You are currently viewing वादळ आणि शेतकरी…

वादळ आणि शेतकरी…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

वादळ आणि शेतकरी…

अतिशय संवेदनशील विषय आहे हा! हो मी ही एका शेतकऱ्याची मुलगी आहे व शेतकऱ्याची सुखदु:खे अतिशय
जवळून मी पाहिली आहेत. खरं म्हणजे शेतकऱ्याचे जीवन
हेच एक प्रचंड वादळ आहे, एक नाही असंख्य वादळांना
तोंड देतच शेतकऱ्याचे जीवन जाते. केवळ नैसर्गिकच नव्हे तर
प्रचंड कौटुंबिक वादळांनाही त्याला तोंड द्यावे लागते व त्यातून
तो होरपळून निघतो,तावून सुलाखून निघतो नाही तर …?

मुळात शेती करणे ही किती कष्टाची व खर्चिक बाब आहे हे
किती लोकांना माहित आहे, हे मला माहित नाही. नुसत्या
बांधावरून फिरून आले म्हणजे शेती कळत नाही तर हा १२
महिने २४ तास राबण्याचा व चिंतेचा विषय आहे. माझ्या लहानपणी मी ७/८ वर्षांची असतांना एप्रिल व मे च्या सुरूवातीला आमच्या ओट्यावर बायका शेंगा फोडायला म्हणजे शेंगातील दाणे काढायला रोजाने यायच्या. मी लहान
होते. मैत्रिणींबरोबर शेंगा (भुईमुगाच्या) ही फोडायची व सर्व
बायकांच्या शेंगा फोडून झाल्या की त्या तिथेच ओट्यावर
त्या पाखडून दाणे पाटीत भरून बसायच्या. मग मी व माझी
आई त्या मापाने मोजून घेत असू. त्याचा ठराविक रोज असायचा.उदा. पायलीला आठ आणे, दोन पायलीला रूपया
असा.

ज्याचे जितके दाणे भरतील तेवढी मजुरी पैशात त्याला मिळायची. आता हे इतके सविस्तर मी तुम्हाला का सांगितले?
कारण खरीप हंगामात शेतात शेंगा पिकल्यानंतर त्या बाजारात
विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्याला पुढच्या वर्षाचे बियाणे राखून
ठेवावे लागते.मग २/३ पोती शेंगा वाळवून कोठ्या भरून ठेवायच्या व रोज वापरण्या साठी व बियाण्यासाठी त्या नीट
राखून ठेवायच्या, अशी पुढच्या वर्षासाठीची बेगमी शेतकऱ्याला करून ठेवावी लागते.म्हणून हा १२ महिने २४ तास
चिंतेचा विषय म्हणजे शेती करणे. मग मृग नक्षत्र सुरू झाले
व पहिला ढाराढूर पाऊस पडला की आई साठवणीच्या खोलीतून छोटी छोटी गाडगी मडकी काढायची. त्यात तिने
पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी मठ, मूग, चवळी,अशी कडधान्ये
खराब होऊ नयेत त्याला भुंगा लागू नये म्हणून राखेत घालून
ठेवलेली असायची ती मडकी ती बाहेर आणून बियाणे साफसूफ करून सालदाराच्या हाती सोपवत असे.मग वडिल
व सालदार पांभरीची पुजा करून नांगर पुजून बियाणे घेऊन
शेतात जात व पावसानंतर २/३ दिवसांनी वाफ आलेल्या म्हणजे मऊ भुसभुसशित जमिनीत मग पांभरीला बैलजोडी
जुंपून थाटात मोठ्या आशेने पेरणी होत असे.

हे फक्त एक उदा. म्हणून मी तुम्हाला सांगितले. वर्षभर अशा
असंख्य कटकटींना त्याला सामोरे जावे लागते. त्यातून पाऊस
टप्याटप्याने पडला तर बरं, नाही तर पिके वाळण्याची भीती
चिंता पोखरते. विहिरीला पाणी असेल तर काही शेतकरी पाणी भरून पिके वाचवायचा प्रयत्न करतात. नाही तर केलेली
पेरणी व बियाणे वाया जाऊन दुबार पेरणी करावी लागते व
नव्याने पेरणी करण्यासाठी पुन्हा नव्याने बियाणे विकत घेऊन
(त्या साठी पैसा असतोच असे नाही, मग काढा कर्ज)पेरणी
करावी लागते व ती फारशी यशस्वी होत नाही. बघा या अगदी बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या . त्या
नंतर येणारी आस्मानी संकटे, वादळ वारे तुफान अवकाळी
गारपीट ही तर शेतकऱ्याचे कंबरडे पार मोडून टाकतात हे आजकाल सोशल मिडिया मुळे निदान आपल्या पर्यंत पोहोचते. त्याचे पुढे काय होते हे आपल्याला चांगलेच माहित
आहे.पंचनामे होतात, फोटो निघतात, आश्वासनांची खारात
होते व ती हवेत विरून जाते.

एवढेही करून नशिबाने चांगले पिक उदा. कांदा, आलेच तर
शेतकऱ्याचा कांदा बाजारात येताच भाव कोसळतात व व्यापारी गोदामे भरून घेतात, शेतकरी अक्षरश: लुटला जातो.
त्यातून मुलामुलींची लग्ने, शिक्षण हे प्रश्न तर असतातच ना?
कसा जगतो शेतकरी माहित आहे तरी आहे का हो आपल्याला? त्यात अजून भाऊबंदकी असतेच ती कुणाला सुटत नाहीच. दर महिन्याला बॅंकेत पैशांचा पाऊस थोडीच
पडतो त्यांच्या? आपल्याला त्यांच्या सुखदु:खाशी काहीही
सोयरसुतक नसते इतके आपण स्वार्थी आहोत .
खूप मोठा गहन विषय आहे हा. जे शेतकरी कुटुंबातून आहेत
त्यांनाच याची तिव्रता कळू शकते बाकीच्यांच्या हे डोक्यावरूनही जाऊ शकते. माझे वडिल आशेने दरवर्षी कांदा
लावायचे, पण माझ्या उभ्या हयातीत कांद्याने त्यांना कधीच
हात दिला नाही, कधी कधी तर कांदा विक्री करून धुळ्याहून
येणाऱ्या सालदाराला भाड्यालाही पैसे नसत असे किती तरी
वेळा घडले आहे.पण आशा मोठी चिवट असते. उभ्या हयातीत
वडिलांना हात न देणाऱ्या या कांद्यांनी वडिल वारले त्या वर्षी
मात्र हात देऊन त्यांच्या दहाव्याचे कर्ज फेडून टाकले व कुणावर कर्ज व भार माझे वडिल झाले नाहीत …
थांबते .. “धन्यवाद “

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ११ जुलै २०२२
वेळ : सकाळी ९ : २३

प्रतिक्रिया व्यक्त करा