You are currently viewing पाऊस

पाऊस

*कुरुंदवाड येथील लेखक कवी प्रा.दिलीप सुतार यांची अप्रतिम काव्यरचना*

पाऊस…
येत किंवा जात नसतो ,
मित्रानो….
कवी…लेखक…साहित्यिक
यांची अथवा चित्रपटातील
पाऊस गाणी ऐकून…

टी. व्ही…वर्तमान पत्रातल्या
दुष्काळ महापूराच्या ब्रेकिंगन्यूज….
अथवा भीषण हृदय द्रावक
ग्रामिण शहरी बातम्या
किंवा छायाचित्रे पाहून…

बळीराजाच्या आत्महत्यांच्या
आर्त कहाण्या अथवा
कर्जमाफीवरून रंगणा-या
सत्ताधारी-विरोधकांच्या
कलगीतु-यांचा हिशेब ठेऊन…
किंवा …
सत्ता परिवर्तनार्थ
आमदार खासदार यांची पळवापळवी पाहून….

हवामान खात्याने किंवा
कुण्या ज्योतिषाने
त्याच्याबद्दल वर्तविलेल्या तथाकथित
अंदाजाला प्रतिसाद म्हणून…

तो येत जात नसतो
तुमच्या आमच्या व्यावहारिक
नफ्या तोट्यांची गणित मांडून
अथवा “येरे येरे पावसा
तुला देतो पैसा”….
या गोंडस बालीश
आमिषाला भूलून…

तो येतो अन् जातोही
त्याच्या स्वत:च्या मर्जीने
निसर्ग कालचक्रानुसार…

पशू-पक्षांची ‘पेर्ते व्हा’ सारखी आर्जवे ऐकून…
त्यांच्या भ्रमंतीचे नकाशे
अन् त्यांची घरटी पाहून…
वृक्षवेलींचे भाषा संकेत उमजून
त्यांच्यासाठी अनुकूल प्रतिकूल
वातावरणीय बदलानुसार…

पर्यावरणीय समतोल
असमतोलानुसार….
पृथ्वीतलावरील सर्वच सजीवांचा आधार जीवनदाता..म्हणून…
कमी अधिक प्रमाणात…
कुठे अवर्षण…अवकाळी रूपात
तर कुठे प्रलय सदृष्य स्वरूपात

आणि आपण म्हणत राहतो…
‘नेमेचि येतो मग पावसाळा’
७जून ला ‘
प्रतिवर्षी..मृग नक्षत्रासोबत
‘कधी भाबडेपणाने…
तर कधी
पारंपरिक संस्कारातून…
आपल्या असंख्य बेगडी
भौतिक स्वप्नांसोबत…
दरवर्षी…न चुकता…
आपल्या मानवी अपेक्षांच्या रंगीबेरंगी छत्र्या खोलून…!!!

प्रा. दिलीप सुतार
कुरूंदवाड
मो.नं.9552916501

प्रतिक्रिया व्यक्त करा