You are currently viewing शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम लेख

खरंच….
शाळेचा पहिला दिवस आठवला तरी हसू येतं. खेळण्या बागडण्याचे आपले वय…अगदी जन्मल्यापासून सर्वांनी जे काय करायचे ते करू दिलेलं असतं. तोंडात बोट घालतानाही उगाच रडू नको म्हणून सारं काही चालवून घेतलेलं असतं… आणि अचानक वय शाळेचं होताच…आई-बाबा मात्र निर्दयी झाले अशीच परिस्थिती प्रत्येक छोट्या मुलांची असते. घोडे, गाडी, सगळी खेळणी बाजूला करून घरात पाटीने त्यांची जागा कधीच काबीज केलेली असते. लहान असतं वय मुलांचं, नासमज, अनभिज्ञ असतात मुले…पाटी सुद्धा खेळणं म्हणून खेळू लागतात. पाटीवरचा खडू तर नाकात, तोंडात घालतात तर कधी पाटीवर रेघोट्या ओढतात… मजा म्हणून पाटी खडूकडे पाहता पाहता तो शाळेचा पहिला दिवस उजाडतो. लाडाने शिवलेला शाळेचा नवा गणवेश घालून नवं कोरं आणलेलं बाहुला बाहुलीच्या चित्रांचं दफ्तर पाटी, खडू, पट्टीने भरून छोटीशी पाण्याची बाटली आणि खाऊचा डबा भरून पाठीवर लावून पायात छान चप्पल घालून गोड गोड गप्पा सांगत शाळेत घेऊन जातात. रंगरंगोटी केलेल्या शाळा, रांगोळीनी सजलेली दारे, फुलांची कमान आदी वेगवेगळ्या सजावटींनी, काही ठिकाणे ढोल ताशे वाजवून जणू काय कोणीतरी सेलिब्रिटी येतात तसे मुलांचे आजकाल स्वागत केले जाते. आल्यावर खाऊ, चॉकलेट वाटप केले जाते. मुलांनी शाळेत हसत खेळत यावे यासाठी शाळा नानाविध युक्त्या क्लुप्त्या करत असते…आणि ते दिवस म्हणजे….
आठवतोय तो दिवस आजही… देवगड-वाडा येथील खाडीच्या किनाऱ्यावर असलेली जिल्हा परिषदेची माझी मराठी शाळा. छोट्या छोट्या दगडांना मातीवर रचून उभारलेल्या दगडी भिंती…रंगरंगोटी काय साधा सिमेंटचा किंवा मातीचा मुलामा सुद्धा नव्हता. मोठमोठ्या दगडांच्या पायऱ्या, काहीच अंतरावर विस्तीर्ण खाडी त्यामुळेच उंचावर शाळा आणि समोर छोटंसं अंगण…आंब्यांच्या झाडांची सावली, शेवग्याच्या पानांचा पसारा…खाडीकडून येणारा गार वारा…अन् सूर्याची किरणे खाडीच्या हलत्या पाण्यावर पडताच शाळेत बसल्या जागी चमकणारे डोळे…सारं काही आनंदमय, उत्साही वातावरण…!
सकाळी ७.३० वाजताच घरातून शाळेत जाण्यासाठी मुलांची अक्षरशः रडत वरातच निघायची…काही मुलांना रडताना पाहून माझाही धीर खचला. शाळा म्हणजे जणू काय शिक्षाच…असाच मनाचा समज झाला. सकाळीच उठून आंघोळी आटोपताच अर्धी भाकरी आणि आटवून जाड साय आलेलं आमच्या म्हशीच्या दुधाचा टोप पुढ्यात यायचा. घरात दुधदुभतं असूनही मंडळी कोरा चहा पिण्यात आनंद मानायची… त्यामुळे दह्यासाठी जाणारं दूध वगळता तीन वेळा दुधाचा खुराक मलाच असायचा…आणि अचानक दूध भाकरी संपताच शाळेचा गणवेश अंगावर चढवला गेला…दफ्तर कुठे असायचं तेव्हा? खाकी कपड्याची बंधाची पिशवी आत एक पाटी, लाकडाची पट्टी आणि पाटीवरची पेन्सिल…खडू. आजोबांनी दफ्तर दिलं… आणि दुसरा हात स्वतःच्या हातात पकडून घराच्या जवळच असणाऱ्या शाळेत घेऊन गेले. पावसाची रिपरिप सुरू होती, रस्ता चिखल पाण्याने माखला होता. पायातील चप्पल चिखलात रुतत होते, तरीही हात आजोबांच्या हाती असल्याने आपोआप शाळेकडे ओढला जात होतो. जाताना रडत जाणाऱ्या मुलांचा आरडाओरडा आणि चिखलातच थपकल मारून बसणे आदी गोंधळ पाहत शाळेपर्यंत पोचलो. शाळा जवळच असल्याने येता जाता शाळा पाहत होतो, पण मला सुद्धा कधीतरी याच इमारतीत यावं लागेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
आजोबांच्या वयाचेच त्यांचे मित्र असलेले बंडू तावडे गुरुजी शाळेचे मुख्याध्यापक… नेहमी घरी येत असल्याने त्यांची आणि माझी ओळख घनिष्ठ. त्यामुळे शाळेत गेलो तरी मनात भीती वाटत नव्हती…मी अगदी आनंदात होतो. तिथेही माझा रोजचा सवंगडी वीरेंद्र…म्हणजे गोंदया भेटला. तो सुद्धा शाळेत दाखल झाला होता. घरी सुद्धा दिवसभर दोघेही मस्ती करायचो, खेळायचो त्यामुळे शाळेत असलो तरी…दोघे हसत खेळत सर्व अनुभवत होतो…काही मुले मात्र वर्गातही भोकाड पसरून जोरजोरात ओरडत, रडत होती… आत्ताचे सर आणि तेव्हाचे गुरुजी यात मात्र फरक होता… अडुळश्याची नाहीतर निगडीची(निर्गुंडी) काठी काढून तयार ठेवलेलीच असायची. रडणारी मुले गप्प राहिली नाहीत की पायावर काठीचे फटके पडायचे…मग मात्र काही क्षण सगळीकडे विराण शांतता पसरायची. गुरुजी बोलायला सुरू झाले की मध्येच कुठून तरी हुंदका फुटल्याचा आवाज व्हायचा. हुंदका बाहेर येण्या आधी गुरुजींच्या हातात खुर्चीला टेकून ऐटीत उभी असलेली काठी यायची…हुंदका आतल्या आत गिळला जायचा. पहिल्या दिवशी अक्षर ओळख नसायची…मुलांची ओळख आणि गुरुजींच्या गोष्टी…घरातून आणलेला डब्यातील खाऊ खाण्यातच तीन तास उलटून गेले…
शाळा सुटल्याची घंटा चौथीतील मुलाने वाजवली…घंटेचा आवाज कानी पडताच देवळातील देवालाही प्रसन्न वाटत नसेल एवढा प्रसन्न झालो…पाटी पिशवीत कोंबली…आणि पायात चप्पल जाते न जाते तसाच पाय ओढत गोंदयाचा हात धरून घर गाठलं.. शाळेचा पहिला दिवस आनंदात गेला. बंडू तावडे गुरुजींचे प्रेम आणि हसतमुख चेहरा…यामुळे पुढे शाळा हवीहवीशी वाटू लागली…!

[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − eleven =