You are currently viewing ” ती ” ची व्यथा

” ती ” ची व्यथा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.मोनिका बसरकर यांचा अप्रतिम लेख

स्त्री म्हणजे त्यागाची मूर्ती, परमेश्वराचे रूपच जणू. स्त्री म्हणजे सहनशीलतेचा कळस. संसारात तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. त‌ी नसेल तर कुटुंब कोमेजते. रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा डोलारा सांभाळते “ती “. आजच्या काळात स्त्रियांनी खुप प्रगती केली अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती चालत आहे .

असं असुन सुध्दा आज बऱ्याच ठिकाणी हे चित्र असं नाहीये . आज सुध्दा असंख्य ठिकाणी स्त्री ला तिला जो मान हवा तो दिल्या जात नाही अगदी सुशिक्षित घरात सुद्धा .

एकदा एक सुशिक्षित कुटुंब ट्रेनने प्रवास करत होते. प्रवास लांबचा असल्या मुळे त्यांनी वेगवेगळे खाण्याचे पदार्थ सोबत आणले होते . प्रवास एकत्रच करत असल्या मुळे माझी सुद्धा थोडी ओळख झाली त्या कुटुंबा शी , सासूबाई ,सुनबाई ,नात ,नातु ,मुलगा असं छोटं कुटुंब होत ते. जेवणाची जशी वेळ झाली तसे आम्ही सगळेच एकत्र बसलो जेवयला. त्यांच्या कडे असलेले खाद्य पाहून मला खूप कौतुक वाटलं ,मला कळलं कि हे सारे पदार्थ अगदी प्रेमाने त्यांच्या सुनेने केले आहेत . मी खूप स्तुती करता त्या सासूबाई खोचकपणे म्हणाल्या ,”काय काम असत तिला दिवसभर. घरात तर असते . एखाद्या दिवशी केले जास्त काम तर कुठे बिघडलं ?”.

सासूचे हे कडवट शब्द ऐकता सुनेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ती हिरमुसली पण परत हसत मुखाने आपल्या कामाला लागली कारण तिला माहिती होत आपल्या अश्रूंची काडीमोल किंमत आहे इथे . ” ती ” एक गृहिणी आहे म्हणून तिला काहीच काम नसतं हे मानायची आपल्या कडे अगदी प्रथाच आहे जणू.

खुप वेळा कदाचित नेहमीच आपण हे विसरतोच की ती घरी असते कारण आपल्याला बाहेर पडता यावं म्हणून . पण आपण मात्र तिला अगदी गृहीत धरतो , तिच्या इच्छा , अपेक्षा,सुख ,दुःख ह्याचा जणु पार विसर पडतो आपल्याला .

हा एक छोटा किस्सा झाला एका गृहिणीचा असाच एक किस्सा घडला एका नोकरी करणाऱ्या गृहिणी बरोबर. हो नोकरी करणारी गृहिणी कारण ” ती ” नोकरी करत करत घर देखील उत्कृष्ट रित्या सांभाळते . एकदा ऑफिस मध्ये मैत्रिणी बसलो असता एका मैत्रिणीने सांगितलं की कामानिमित्त ऑफिस मधून सुट्टी न मिळाल्या मुळे तिला एका नातेवाईकाच्या लग्नाला जाता नाही आलं . त्यामुळे त्या नातेवाईकाचे खूप बोलणे तिला ऐकून घ्यावे लागले . खर तर अगदी शुल्लक कारण पण केवढा तो राईचा पर्वत .

नातेवाईकांमधील कार्यक्रम, लग्नसमारंभ, डोहाळे जेवण, दु:खाचे कार्यक्रम यांनाही तिला प्राधान्य द्यावे लागते. त्यातही बघा, जर एखाद्या समारंभाला तिला वेळेअभावी किंवा मीटिंग अभावी नाही उपस्थित राहता आले तर टोमणे देणारे हजारोंच्या संख्येने तयार असतात. मग त्यात तिच्या मनाच्या आणि अडचणीचा कुणीच का विचार करीत नाही? ती सगळयांच्या अडचणीला हजर असते; पण तिच्या वेळी मात्र कुणीच येत नाही.

आपल्या कडे जेव्हा एखादी नवं वधू लग्न करून येते तेव्हा ती एका अपेक्षेने येते पण बऱ्याच वेळा तिच्या अपेक्षा भंग होतात. कधी तिला तिच्या असण्या वरून बोलले जाते , तर कधी शिक्षणा वरून . कधी कधी तर ” ती ” म्हणजे फक्त मुलं जन्माला घालणारं यंत्र असं पाहिलं जातं . तिला काय हवंय , तिची काही स्वप्न आहेत का ह्याचा साधा विचार सुद्धा केला जात नाही .

आपल्या कडे काही दिवसां साठी घरी आलेल्या जावयाला मान-सन्मान देण्याची पद्धत आहे पण स्वतःच सगळं सोडून कायमस्वरूपी आलेल्या सुनेला मान द्यावा अशी साधी विचारसरणी सुद्धा नाहीये .

आपल्या आसपास असे हजारो किस्से असतील जिथे कळत -नकळत एक स्त्री लढत असते आपल्या अस्तित्वासाठी ,कुणी आपल्या स्वप्नासाठी . प्रत्येकीच्या काही तरी व्यथा नकीच असतील आणि त्या व्यथांच्या अनेक कथा ही असतील.

 

मोनिका बसरकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + thirteen =