काँग्रेस, राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई
संपादकीय….
शिवसेना भाजपाची जवळपास २५ वर्षे “फेव्हीकॉल का मजबूत जोड” सारखी घट्ट असलेली मैत्री मुख्यमंत्री पदाच्या तिड्यामुळे तुटली आणि महाविकास आघाडी सरकार २०१९ मध्ये अस्तित्वात आले. सत्तेपासून कोसो दूर फेकले गेलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अचानक तेजीत आले. अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील राजकारणात बिलंदर नेते म्हणून ओळख असलेले शरद पवार यांनी आघाडी घडवून आणत सत्तेची खुर्ची शिवसेनेकडे देत त्याची चावी मात्र स्वतःकडे आणि काही अंशी काँग्रेसकडे ठेवत शिवसेनेला गाजर दाखवत राहिले. शिवसेनेचे मवाळ दिसणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चाळीस मावळ्यांना हाताशी धरून भात्यातील दिव्य बाण आघाडीच्या दिशेने सोडत सत्तेच्या तिघाडीचे चाक उध्वस्त केले.
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या रथाचे सारथ्य केले तरी सत्तेच्या राजकीय खेळीत तरबेज नसणारे उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील बहुमताला सामोरे न जाता राजीनामा दिला आणि तिथेच पवारांची रणनीती फसली….महाविकास आघाडी सरकार कोसळले. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी तीन नंबर वर तर काँग्रेस चार नंबर वर होती. दिवसेंदिवस दोन्ही पक्षातील शिलेदार सेना, भाजपाकडे पक्षांतर करत होते, परंतु महाविकास आघाडीची सत्ता येताच काँग्रेस राष्ट्रवादीला जिल्ह्यात चांगले दिवस आले होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी जिल्ह्यातील संघटना मजबूत केली तर राष्ट्रवादीने सत्तेचा सर्वात जास्त फायदा उठवत जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष जोमाने वाढवला होता. मंत्र्यांचे दौरे आणि पक्षाकडे कार्यकर्त्यांची आवक वाढली होती. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकरांनी अचानक उठाव करून मंत्रिमंडळातून बाहेर पडलेल्या शिंदेंगटाची प्रवक्ते पदाची धुरा सांभाळत बंडखोर गटात सामील झाले आणि जिल्ह्यातील सत्ता समीकरणे पूर्णतः बदलली. आमदार केसरकरांवर शिवसेनेचे कट्टर असलेले नेते टीका करू लागले परंतु उठाव करून बाहेर पडल्याने सत्तेतून काँग्रेस राष्ट्रवादीला जावे लागल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेतेही केसरकरांवर तोंडसुख घेऊ लागले. त्यामुळे शेजारच्या घरात लागलेल्या आगीची झळ आजूबाजूच्या घरांना जास्त पोचल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभे राहिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्तेत असल्याने अनेकांनी भाजपाचा व इतर छोट्या छोट्या पक्षांचा त्याग करून राष्ट्रवादी, काँग्रेस मध्ये प्रवेश करून रिक्त असलेली पक्षांतील पदे मिळवली होती. परंतु अचानक राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेपासून दूर झाल्यामुळे दोन्ही पक्षातील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा, शिवसेना पक्षांकडे आकर्षित होण्याची दाट शक्यता आहे, कारण सत्तेची फळे ही नेहमीच गोड असतात. परिणामी राष्ट्रवादी, काँग्रेसला जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपड करावी लागण्याची शक्यता वाढली आहे. सत्तेत असलेल्या पक्षांकडून लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांना रोजच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संधी उपलब्ध असतात. राजकारणाशी संबंधित अनेक कार्यकर्ते राजकारण हाच व्यवसाय असल्यासारखे वावरत असतात. त्यामुळे अशा राजकारण्यांनी एक नवी संधी म्हणून सत्तेतील पक्षांकडे पाहिले तर नवल वाटू नये.