You are currently viewing आईचा पदर ..

आईचा पदर ..

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना

बाबाला असतो खिसा पण आईला का नसतो
रोज रोज माझ्या मनाला प्रश्न का बरे पडतो ?
मी मागताच काही बाबा घालतात खिशात हात
हेवा वाटतो मनात मला ठरवतो काही मनात ..

आईला मात्र खिसाच नाही नवल वाटते किती
पदराआड लपताच मात्र पळते माझी भीती
उन्हात जाताच मी लगेच डोक्यावर टाकते पदर
लिमलेट ठेवते हातात म्हणते तोंडात धर …

पाटी पुस्तक दप्तर घेती बाबा देती पैसे
घाम येताच पदराने आई पुसत बसे
वारा घालते कधी मला खरकटे तोंड पुसते
पदर टाकते डोळ्यांवर नि मांडी हलवत बसते..

लागतो कधी डोळा माझा मुळीच समजत नाही
झोप मोडू नये म्हणून जागची हलत नाही
गाडी येताच खाऊची पदराची गाठ सोडते
बंदा रूपया लगेच माझ्या हातावरती ठेवते…

पाऊस आला तरी पदर माझ्या डोक्यावरती
हरएक गोष्टीची मदार तिच्या पदरावरती
पदर खोचून करते काम मग दिसते झाशी
आईचा पदर जणू आहे गंगा काशी….

खिसा नसला तरी तिचे मुळीच अडत नाही
पदर जणू आभाळ तिचा सारे कवेत घेई
पदरात तिच्या घरच सारे सामावूनच जाते
खिसा काय विश्वच सारे पदरामध्ये न्हाते..

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १३ जुलै २०२२
वेळ : दुपारी १२ : ३०

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 10 =