You are currently viewing ब्रह्मकमळ…..मध्यरात्री उमलणारे वैशिष्ठ्यपूर्ण फुल…

ब्रह्मकमळ…..मध्यरात्री उमलणारे वैशिष्ठ्यपूर्ण फुल…

ब्रह्मकमळ,,,,(Epiphyllum Oxypetalum)

कॅक्टस वर्गातील झुडूप प्रकारातील झाड असूनही काटे विरहित असते. निवडुंग प्रवर्गात मोडले जात असून मूळ परदेशीय असलेलं ब्रह्मकमळ बागेची शोभा वाढविण्यासाठी भारतात आणलं गेलं. ब्रह्मकमळ या मराठी नावाने ओळखले जाणाऱ्या कमळाला “बेथेलहॅम लिली” असे म्हणतात.
शाकीय पद्धतीने पुनरुत्पादन होणाऱ्या या वनस्पतीच्या पानासारखा दिसणारा हिरव्या रंगाचा भाग म्हणजे खोड. या खोडाना पर्णकांडे म्हणतात. पानांसारख्या दिसणाऱ्या या पर्णकांडांच्या खाचांमधून लाल गुलाबी रंगांची कळी बाहेर येते आणि कमळांचा जन्म होतो. याची पाने मांसल असून पोपटी हिरव्या रंगाची असतात. या पानांवरच पावसाळ्यात मोठ्या आकाराची पांढरी शुभ्र, सुगंधीत फुले येतात.
जुलै ते सप्टेंबर महिन्यांच्या मध्ये ज्या दिवशी पाऊस नसतो शक्यतो तेव्हाच रात्री या फुलांच्या कळ्या हळूहळू उमलू लागतात. रात्री १० नंतर आकार वाढत जातो आणि मध्यरात्री पूर्ण फुल फुलतं. रात्रीच्यावेळी फुलांचा पांढरा रंग आणि सुगंध कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करतो व सकाळपर्यंत ही फुले कोमेजतात. एकाच वेळी एका पानावर, झाडावर अनेक फुले फुलतात. भरपूर सूर्यप्रकाश असेल तिथेच भरपूर फुले येतात.

“निशोंमिलीत” अशा या ब्रह्मकमळाची शोभा अवर्णनीय असते. दले, पाकळ्या, पुंकेसर व स्त्रीकेसर यांची रचना विशेष आकर्षक असते. त्याचा सुगंध तर मोहित करून टाकणारा आहे. त्यामुळेच झाडाचा आकार वैशिष्ठ्यपूर्ण नसतानाही अनेकांच्या बगीच्याची शोभा ब्रह्मकमळाने वाढवलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 11 =