुद्ध काहीच पावले उचलली नाहीत. गेली ४० वर्ष ड्रग्स माफिया भारत भर काम करत आहे. पंजाबला उडता करून टाकला. मुंबई आणि देशातील आपली तरुण मुले प्रचंड प्रमाणात ड्रग्स घेत आहेत. शाळा, कॉलेजच्या बाहेर मुले ड्रग्सची विक्री करतात. ड्रग्स पार्ट्या चालतात. त्यात बॉलीवुड अग्रगण्य आहे. एकंदरीत व्यभिचार, वासना आणि नशेमध्ये आजची तरुणाई गुंग होत आहे. सरकारी यंत्रणा कुठेतरी ड्रग्स घेणार्‍यांना आणि छोट्या-मोठ्या ड्रग्स पुरवणार्‍या लोकांवर कारवाई करताना दिसते. पण ह्या ड्रग पुरावणार्‍या डॉनवर काही कारवाई होत नाही. कधीतरी कुठेतरी ड्रग्स घेतल्याच्या आरोपावरून फक्त सिनेतारकांना प्रसिद्धीसाठी फिरवले जात आहे. मूळ ड्रग्सचा शहनशहा आणि त्याचे साथीदार मुक्तपणे वावरत आहेत. IPL बघत आहेत. मंत्र्या-संत्र्याबरोबर फिरत आहेत. म्हणून कुणालाच काही पडले नाही. ड्रग्सचे सेवन झपाट्याने वाढत आहे. मुले बरबाद होत आहेत, समाज बरबाद होत आहेत, पण कुणाला काही करायचे नाही. हा भारताला सर्वात मोठा धोका आहे.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 6 =