You are currently viewing पुरुष

पुरुष

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी पत्रकार सागर बाणदार यांची अप्रतिम काव्यरचना*

*पुरुष…!*

पुरुष…
तोही एक माणूसच ना ?
मग् कुणी का नसतं त्याच्यासाठी ,
कर्तापुरुष म्हणूनच तो कष्ट उपसतो
इतरांच्या सा-या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी !
त्यालाही असतं मन अन् भावना
पण,तोच मुद्दा ठरतो गौण ,
सा-यांची व्यथा जाणून घेत सोडवताना
त्याचं जगणं मात्र असतं मौन !
अवतीभवती खूप सारा नात्यांचा गोतावळा
मात्र,त्यातही तो असतो एकटा,
कर्तव्य निभावत स्वतःचं अस्तित्व हरवणारा
कुणाच्या तरी स्वार्थापोटी ठरतो भामटा !
सा-या नात्यात आवर्जून ग्रुहित धरुनही
तो का होत जातो बेदखल ?
नात्यात होता व्यवहारी जगण्याचा शिरकाव
भरवशाच्या प्रेमाची उणीव होते सल !
आयुष्यभर जबाबदारीचं ओझं पेलणारा पुरुष
स्वतःची स्वप्नेही ठेवतो कुठंतरी गहाण ,
काहींच्या चुकीमुळे तोही ठरतो दोषी
अन् मातीमोल होत जातो स्वाभिमान !
स्त्री – पुरुष समानतेची प्रत्यक्ष अंमलबजावणी
हीच शाश्वत समाज विकासाची संधी ,
पण,आचार अन् विचारातील तफावतीची
आधी जाणीवेने उतरायला हवी धुंदी !
न तुटणारा घरादाराचा आधारच तोच
आज मात्र कुठेतरी एकटाच पडला ,
आपल्याच स्वार्थी माणसांच्या दूर होण्याने
स्वतःच्या जगण्याला मनानं पुरता नडला !
काळासोबत सारी नाती निभावता निभावता
त्यालाच नाही कळत काय आता उरलं,
डोळ्यातील पाण्यासंगे शोधत जाताना
बरंच काही दबलेलं सरलं !
म्हणून, कधीतरी त्यालाही समजून घ्यावं
लहान असूनही मोठ्याचा आधार भासावा,
हा सारा नात्यातील भरवशाचा क्षण
त्यागातील जगण्याचा ठरावा सार्थकी विसावा !

@ – सागर बाणदार
मु.पो.इचलकरंजी
मो.८८५५९१५४४०

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − three =