You are currently viewing गिताख्य अमृत…!!
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

गिताख्य अमृत…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललित लेख*

*गिताख्य अमृत…!!*

हिंदू धर्मात जयंती साजरी करण्याचा मान केवळ श्रीमद् भगवद्गीतेला प्राप्त झाला आहे. भगवान श्रीकृष्णांनी केलेले उपदेश आजही मानवाला मार्गदर्शक ठरत आहेत.
*कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन*
कर्माच्या हेतूत मन गुंतवून फळाच्या आशेने कर्म करू नकोस…म्हणजेच वैयक्तिक भावनेवर विजय मिळवण्याचा उपदेश भगवान श्रीकृष्णाने क्षत्रिय अर्जुनाला केला आहे.
“नियतं कुरु कर्म त्वं”!
तुझे कर्म तू कर…या जगात आपल्या वाट्याला आलेले कर्म आपण केलेच पाहिजे. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी हा कर्मयोग केलेला आहे…आणि खरंतर कर्म कोणालाही टाळता येत नाही. जे केवळ कर्मफलाच्या इच्छेने प्रेरित असतात ते दुःखी असतात, कारण ते कर्माच्या परिणामाची सतत चिंता करत असतात.
श्रीकृष्ण सांगतात, कर्म मला बांधत नाही, कारण मला कर्माच्या फळाची लालसा नाही. माणूस जन्माने नाही तर कर्माने महान बनतो. माणसाने भविष्याची चिंता सोडून वर्तमानातील कर्मावरच लक्ष केंद्रित करावे. कारण वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच काही मिळत नाही. वर्तमानात श्रम, मेहनत, परिश्रम घेतले तरच भविष्यात आनंदात जगता येईल… सुखप्राप्ती होईल हे निश्चित…!

मानव कल्याण हे भगवद्गीतेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे मानवाने कर्तव्य बजावताना मानव कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे. जे झालं ते चांगलंच होतं, जे घडतंय ते चांगल्यासाठीच होतंय, जे होईल तेही चांगलंच होईल. हेच केशवाने भगवद्गगीतेमध्ये सांगितलं आहे. दुसऱ्याच्या जीवनाचे अनुकरण करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःचे नशीब अपूर्ण जगणे चांगले. कारण जे स्वतःचं असतं तिथे अपूर्णावस्थेतही जास्त समाधान भेटतं.
धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार मुख्य पायावरच हिंदू धर्म आधारलेला आहे याचाच पुरस्कार श्रीकृष्णाने गितेत केलेला आहे.
एखादं काम यशस्वीरीत्या पूर्ण झालं म्हणून अत्यानंदित होऊ नये… अन् आपणांस सफलता प्राप्त झाली म्हणून दुसऱ्याचा द्वेष, ईर्षा करू नये…त्याने मानसिक स्वास्थ्य, शांतता राखण्यास असमर्थ ठरतो…
*आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात…*
*आयुष्य आहे केवळ वर्तमानात…!* वर्तमान सुंदर बनवा भविष्य आपोआपच उज्वल होत राहील…! क्रोध मनात असू नये, क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊन तो स्वतःचेच नुकसान करतो. असं तूच सांगितलंस ना..?
मग, हे केशवा,
माणसं क्रोधित होऊन दुसऱ्यांना नुकसान का पोचवत आहेत?
राधेच्या देह त्यागानंतर तू सुद्धा राधेच्या विरहात तुझी प्राणप्रिय बासरी मोडून तोडून टाकलेली… त्याला तुझा क्रोध तर समजत नसतील ना रे…?
राधा आणि कृष्ण तरी कुठे वेगळे होते…?
आणि जर दोघेही एकच होते तर तू का राधेच्या वियोगाने व्यथित झाला होतास…?
वर्तमानात जगण्याचे सामर्थ्य पण तूच देतोस ना..?

भगवंतावर श्रद्धा, विश्वास ठेऊन स्वच्छ, निर्मळ मनाने जो भगवंताचा स्विकार करतो तोच खरा भक्त…!
हृषिकेशा…असाच भक्त तुला अतिप्रिय आहे, हो ना…?
नि:संदेह कोणीही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय राहत नाही…तुझ्याच सांगण्याप्रमाणे पृथ्वीतलावर जन्म घेणारा प्रत्येकजण कर्म करण्यास बांधील आहे … आपल्यातील प्रतिभा, कलागुण ओळखून आवडीचे कार्य केल्यास आनंद प्राप्त होतोच…आणि यश व प्रगतीचे प्रशस्त मार्गही मोकळे होतात असं तूच सांगतोस ना…? परंतु ते तरी कुठे कोणाच्या ध्यानात येतं?
मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळविल्याचे भासवत असतो परंतु आतून तो त्याचाच विचार करत असतो…इंद्रियांच्या जगात कल्पिलेल्या सुखांना आरंभ आणि अंत असतो आणि ते दुःखाला जन्म देतात. जेव्हा मनुष्य इंद्रियसुखावर वास करतो, तेव्हा त्याच्यात आकर्षण निर्माण होते, आकर्षणातून इच्छा उत्पन्न होते, ताब्यात घेण्याची लालसा,
आणि यामुळे उत्कटतेकडे, रागाकडे नेले जाते. वासना, क्रोध आणि लोभ हे नरकाचे तीन दरवाजे आहेत.
म्हणून तर केशवा तू वासना, क्रोध आणि लोभ त्याग करून जनकल्याण करून मनुष्य जन्माचे सार्थक करण्यास प्रेरित करतोस ना..!

युगंधरा… खरंच रे….
परमेश्वर कृपेने प्राप्त जीवनात दिखाऊपणा करणारी व्यक्ती असत्यवचनी आणि कपटीच असते. अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती या इंद्रियांवर नियंत्रण मिळविले तरच खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती मिळते ना…? तरीही लोक असे का रे वागतात…?
अपेक्षा, आशा इत्यादींच्या मोहास का बळी पडतात?
योगेश्वरा…
तू तर तुझ्या प्राणप्रिय राधेस…आपल्या गोकुळास सोडून मथुरेस आला होतास…अगदी कायमचाच… “धर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ” म्हणून उपदेश देत ना नात्यागोत्यात अडकून राहिलास ना कुठल्या बंधनात अडकलास…ना कधी भावनांच्या आहारी गेलास…ना इच्छा, अपेक्षांच्या बेड्या पायात अडकवून घेतल्यास… तूच जर आशा, इच्छा बाळगून आसक्त होऊन कर्मापासून दूर गेला असतास तर…? या पृथ्वी तळावरील लोकांनी काय बोध घेतला असता?
माधवा… तू म्हणजे निस्वार्थ त्याग काय असतो ह्याचं उत्तम उदाहरण आहेस…लोक तुझी भक्ती करतात…तुला मनोभावे पूजतात…तरीही ते स्वार्थात का रे बरबटून जातात?
गोविंदा…
जे तुझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योगशक्तीचे तत्व जाणतात ते निश्चल भक्तीयोग युक्त होतात…हे निश्चित…! एवढं जाणूनही मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून का स्विकार करत नाही?
हे केशवा…
यज्ञ, दान व तप रूपी कर्मे आसक्ती आणि कर्माच्या फळांचा त्याग करूनच केली पाहिजेत असं तू नित्य सांगतोस…
म्हणजे दुःखाच्या भीतीने कोणीही सर्व कर्मे सोडून देईल तर त्याला राजस त्यागाचे कोणतेही फळ मिळणार नाही ना…?
तरीही लोक आज स्वार्थाकडे वाहवत का चाललेत…? तू त्यांना अडवत का नाहीस…?
योगेश्वरा ….
फळाची अपेक्षा धरणारा मनुष्य आसक्तीमुळे अर्थ, धर्म व काम यांना धारण करतो ती धारणा राजसी असं तू म्हणतोस…आणि दुष्ट बुद्धीचा मनुष्य झोप, दुःख, काळजी, भीती अन् उन्मत्तपणा सोडत नाही ती धारणा तामसी होय ना…?
जो कर्तव्य, भय, अभय, बंधन, मोक्ष यथार्थपणे जाणतो ती सात्विक बुद्धी…! अन् जो हे जाणणार नाही ती राजसी बुद्धी… बरोबर ना…!
योगेश्वरा…
किती सुंदररित्या सहजपणे तू हे उपदेश केले आहेस…!
लोक तुझे उपदेश वाचतात… अन् काही क्षणात विसरून जातात…
असं म्हणतात की, श्रीकृष्णा तू सर्वत्र आहेस, होतास…राहणार…
तू कौरवांमध्येही होतास आणि पांडवांमध्ये सुद्धा…! फरक इतकाच होता…
*कृष्ण कौरवांमध्ये होता, परंतु कौरवांमध्ये कृष्ण नव्हता….*
पांडव तुला सोबत घेऊन निर्णय घेत आणि कौरव तुला वजा करून…!
त्याचे परिणाम सर्वच जाणतात नाही का रे…?
खरंच रे….
आजही लोक भगवंताला वजा करून जगण्याचा प्रयत्न करतात…कुटुंब, शिक्षण असो वा राजकारण…भगवंत सर्वांतून वजा होत आहेत…पांडव शोधावे लागतात आणि कौरवांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे…!
ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती नवीन वस्त्रे परिधान करते, जुने सोडून देते, त्याचप्रमाणे, आत्मा जुन्या आणि निरुपयोगी गोष्टींचा त्याग करून नवीन भौतिक शरिरे स्विकारतो. उत्कटतेतून मनाचा गोंधळ होतो, मग स्मरणाचा ऱ्हास होतो, कर्तव्याचा विसर पडतो, या तोट्यातून कारणाचा नाश होतो,
आणि कारणाचा नाश माणसाला विनाशाकडे घेऊन जातो. आत्मा विनाशाच्या पलीकडे आहे. चिरंतन असलेल्या आत्म्याचा कोणीही अंत करू शकत नाही.
इंद्रियांच्या जगात कल्पिलेल्या सुखांना आरंभ आणि अंत असतो आणि ते दुःखाला जन्म देतात. म्हणून कल्पित सुखांचा मोह टाळून वर्तमानात मिळत असलेल्या आयुष्यात समाधानी रहा…भौतिक सुखाचा मोह टाळून जे आपले आहे त्यातच सुख शोधा…!
केशवा…
तुझ्या मुखातून आलेल्या शब्दांमृताचा बोध घेऊन सर्वे जन चिंतामुक्त…शाश्वत जीवनशैली अंगिकारून सुखात…समाधानात जगू देत रे…!!

*©(दीपी)*
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − five =