You are currently viewing डायलिसीस’ सेवा कधी सुरू होणार ?

डायलिसीस’ सेवा कधी सुरू होणार ?

मालवण ग्रामीण रुग्णालयातील डायलिसीस मशीन वर्षभर धूळखात

आमदारांनी वाळू प्रश्नी नौटंकी करण्यापेक्षा आरोग्याचे प्रश्न मंत्र्यांकडे मांडावेत

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर

मालवण
कोरोनाचा कहर सुरूच आहे. संक्रमणाचा धोका आठ महिने उलटले तरीही संपलेला नाही. सर्वसामान्य जनता मोठ्या आर्थिक संकटात आहे. पोट कसेतरी भरले जात आहे. हौस मौज सोडाच घरातील आजारी व्यक्तींना औषध उपचारासाठी पैसा नाही असे विदारक चित्र अनेक कुटुंबात आहे. अश्या स्थितीत सरकारी रुग्णालये गोरगरीब जनतेसाठी आधार आहेत. मात्र त्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळणार नसतील तर सर्वसामान्य जनतेने करायचे काय ?

मालवण ग्रामीण रुग्णालयात वर्षभरापूर्वी डायलिसिस मशीन आल्या. मात्र जसे काय आपल्याच खिशातील पैशातून मशीन आल्या तसा गाजावाजा स्थानिक आमदारांनी त्यावेळी केला. आता वर्ष उलटले त्या मशीन धूळखात आहेत. मशीनची जोडणी रखडली, सेवा द्यायला कर्मचारी नाही. रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत.

स्थानिक आमदार व शासनाच्या भोंगळ कारभारामुळे
मालवण परिसरात रुग्णांना डायलिसीस सेवा मिळत नाही असे चित्र आहे. कोरोना काळात अन्य ठिकाणी जाणे म्हणजे संक्रमण धोका अधिक. त्या बरोबर खर्चही येणार आहे. जनतेच्या पैशातून उपलब्ध होणाऱ्या शासकीय सुविधा गोरगरीब जनतेला मिळणार नसतील तर सत्ताधारी नेमके करतात काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरवर्षी वाळू प्रश्नांची नौटंकी करून दर कमी करण्याचे राजकारण करायचे हे आमदारांचे दरवर्षीचे खेळ आहेत. केवळ फोटो आणि प्रसिद्धी करायचे. वाळू दर उलट दरवर्षी वाढतातच. ना व्यवसाईकाना दिलासा मिळतो ना सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळतो. ‘वाळू दर कमी होणार’ हा आमदारांचा वार्षिक इव्हेंट मात्र होतो. अहो आमदार प्रसिद्धीचा हव्यास सोडा. जनतेच्या हितासाठी शाश्वत काम करा.

डायलिसीस युनिट सुरू होण्यासाठी पाठपुरावा करा. त्यासाठी मंत्र्यांकडे मागणी करा. मागील सरकार मध्ये जिल्ह्यातील आरोग्य मंत्री असताना आरोग्य समस्या सुटल्या नाहीत. आता तुमचे पक्ष प्रमुखच मुख्यमंत्री आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करा. तुमच्या मतदारसंघात अनेक वर्षे असलेले आरोग्याचे प्रश्न सोडवा.

स्थानिक सत्ताधारी आमदार लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या सोडवणे ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्हाला समस्या सोडवणे शक्य नसेल तर तसे जाहीर करा. मनसेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आम्ही आरोग्य सेवा देऊ.

आमदारांनी कारभाराची श्वेत पत्रिका काढावी

मतदार संघात आरोग्याचे किती प्रश्न सोडवले ? किती डॉक्टर दिले ? किती आरोग्य सुविधा दिल्या ? या बरोबर किती विकासकामे केली ? वाळूचे दर दरवर्षी किती कमी केलेगेली अनेक वर्ष हे आमदार वैभव नाईक मंत्र्यांना आणि अनेक मंत्र्यांच्या सचिवांना भेटले फोटोसेशन केले.वृत्तपत्रात छापुन आणुन सोशल मिडीयात लाईक्स मिळवले.त्या आमदारांनी एक श्वेतपत्रिका काढुन मंत्री आणि मंत्र्यांच्या सचिवांना भेटून निवेदने देवून किती प्रश्न मार्गी लावले ते सांगावे असे खुले आव्हान मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिले आहे.मंत्रालयात फोटोसेशन करून काय केले ? हे आमदारांनी जाहीर करावे. केवळ आमदार निधी खर्च हा विकास नव्हे. आमदारांनी आपल्या कारभाराची श्वेत पत्रिका काढून दूध का दूध पानीका पानी करावे, असे मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 20 =