You are currently viewing पितृदिन…..

पितृदिन…..

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम लेख

समाजात सहनशील माणूस नेहमीच दुर्लक्षित राहतो…आपली जबाबदारी ही भावना हृदयाशी कुरवाळत आपल्या कर्तव्यात कसूर होऊ नये…कुणीही आपल्यावर एखाद्या चुकीमुळे बोट दाखवू नये म्हणून कितीही त्रास झाला तरीही जीवनात हसत हसत आपल्या खांद्यावर समर्थपणे कुटुंबाचं ओझं वाहणारा माणूस म्हणजे “बाप”….
*बाप नावाचा माणूस*
*बरेच खस्ते खातो*
*तरीही कुटुंबासाठी*
*हसत हसत जगतो*
आयुष्य एकट्याने जगतो तोपर्यंत पुरुष अगदी निर्धास्त असतो परंतु लग्न होऊन कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आली की त्याची सकाळ होते तीच रात्रीच ओझं वाहत. जमिनीला पाठ टेकून दुनिया बिनधास्त झोपलेली असताना बापाला मात्र रात्र जागवत असते ती उद्याची स्वप्न पाहत…स्वतःसाठी नव्हेच तर आपल्या कुटुंबासाठी तो स्वप्न पाहतो आणि ती खरी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. स्वप्नातही बाप घराचं सुख शोधत असतो. म्हणून तो दिवस रात्र राबतो. आपण अनेक लेख, पुस्तके वाचतो, पेपर, मासिक असो वा इतर साहित्य, सोशल मीडिया सर्वत्र “आई” या विषयावर भावनिक लिखाण फार मोठ्या प्रमाणावर होते. मुलाला नऊ महिने पोटात वाढवून आपला जीव धोक्यात घालून जन्म देणारी आई सर्वश्रेष्ठच आहे यात वादच नाही… परंतु आई मुलाला वाढवत असताना तिला प्राणाच्याही पलीकडे जपणारा, काळजी वाहणारा बाप मात्र दुर्लक्षित राहतो…
आपल्या तान्हुल्याच्या जन्माच्या वेळी एकीकडे बाळ जन्मास येणार तर दुसरीकडे असह्य वेदना सहन करणाऱ्या पत्नीची काळजी अशा द्विधा अवस्थेत बापाचे प्राण मात्र कंठात आलेले असतात…आसवांनी डोळे भरलेले असतात…बाळाचा जन्म झाला हे समजलं तरी…*ती कशी आहे?* असा प्रश्न विचारून आपल्या पत्नी सुखरूप आहे हे समजल्यावर डोळ्यांतील अश्रूंचा बांध फोडणारा बाप बाहेरून कठोर दिसला तरी आतून शहाळ्यासारखा गोड… अन् फणसाला बाहेरून काटे असले तरी आतून नरम मुलायम रसाळ गरे असतात तसाच मधुर, मुलायम आहे याचा प्रत्यय येतो. आपल्या तान्हुल्याला बाप जीवापाड जपतो, त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी…स्वतः स्वप्न पाहण्यास विसरतो… बाप तोच असतो जो…”स्वतः पायी चालतो परंतु…मुलाला खांदावर घेतो…जे जे आपण आपल्या बालपणी पाहिले नाही…ते ते सर्व दाखवतो..”
*ठेच लागता बाळाला*
*हृदय बापाचं रडतं*
*धडपडत लेकरू ते*
*कधी कधीच वाढतं*
हळवे मन बापाचं तेव्हाच दिसतं जेव्हा अंगा खांदावर खेळलेली, लाडात वाढलेली…जीवाचा तुकडा असलेली मुलगी सासरी जाते…मुलीला निरोप देताना मुलीस हृदयाशी कवटाळताना बापाचा उर भरून येतो…अश्रूंना पापण्यांच्या आड लपवत बाप “दिल्या घरी तू सुखी रहा” असा आशीर्वाद देत मुलीच्या डोईवर हात ठेवतो… हळवा बाप मुलीला निरोप दिल्यावर एकांतात अश्रूंना वाट मोकळी करून देतो…
शब्द जरी असले मुखी तिखट तरी डोळे बापाचे मायेने भरतात …सुखी होताच हृदय अश्रू बापाच्या गालावर सांडतात…
मुलं मोठी होतात…यशाचे पंख लावून दूर देशी जातात… कधी कधी तर आयुष्य घडवणाऱ्या बापालाही विसरतात…पण यशाकडे झेपावताना डोळे नसतात पाठीला…शिक्षण कमी असला तरी अनुभव असतो बापाच्या गाठीला..कठीण वेळेस आठवतो लक्षात नसलेला बाप…अन्यथा पैसा अन प्रसिद्धीपोटी विसरतो आई-बाप मठीला…
आयुष्यातील अनमोल क्षण, सर्व सुख ज्यांनी मुलांचे भविष्य घडविण्यासाठी न्योच्छावर केली…मुलांच्या आनंदात आपला आनंद शोधला…तो बाप मात्र मुलांकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाही…
*आशा नसते बापाला*
*पोरांनी त्यास सांभाळावे*
*उंच भरारी घेताना फक्त*
*एकदा…मागे वळून पहावे..*
आयुष्यात एवढ्या माफक अपेक्षा असणारा बाप आपल्या जीवनातील सुख मुलांशी वाटून घेतो अन् दुःख मात्र आपल्याच मनाच्या कोपऱ्यात साठवतो…गाडून टाकतो…तर कधी एकटाच पचवतो…
*अशा या विशाल हृदयी…पूजनीय बापाला…पितृदिनाच्या हृदय भरून शुभेच्छा…*

©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 4 =