You are currently viewing तृतीय पंथीयांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यशाळा

तृतीय पंथीयांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यशाळा

ओरोस :

 

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने तृतीय पंथीयांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, तृतीयपंथी तक्रार निवाहरण समितीच्या अशासकीय सदस्य रिया आळवेकर उपस्थित होते. तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. समाजानेही पुढे येवून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. तसेच समाजात माणसाप्रमाणे त्यांना मानाचे स्थान देवूया. मुख्य प्रवाहात जगण्याचा अधिकार देवूया, असे आवाहन विधीज्ञ दिलशाद मुजावर यांनी केले.

 

कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन विषयावर बोलताना नालसाने दिलेल्या निर्णयावर ॲड श्रीमती मुजावर म्हणाल्या, आजही तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात माणूस म्हणून जगताना संघर्ष करावा लागतो. दृदैव म्हणजे समाज आजही त्यांना समावून घेत नाही. नालसाने माणूस म्हणून जगण्याचा त्यांना अधिकार दिला. इतर मागास वर्गीय आरक्षणात त्यांना मान्यता द्यावी असे सांगितले. त्यांना दोन वेळची टाळी वाजवायची नाही तर सन्मानाची भाकरी हवी आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. सर्व सामान्य स्त्री पुरुषांप्रमाणे त्यांची गणना व्हायला हवी. समाजाने त्यांना मुख्य प्रवास जगण्याच्या अधिकार द्यायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

 

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, तृतीय पंथीयांना राष्ट्रीय पोर्टलवरती प्राप्त प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरण करणे, हे एक छोटेसे पाऊल आहे. ही सुरुवात आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना या प्रमाणपत्राने ओळखपत्राचा उपयोग होणार आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सदैव मदतीला तयार आहे. समाजानेही आता त्यांना एक पाऊल पुढे टाकून त्यांचे अधिकार द्यायला हवेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर म्हणाले, तृतीयपंथीयांना त्याचे अधिकार व हक्क देण्यासाठी समाजाने आत्मपरिक्षण करुन त्यांना स्वीकारावे. शासनाच्या विविध योजनांच्या लाभ घेण्यासाठी तृतीयपंथीय समाजानेही पुढे यावे, प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी आहे.

पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे म्हणाले, तृतीय पंथीयांविषयीच्या कायद्याचे ज्ञान त्याची जणजागृती व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दलातर्फे कार्यक्रम घेण्यात येतील. पोलीस दल निश्चितपणे त्यांना सहकार्य करेल. समाजानेही निश्चितपणे सकारत्मक पाऊल उचलावे.

समाजाने कोणताही भेदभाव न करता समाजाने आम्हाला सामावून घ्यावे. असे सांगून आमच्या व्यथा जाणून घेवून आम्हाला प्रशासनाने सहकार्य केले, आधार दिला त्याबद्दल श्रीमती. आळवेकर यांनी प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी उपस्थित तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरण करण्यात आले. सहायक आयुक्त सचिन साळे यांनी सुरुवातील स्वागत प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अनंत कर्पे यांनी केले. तर समाज कल्याण निरीक्षक अनिल बोरीकर यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा