You are currently viewing दिवाळीतील आठवणींच्या रांगोळ्या
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

दिवाळीतील आठवणींच्या रांगोळ्या

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सौ भारती महाजन-रायबागकर यांचा अप्रतिम लेख

दिवाळीचा सण असतो वर्षातुन एक… त्याच्या आठवणी मात्र असतात अनेक…
रांगोळी, किल्ले, आकाशकंदील, पणत्या, दिव्यांच्या माळा, स्वच्छता, फराळ, नवीन कपड्यालत्त्यांचीखरेदी, फटाके अशा अनेकानेक गोष्टी म्हणजे दिवाळी…

यातील कांही गोष्टींचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरीही यादीत मात्र काहीच फरक पडलेला नसतो. आणि त्यासंबंधी असलेल्या आठवणीही मनात तेवढ्याच पक्या जपलेल्या असतात.

आज बघुया…माझ्या दिवाळीतील आठवणींच्या रांगोळ्या…

लहानपणी नागपुरला आजोळी शिकायला होते. घरापुढे मोठ्ठं अंगण होतं. घरमालक आणि आम्ही अशी दोन कुटुंब तिथे राहायची. दोन्ही कुटुंबात मिळुन सहा-सात तरी मुली होत्या. मग अंगणात सडा टाकल्यावर संपूर्ण अंगणभर पांढऱ्या रांगोळीनेच सारखे चौकोन काढायचे. आणि प्रत्येकीने ते समान वाटुन घ्यायचे. आणि मग सुरु व्हायची एकेकीच्या रांगोळीची कलाकारी…रांगोळी काढता काढता मधेच दुसरी कशी काढते ते बघुन घ्यायचं आणि तिच्यापेक्षा आपली जास्त चांगली कशी येईल याचा प्रयत्न करायचा… कधीकधी हळूच आपल्याकडे नसलेला रंग एखादीच्या डब्यातुन पळवुन आणायचा…आणि तिच्या लक्षात येईपर्यंत आपली रांगोळी सजवायची…अर्थात तीही हीच युक्ती वापरायची…त्यामुळे एकमेका साह्य करू, अवघ्या रांगोळ्या सजवु…
अशा रांगोळ्यांनी सजलेलं ते अंगण पणत्या आणि आकाशकंदीलाच्या उजेडात एवढं साजरं दिसायचं म्हणुन सांगु…

त्यानंतर आई-बाबांकडे नांदगावला आले आणि मोठं अंगण कसं होतं हे विसरायलाच झालं…
मला आठवतं, तिथे नदीवर कपडे धुवायला गेल्यावर कपडे वाळेपर्यंत शिरगोळ्यांचे दगडं शोधुन शोधुन आणायचे आणि घरी आणल्यावर ते कुटून बारीक चाळुन त्याची रांगोळीची पूड तयार करायची. मी केवळ तेवढ्यासाठीच नदीवर जायची. (नाहीतर नदीवरची भांडणं…दुसऱ्यांची सुद्धा… अंगावर काटाच…) तर पांढरी रांगोळी तयार झाल्यावर रंगांच्या पुड्या आणुन त्याचे घरीच निरनिराळे रंग तयार करायचे.

घरासमोर अंगण असं नव्हतंच…पण रांगोळी काढायची तर भारी हौस…मग माती आणुन दाराच्या एका बाजुला फरशीवर त्याचा छोट्टासा ओटा तयार करायचा. मला तर मोठमोठ्या रांगोळ्या काढायच्या असायच्या. एवढ्याशा ओट्यावर त्या कशा काढणार म्हणून मन जरासं खट्टु व्हायचं…पण ‘कुछ नहीसे थोडाही सही’ असं म्हणुन समाधान मानायचं.

त्यातही गंमत म्हणजे तो ओटा सारवावा लागायचा. आणि मला तर लोण्यात सुद्धा हात घालावा वाटत नसे तिथे शेणात…?
मग…माझी पाठची बहीण…माझी पाठ राखीणच…ती हे सारवण्याचे काम अंगावर घ्यायची…आणि ती सारवुन बादली आणि हात स्वच्छ धुवायला गेली रे गेली की अस्मादिक……….कळलं नं तुम्हाला…?
मग आम्हां दोघीत जे फटाके वाजायचे…

अखेर वाद गेला आईच्या न्यायालयात… आम्ही दोघीही आईच्याच मुली नं…आईने त्यावर तोडगा काढला…आलटुन पालटुन दोघींनीही एकेक दिवस हे काम करायचं…
रांगोळीच्या बाबतीतही तेच…रांगोळी दोघींनाही काढायची असायची…आता ह्यावर काय उपाय…? पुन्हा आईला कौल…आणि निकाल…एक दिवस एकीने रांगोळी आणि दुसरीने बॉर्डर काढायची… ‘येस…युवर ऑनर’… आता आईचा पहिला तोडग्याप्रमाणे मी तंतोतंत वागले की नाही कुणास ठाऊक…नसेलच वागले बहुतेक… नावडतं काम नं ते…पण पुढे संसारात पडल्यावर मात्र रांगोळ्या जेवढ्या हौसेने काढल्या, तेवढ्याच उरकाने सडा-सारवण ही केले…काय करणार पर्याय नव्हताच ना…!

पुढे लग्न झाल्यावर मुलगी मोठी होईपर्यंत एकटीनेच ही रांगोळीची हौस पुरवुन घेतली. अगदी रोजची रांगोळीही अंगणाच्या आकाराप्रमाणे आणि वेळेच्या मर्यादेत बसेल अशी रोज काढतच असे… अजुनही काढते…आणि हो त्यात रंगही भरायचेच…पण एवढी मन लावुन काढलेली सुबक रांगोळी एखाद्या लहान मुलाने लगेच पुसून टाकली तर मात्र… तुम्हीच कल्पना करा काय वाटत असेल…

दिवाळीत रोज एक नवीन रांगोळी काढायची असं गृहीत धरलेलंच असायचं… कधीकधी सकाळची वेगळी आणि संध्याकाळचे वेगळी…काढलेली ती रंगभरली रांगोळी इतकी छान दिसायची की तिच्या प्रेमातच पडायला व्हायचं… मग येता-जाता तुझ्याकडे पाहत राहायचं आणि स्वतःवरच खुश व्हायचं…सुदैवाने कोणी पुसली नाही तर ती तशीच टिकलेली बघुन
स्वतःवरच खुश व्हायचं…आणि दुसऱ्या दिवशी मनात ती रांगोळी पुसावी की न पुसावी याची भवति न भवति चालु असायची…पण पुन्हा वाटायचं…नवीन रांगोळी काढायला वाव तरी कसा राहील… मग आपणच शोधायचा उपाय…त्याच रांगोळीला जरा रंगरंगोटी करून शेजारी पुन्हा नवीन रांगोळी काढायची…असं अंगणातील जागा संपेपर्यंत चालु…अंगण अगदी खुश आणि अर्थात मीही…

एका दिवाळीची गोष्ट…घराच्या मागच्या आणि पुढच्या दारापुढे मी आणि मुलीने तासभर खपुन रांगोळ्या काढल्या… प्रमाणबद्धतेमुळे आणि सुंदर रंगसंगतीमुळे रांगोळ्या अगदी दृष्ट लागण्यासारख्या सुंदर दिसत होत्या…अगदी समाधानाने रांगोळीचे डबे आतमध्ये नेऊन ठेवायला गेलो तोच…ध्यानी मनी नसतांना धो धो पाऊस कोसळायला लागला…मी हतबुद्ध…काय करावे हे न सुचुन घरातुन पाट आणुन रांगोळ्यांवर झाकायला निघाले…आणि…” आई…किती अस्वस्थ होतेस, रांगोळ्या वाचणार आहेत का ह्या पाटांनी?” इति… माझी मुलगी…
“अगं पण…”
“आई…आपल्याला काढतांना आनंद मिळाला ना…बस्स्…तेवढाच पुरेसा असु दे…नको हळहळ करूस…उद्या पुन्हा आणखीन छान रांगोळ्या काढु आपण…”
वय छोटं असलं म्हणुन काय झालं… चांगली गोष्ट कुणाकडूनही शिकावी नाही का…!

आता जेव्हा कलाकार रस्त्यांवर, मैदानांवर घरांत कित्येक तास खपुन अगदी मोठमोठ्या रांगोळ्या काढतात तेव्हा त्यांच्या कलेला दाद द्यावी की कांही वेळातच त्या मोडल्या जातील याबद्दल त्यांच्याऐवजी आपणच हळहळ करावी कळत नाही…ते कलाकार तर स्थितप्रज्ञच असावेत…पण त्यावेळेस हा वरचा किस्सा मात्र हमखास आठवतो.

सौ. भारती महाजन- रायबागकर
चेन्नई.
9763204334.

११-११-२१.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − five =