You are currently viewing दीपक केसरकर यांच्या भूमिकेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण अस्वस्थ

दीपक केसरकर यांच्या भूमिकेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण अस्वस्थ

सेना-भाजप एकत्र आल्यास केसरकर राणे संघर्ष पुन्हा शिगेला पोचणार का?

विशेष संपादकीय…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात जवळपास गेले एक दशक सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि गेली पंचवीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात ज्यांचा दबदबा होता ते माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात कमालीचा संघर्ष होताना जिल्ह्याने अनुभवलेला आहे. माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जिल्ह्यात असलेली दहशत आणि या दहशतीचा बागुलबुवा करत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांची जिल्ह्यावर असलेली 25 वर्षाची सत्ता उलथवून राणेंना जेरीस आणले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना प्रवेश केलेल्या दीपक केसरकर यांना शिवसेना नेतृत्वाकडून सेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पालक मंत्री पदाची बक्षिसी देण्यात आली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास पंचवीस वर्षे नारायण राणे यांचे अधिराज्य होते. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, अनेक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, काही नगरपालिका नारायण राणे यांच्या अधिपत्याखाली होत्या. त्यामुळे नारायण राणे यांचा शब्द जिल्ह्यात प्रमाण मानला जात होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात उभा संघर्ष सुरू झाला आणि तिथून दीपक केसरकर यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या विरोधात दहशतवाद हा मुद्दा पुढे करत लोकांचे मन परिवर्तन करून नारायण राणे यांच्याकडे असलेल्या सत्ता शिवसेनेकडे आणल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येताच माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळण्याची आशा वाटत होती. परंतु राष्ट्रवादीचा त्याग करून शरद पवार यांच्या विरोधात ठामपणे भूमिका मांडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या दीपक केसरकर यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये निराशा झाली. परंतु संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व असलेल्या दिपक केसरकर यांनी पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सलोखा करून महा विकास आघाडी न करता शिवसेनेने भाजप बरोबर जावे, अशीच भूमिका मांडली होती. राज्यातील विधान परिषद निवडणूक शिवसेनेमध्ये उभी फूट पडून ठाण्यातील शिवसेनेचे वजनदार नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेच्या जवळपास 40 ते 45 आमदारांना आपल्या सोबत नेले. परिणामी राज्यातील महा विकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान देखील सोडले.
राज्याच्या राजकारणात या सर्व घडामोडी घडत असताना काल रात्री आम.दीपक केसरकर हे वरिष्ठांची सहमती घेऊन हॉटेलच्या बाहेर पडले त्यांना शिवसैनिकांनी रोखले असता शिवसेनेचे विधिमंडळ नेते अजय चौधरी यांनी मध्यस्थी करून शिवसैनिकांची समजूत घालत दीपक केसरकर यांना आपल्या घरी जाण्यास वाट मोकळी करून दिली. परंतु शिवसैनिकांच्या गाड्या दिपक केसरकर यांच्या मागावर राहिल्या. त्यामुळे दीपक केसरकर संतापले त्यांनी *”शिवसेनेने भाजप सोबत जावे ही माझी आधीपासूनची भूमिका होती व मला जायचे असेल तर कुणीही अडवू शकत नाही, मात्र भाग पाडू नका”* असा गर्भित इशारा दिला. दीपक केसरकर यांच्या या भाष्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. कालपर्यंत सिंधुदुर्गात विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाचा उत्सव साजरा करत असलेले राजकारणी आम.दिपक केसरकर यांच्या भूमिकेमुळे अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळाले. आम.दीपक केसरकर यांची बदललेली भूमिका पाहता सिंधुदुर्गचा राजकारणाचे केंद्रबिंदू पुन्हा एकदा आमदार दीपक केसरकर हेच ठरले. बदलत्या राजकारणात जर सेना भाजप एकत्र आली आणि महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले, अथवा दीपक केसरकर भाजपाच्या वाटेवर गेले तर पुन्हा एकदा आमदार दीपक केसरकर व त्यांचे कट्टर राजकीय विरोधक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे एकाच पक्षात जमेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. ज्याप्रमाणे गेली दहा वर्षे दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात जिल्हाभरात राळ उठवली होती, ती पाहता बदलत्या राजकारणात नाम. नारायण राणे यांना पुन्हा आपल्या राजकीय अस्तित्वासाठी धडपड करावी लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दीपक केसरकर यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेला सलोखा आता राणे यांना दीपक केसरकर हे अडचणीचे ठरणार अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करता एकाच म्यानात दोन तलवारी राहतील का? असा प्रश्न दीपक केसरकर यांच्या बदलत्या भूमिकेमुळे राजकीय धुरंदर यांना पडलेला आहे महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाची मानली जाणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काहीच दिवसात होण्याची शक्यता असल्याने सेना-भाजप युती मुंबई महानगरपालिकेतील महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. दीपक केसरकर हे आज शिवसेनेशी निष्ठेने राहिले, पक्ष शिस्तीचा देखील त्यांनी भंग केला नाही. परंतु गेल्या दोन-अडीच वर्षात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दीपक केसरकर यांना राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात डावलून केलेली चूक भविष्यात शिवसेनेलाच महाग पडते की काय? असाही प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत आहे. त्यामुळे दीपक केसरकर हे सेना-भाजप युतीचे सरकार आल्यास किंवा दीपक केसरकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात नक्कीच उलथापालत झालेली सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना दिसून येईल. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणी “वेट अँड वॉच” भूमिका घेऊन भविष्यात काय होते याची प्रतीक्षा करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − three =