You are currently viewing प्राक्तन

प्राक्तन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

*प्राक्तन ….*

जो जो जीव जन्माला येतो तो आपले प्राक्तन घेऊन येतो
असे सारेच म्हणतात . म्हणून आपणही ते स्वीकारतो.
कुणी पाहिले का हो हे प्राक्तन ? नाही..
पण बरे आहे हो , ही प्राक्तन वगैरे भानगड आहे ते बरेच
आहे हो? नाही तर ..? आपले काय झाले असते.
ह्या प्राक्तन नशिब भोग विधीलिखित या गोष्टींचा फार मोठा आधार आहे बरं जीवनाला, नाही तर आपण कोलमडूनच पडलो असतो.

आता बघा, महान अशा गांधार देशाची राजकुमारी गांधारी.
भिष्मांनी तिला आंधळ्या राजकुमारासाठी धृतराष्ट्रासाठी वधू
म्हणून आणले.एका महान देशाची सौंदर्यवती राजकुमारी एका
अंध राजपुत्राची वधू नियुक्त व्हावी व तिच्या पोटी भयंकर असे
महाभारत घडवणारे १०० कुपुत्र (अपवाद विकर्णाचा)निपजावे
व त्यांनी संपूर्ण कुलनाश घडवून आणावा याचे उत्तर जेव्हा
आपल्याला मिळत नाही, तेव्हा आपण काय म्हणतो…
विधीलिखित त्यांचे ! प्राक्तन त्यांचे ! बघा , म्हणून मी सुरूवातीलाच म्हटले ना? बरे आहे हे प्राक्तन वगैरे आहे !
नाहीतर उत्तरच सापडले नसते आपल्याला ! आता ही ते
सापडत नाहीच पण निदान आपण प्राक्तनापाशी येऊन
थांबतो व निस्त्तब्ध होतो. तिथे डेड एण्ड आहे नि तो आपण
स्वीकारलेला आहे. उत्तर मिळाले नाही की प्राक्तन म्हणायचे
नि गप्प बसायचे! कोणी त्यावर वाद ही घालत नाही. कारण
वाद घालून तरी उत्तर मिळणार आहे का ? नाही. मग वाद
घालून उपयोग काय?

बरे, हे प्राक्तन अजून कोणी पाहिलेही नाही. ग्रंथांमध्ये ते
लिहिलेले आहे, आणि हे ग्रंथ लिहिणारे कुणी साधेसुधे
नाहीत तर प्रकांड पंडित आहेत.त्यांच्या ज्ञाना विषयी कुणाला
कणभरही शंका असण्याचे कारण नाही इतक्या त्या व्यक्ती
महान आहेत . मी खुद्द लोकमान्य टिळकांनी लिहिलेली गीता
सुमारे दोन महिने थोडी थोडी वाचली. बरीचशी डोक्यावरूनच
गेली, कारण त्यांनी लिहिलेले पचवण्याइतके आपले डोके
सुपिक हवे ना? तसे ते नाही , त्याला आपण काय करणार ?
म्हणून इतक्या विद्वान व्यक्तिंच्या म्हणण्याला आपण मान्यता
द्यायलाच हवी व आपण एकमताने ती दिली आहे, हे खरे आहे.
टिळक अत्यंत बुद्धिमान होते. गणित इंग्रजी व संस्कृत यांत
त्यांचा हातखंडा होता. मंडालेच्या तुरूंगात असतांना सखोल
अभ्यास करून अगदी शास्रीय पद्धतीने, खगोल शास्राचाही
अभ्यास करून त्यानी काही ग्रंथ लिहिले. त्याला शास्रीय
परिमाण आहे. व वेद पुराणांचाही आधार आहे.एकटे टिळक
नाहीत तर अनेक विद्वानांचे गीता, प्राक्तन, विधिलिखीत ,
पुण्यसंचय ,त्यानुसार भोगावे लागणारे भोग , वेदविद्या ,
पुराणे यांचे विवेचन करणारे ग्रंथ आहेत व ते आपल्याला
शिरसावंद्य आहेत यात मुळीच शंका नाही.

श्रीकृष्ण म्हणतात, मी काही ही करत नाही, सारे ठरल्यानुसारच घडते. बघा, म्हणजे काही प्रश्नच उरत
नाही. मग तरीही आपण एवढी उरस्फोड का करतो?
कारण आपण सामान्य माणसे आहोत. आपला आपल्या
भावनांवर ताबा रहात नाही.त्यामुळे काही अघटीत घडले
की आपण हतबल होतो व नशिबाला दोष देतो. माझे
नशिबच खोटे म्हणत नशिबावर आपल्या अपयशाचे खापर
फोडतो. आपण प्रयत्नात कुठे तरी कमी पडलो हे स्वीकारायला आपण तयारच नसतो. प्रयत्ने वाळूचे …
आपल्याला माहित आहे. मग आपण आपली कमतरता,
आपले अपयश यांचे खापर नशिबावर का फोडतो?आपण
खूप प्रयत्न करून, मेहनत करून, सर्वस्व पणाला लावून
अपयशी ठरलो तर मग प्राक्तन नशिब यांना दोष दिला तर
हरकत नाही.

टिळकांनी दोन वेळा गणितात एम ए ची परिक्षा दिली.
पण ब्रिटिश सरकारशी त्यांचा रोजच खडा झगडा होता.
त्यामुळे त्या इंग्रज प्रोफेसरने त्यांना दोन्ही वेळा नापास केले.
टिळकांचे त्यामुळे काय बिघडले ? त्यांना माहित होते हा
इंग्रज आपल्याला पास करणार नाही. त्यांनी त्याचा नाद
सोडून दिला. व इंग्रज सरकारला सळो कि पळो करून सोडले,
व त्यांची रवानगी दूर मंडालेला, सहा वर्षांसाठी झाली. तिथे
ही टिळक स्वस्थ बसले नाहीत, कुठल्याही सुविधा व औषधे
नसतांना कित्येक दिवस केवळ सातूचे पीठ खाऊन अनमोल
असा गीतेवरचा गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. ते म्हणाले का
माझे नशिब वाईट? माझे प्राक्तन खराब ? नाही, जे जे
समोर येईल ते ते स्वीकारत ते गीतेतच सांगितल्या प्रमाणे
नियोजित कर्म करत राहिले कोणावरही दोषारोप न करता.

बघा ज्यांनी प्राक्तन वगैरे गोष्टी आपल्याला समजाऊन दिल्या
ते टिळक आपले नियत कर्म करत राहिले , याला म्हणतात
सच्चा कर्मवादी! बिहार मधील शेकडो विद्यार्थी यू पी एस सी
परिक्षा झटक्यात पास होतात ते नशिबामुळे का ? नाही, तर
प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळेच! मला वाटते एवढे एकच
उदाहरण आपल्याला पुरेसे आहे हा विषय समजून घ्यायला!
जास्त भाष्य करण्याची गरज नाही .
तर मंडळी, प्राक्तन वगैरे जे काही आहे त्याला त्याचे काम करू
द्या व आपण आपले काम करा , म्हणजे प्रयत्नात कमी पडू नका म्हणजे कुणावर खापर फोडण्याचीच गरज पडणार नाही.
लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी धम्मक असेल तर
आयुष्य हातात हार घेऊन उभे राहते, हार होतच नाही, आणि
झाली तरी ती स्वीकारत पुढे पुढे पुढेच जायचे असते हे नेहमी
लक्षात ठेवा.
थांबते , धन्यवाद …

आणि हो, नेहमी प्रमाणे ही फक्त माझी आणि माझीच
मते आहेत.🙏🏼🙏🏼

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १७ जुलै. २०२२
वेळ : संध्या: ६ : ४१

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 5 =