You are currently viewing श्रद्धा आणि अंधश्रद्धा

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*श्रद्धा आणि अंधश्रद्धा*

 

माझी ईश्वरावर श्रद्धा आहे, असे जेव्हा मी म्हणते तेव्हा माझ्या मनात त्याचा अर्थ असतो, माझा ईश्वरावर विश्वास आहे. आज पर्यंत माझ्या आयुष्यात ज्या ज्या बऱ्या वाईट घटना घडल्या त्या एका ईश्वराच्या मर्जीनुसार घडल्या, कारण तोच एक कर्ता,करविता आहे यावर माझी अगदी दृढ श्रद्धा आहे. आपण नेहमी म्हणतो की *God does everything for our good*आणि एकदा का हे विधान आपण आपल्या आयुष्यात स्विकारले की आयुष्यात घडलेल्या कोणत्याही बिकट प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्तीही तो एक परमेश्वरच आपल्याला देतो.

 

माझा मुलगा फक्त अकरा महिन्यांचा होता आणि माझ्या यजमानांचे अचानक पोट दुखू लागले. आम्ही दोघेही त्यावेळी तसे लहानच होतो. आयुष्याचा काय अनुभव होता त्यावेळी? पण परिस्थिती लक्षात घेऊन मी आधी त्यांना ओवा आणि गरम पाणी दिले. पोटाला बाम चोळला. जे जे सुचेल ते ते केले. परंतु पोटातल्या कळा वाढतच चालल्या होत्या. मनातून ईश्वराचा धावा चालूच होता, तोच आपल्याला या संकटातून तारून नेणार असा पूर्ण विश्वास होता. अशावेळी शेजारी धावून येतात. माझ्या मते त्यांच्या रूपात प्रत्यक्ष देवच आपल्याला मदत करतो. मलाही तशीच मदत मिळाली आणि माझ्या यजमानांना आम्ही हॉस्पिटलमध्ये आणले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे माझे सौभाग्य वाचले.

 

मी प्रत्यक्ष देवाला कधी पाहिले नाही. तसे कोणीच पाहिले नसावे. गणपती काय,शिवशंकर काय, माता सरस्वती, दुर्गा, काली काय किंवा बन्सीधर भगवान श्रीकृष्ण काय? आपण माणसानेच त्यांची ही सगुण रूपे बनविली आहेत. आपल्या डोळ्यासमोर काही एक मूर्ती असल्याशिवाय आपले हात जुळत नाहीत, आपण नतमस्तक होऊ शकत नाही.

 

माझी मात्र अशी कायम श्रद्धा आहे की परमेश्वर ही एक शक्ती आहे आणि ती सर्वत्र चराचरात भरलेली आहे. वटवृक्ष माणसाला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू पुरवतो. नद्या जीवन देतात. समुद्राचे पाणी पिता आले नाही, तरी ज्याच्या अभावी जीवन बेचव होईल असे प्रत्येक क्षणी लागणारे मीठ समुद्रातूनच मिळते. निसर्गातील प्रत्येक लहान मोठी वस्तू जीवनावश्यक आहे हे कसे विसरता येईल?

 

माझ्या वडिलांच्या एका पुस्तकातील किस्सा आहे. खरा घडलेला प्रसंग आहे. एकदा एक मेल ट्रेन भरधाव वेगाने चालली असता तीन स्त्रिया, शुभ्र वस्त्रधारी, रेल्वेच्या रुळावर आडव्या आल्या आणि हात वर करून त्याने मोटर-मनला गाडी थांबवण्याचे इशारे दिले. गाडीला हिरवा सिग्नल असूनही या स्त्रिया अशा आडव्या का याव्या हे ड्रायव्हरला कळत नव्हते, परंतु त्या स्त्रियांचा जीव वाचवणे इष्ट कर्तव्य असल्यामुळे ड्रायव्हरने इंजिनला ब्रेक लावून गाडी थांबवली. गाडी थांबता क्षणीच त्या तिघीजणी अदृश्य झाल्या. कुठे गेल्या काहीच मागमूस लागला नाही. चौकशी अंती असे कळले की पुढे रेल्वे लाईन मध्ये काहीतरी काम चालू होते आणि सिग्नलमनच्या चुकीमुळे सिग्नल लाल न होता हिरवाच राहिला. त्या स्त्रिया जर आल्या नसत्या तर फार मोठा अनर्थ घडला असता.

 

माझ्या वडिलांच्या अभ्यासानुसार त्या स्त्रिया म्हणजे इनव्हिसिबल हेल्पर्स होत्या. त्या फक्त ड्रायव्हरला दिसल्या आणि पुढे होणारा फार मोठा अपघात टळला.

 

यालाच मी ईश्वरी शक्ती म्हणते. या शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे, दृढ श्रद्धा आहे. आपण म्हणतो, ” आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे काही चालेना “. भूकंप होतो, जंगलात आगी लागतात, त्सुनामी येते, जीवित हानी होते, वित्तहानी होते, पण यातही परमेश्वराचे काहीतरी गणित असते, असे मी मानते. दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी या नैसर्गिक आपत्ती येत असतील कदाचित. आता सुक्याबरोबर ओले सुद्धा जळते ना?

 

ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, एकनाथ तुकाराम आदि संत मंडळींना मी मानते. श्री स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज या सर्वांना मी मनापासून नमस्कार करते कारण ते खरे भक्त आहेत, मानवाच्या रुपातले ईश्वर आहेत, याचा अनुभव मी घेतला आहे.

 

आजकाल मात्र बुवाबाजी फार बोकाळली आहे. गल्लोगल्ली, जागोजागी हे बुवा दिसू लागले आहेत. भगवी वस्त्रे धारण केली, कमरेला लुंगी गुंडाळली म्हणजे देवत्व येत नाही. हे असले बुवा उगीच काहीतरी अंगारे धुपारे देतात, तोंडाने काहीतरी उगीचच पुटपुटल्यासारखे करतात आणि गांजलेल्यांना लुबाडतात.

 

आपल्या देशात अशिक्षितांची संख्या अजूनही फार मोठी आहे. घरात कोणी आजारी पडले तर त्याला बाहेरची बाधा झाली असे मानून डॉक्टरकडे नेण्याऐवजी भगताकडे जातात. या गोष्टीला मी अंधश्रद्धा म्हणते.म्हणजे सारासार विचार न करता एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवून वागणे, ही अंधश्रद्धा अशी माझी अंधश्रद्धेवरील व्याख्या आहे.

 

माझ्याकडे काम करणाऱ्या मीनाचा मुलगा चांगला हुशार होता. आठवीपर्यंत तो प्रत्येक परीक्षेत चांगले मार्क मिळवत होता. नंतर काय झाले कोण जाणे, त्याचे अभ्यासावरून लक्ष उडाले. घरात खोटे सांगून तो शाळेत जाईनासा झाला. तासंतास झोपा काढू लागला. मीनाने त्याला खूप समजावले पण काही उपयोग होत नव्हता. तिच्या चाळीतल्या बायकांनी कर्जतला असलेल्या कोणा बाबाचे नाव तिला सांगितले. तो म्हणे फार पाॅवरफुल आहे. तो काहीतरी मुळ्या उगाळून देतो आणि लगेच गुण येतो असेही सांगितले. काही करून मुलगा बरा झाला पाहिजे या भावनेने मीना त्या बाबाकडे जाऊ लागली. सतत तीन महिने गेली. त्यांनी जे जे करायला सांगितले ते ते तिने केले. पाण्यासारखा पैसा खर्च झाला पण मुलांमध्ये काहीच फरक नाही.

 

तो असा का वागतो याचे मूळ कारण शोधणे जरुरीचे आहे हे तिला कुठे कळत होते? मी त्याला कॉन्सिलिंग करावयास घेऊन गेले. तिला म्हटले तू बाबाकडे जाणे बंद कर. आपण त्याला बरा करू. पाच सहा वेळा कॉन्सिलिंग केल्यावर त्याची मित्रासोबत नशा करण्याची सवय हळूहळू कमी झाली आणि तो आता चांगला नॉर्मल झाला आहे.

 

ही बुवाबाजी म्हणजे अंधश्रद्धा. त्या मानसशास्त्री डाॅक्टरच्या रूपात आम्हाला देव भेटला ही श्रद्धा!

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

१५/०४/२०२६

प्रतिक्रिया व्यक्त करा