You are currently viewing वारस (भाग १२)

वारस (भाग १२)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री आसावरी इंगळे लिखित अप्रतिम कथा*

*वारस (भाग १२)*

“जुई… जुई… “, ती रडवेल्या स्वरात मोठमोठ्याने आवाज देऊ लागली. जुईचा कुठेच पत्ता नाही पाहून तिचा संयम सुटला.

“शालू… शालू… “, तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.

“काय झालं गं?”, खोलीतून बाहेर येत शालूने विचारलं.

“जुई.. जुई…”, पुढे तिला काही बोलवेना.

“जुई.. जुईचं काय?”, तिने कामिनीला गदागदा हलवत विचारले.

“जुई…दिसत नाही गं घरात..माहित नाही कुठे गेली..!”, ती कशीबशी उत्तरली.

“दिसत नाही म्हणजे? ..अगं असेल कुठेतरी अंगणात, बागेत.. जाईल कुठे ती एवढीशी पोर! गण्या, चिमाजी, माळी काका.. जुईला पहा बरं जरा..”, ती सूचना द्यायला गेली तेवढ्यात राघो बाहेर आला. कामिनी दारातून मागच्या बागेत पाहत होती.

“काय झालं बोंबलायला सकाळी सकाळी?”, राघोने विचारले तशी कामिनी गर्रकन वळली.

“जुई…जुई…. क.. काही नाही..”, ती वाक्य पूर्ण न करता तिच्या खोलीत गेली.

“जुई हरवली..”, शालूने आत येत सांगितले. तिचा आवाज भरून आला होता. डोळ्यात पाणी तरळत होतं.

“काय? जुई हरवली?..कशी?”, राघोला धक्का बसला.

“माहित नाही रे कुठे गेली..तू बघतोस का जरा प्लीज?”, शालूची विनंती त्याला मोडवेना.

“बरं झालं गेली पीडा एकदाची..”, असे त्याने म्हटलं खरं पण त्यात विशेष जोर नव्हता. बोलून दाखवलं नसलं तरी त्याला तिचा चांगलाच लळा लागला होता.

“हा राघोचा बंगला आहे. आजपर्यंत या बंगल्यातून कधी काही चोरी गेलं नाही. त्याची पोर काय जाईल?”, त्याने तावातावात म्हटलं तसं शालूने चमकून त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे राघो जुईला मुलगी मानू लागलाय तर! फक्त उघडउघड मान्य करत नाही! त्याने तिची नजर चुकवली. जुई घरातून गेल्याचं आपल्याला आनंद होतोय की दुखः हेच त्याला कळेना.

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + fourteen =