सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील इंडोस्कोपी मशीन तातडीने दुरुस्त करा; नवीन मशीनचीही मागणी
गोरगरीब रुग्णांना खाजगी तपासणीसाठी हजारो रुपयांचा भुर्दंड; राजू मसुरकर यांची प्रशासनाकडे मागणी
सावंतवाडी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोटातील विविध आजारांचे निदान करण्यासाठी वापरण्यात येणारी इंडोस्कोपी मशीन वारंवार नादुरुस्त होत असल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती घेतली.
चौकशीअंती उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांना इंडोस्कोपी मशीन दुरुस्त करण्याबाबत लेखी पत्र दिल्याचे समोर आले. तसेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मशीनच्या दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीशी वार्षिक देखभाल करार (AMC) करणे आवश्यक असते. मात्र, ही प्रक्रिया वेळेत न झाल्याने मशीन वारंवार बंद पडत असल्याचे निदर्शनास आले.
सध्या रुग्णांना इंडोस्कोपी तपासणीसाठी खाजगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत असून त्यासाठी सुमारे पाच हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे मसुरकर यांनी सांगितले.
इंडोस्कोपी मशीनची दुरुस्ती महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून तातडीने करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अतिरिक्त नवीन इंडोस्कोपी मशीन उपलब्ध करून देण्यात यावी, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
यासाठी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाकडे नवीन मशीनसाठी प्रस्ताव सादर करावा. जिल्हा नियोजन समिती अथवा सीएसआर निधीतून नवीन मशीन उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा आणि त्यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाला लेखी मागणी पाठवावी, अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे.
