You are currently viewing शिंपण

शिंपण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख*

*शिंपण*

तेव्हां मी लहानच होते. माझ्या आजीची आई जिला आम्ही मोठ्याई म्हणत असू ,ती अखेरचा श्वास घेत होती. मी आजीला बिलगून उभी होते. आजी म्हणजे आमच्या घरातला धीराचा महामेरू. पण त्या क्षणी ती उन्मळून गेली होती.
ती उठली. देवघरातून तिने तांब्याची लोटी आणली. त्यावरचं झाकण काढून, त्यातलं पाणी, मोठ्याई च्या मुखात घातलं. मोठ्याई गेली होती. आजीने तिचा चेहरा चादरीने झाकला.
मी आजीला विचारलं,” हे पाणी तू तिच्या तोंडात कां टाकलंस ?”
आजी म्हणाली,” हे पाणी नाही. हे गंगाजल आहे. आता मोठ्याई मुक्त झाली. स्वर्गात गेली.”
माझी गंगाजलाशी अशी ओळख झाली. तेव्हापासून गंगाजल म्हणजे मृत्यू .अखेर. शेवटच्या श्वासाशी नातं असलेला शब्द. हे मनात पक्कं बसलं.
मग जसजशी मी मोठी होत गेले, तशी गंगा या नदीशी ओळख होत गेली. सुरुवातीला कथांमधून.
भगवान ब्रह्मा ने गंगेला हिमालयाच्या स्वाधीन केले म्हणून पार्वती आणि गंगा या दोघी बहिणी झाल्या. भगीरथाने कठोर तपश्चर्या करून, गंगेचे भूलोकी अवतरण केले. तत्पूर्वी, भगीरथावर प्रसन्न झालेली गंगामाता म्हणाली, ” माझा प्रचंड प्रवाह पृथ्वी सहन करू शकणार नाही. म्हणून तू भगवान शंकराला प्रसन्न करून घे.” भगीरथाने, तपस्येने शंकराला ही प्रसन्न करून घेतले. आणि भगवान शंकराने गंगेचा प्रवाह स्वत:च्या जटेत अडवला. आणि मग गंगा पृथ्वीतलावर, शंकराच्या जटेतुन आली.
गंगेच्या अशा अनेक पारंपरिक, पौराणिक कथा महाभारतात, रामायणात वाचायला मिळाल्या.
शालेय जीवनात ,गंगेची भौगोलिक माहितीही शिकायला मिळाली. भारत देशातील सर्वात महत्त्वाचे नदी म्हणजे गंगा नदी. तिचा उगम उत्तराखंड राज्यात गंगोत्री येथे आहे. मग तिची लांबी रुंदी,वाटेत तिला मिळणाऱ्या उपनद्या, ती कोणत्या प्रदेशातून वाहते, याविषयीची माहिती, अभ्यासक्रमातून भरपूर मार्क्स मिळवण्यासाठी घोकंपट्टी करून शिकले.
आणि त्याच बरोबर गंगा नदीचे सांस्कृतिक, धार्मिक, सांकेतिक रूपही उलगडू लागलं.
हिंदू धर्मात गंगा ही एक अत्यंत पवित्र मानली जाणारी नदी. गंगाजल म्हणजे अमृतच अशी धारणा लोकांची आहे. गंगास्नानाने मनुष्याचे पापक्षालन होते. गंगाजलाचे शिंपण, घरातल्या पीडा, संकटे, व्याधी दूर करतात. वास्तुदोष दूर होऊन, गृहस्थी मध्ये शांतता प्राप्त होते. मृत्युसमयी, गंगाजलाचा एक थेंब, मृतात्म्यास मुक्त करून स्वर्गलोकी चे दार उघडतो. अनेक धार्मिक कार्यात गंगाजल, पूजा सामग्रीत आवश्यक असते. अत्यंत स्वच्छ, शुद्ध असं हे गंगाजल मानलं जातं.
या सर्व श्रद्धांच्याही पलीकडे जाऊन, गंगाजलाविषयी मिळालेल्या वैज्ञानिक माहितीनेही त्याचे महत्व समजून घेतले. गंगेच्या पाण्यात विषाणूंचा नायनाट करणारा बॅक्टेरियोफ्राज हा व्हायरस असतो. त्यामुळेच गंगा स्नान किंवा गंगाजलाचा स्पर्श हा रोग मुक्त करण्यास मदत करतो, असे वैज्ञानिकांचे संशोधनात्मक निरीक्षण आहे. तेव्हा गंगा, गंगाजल यांचं पावित्र्य, महत्त्व नक्कीच आहे.
नंतर लाक्षणिक अर्थाने ही गंगा आयुष्यात उतरली. ‘मन चंगा तो कठौती में गंगा..’ या हिंदी म्हणी मागची कथा खूपच रोचक वाटली.
संत रविदास एक गरीब चर्मकार. गंगेवर त्याची विलक्षण भक्ती. पण प्रत्यक्ष गंगेचा दर्शन त्याला कुठून होणार? चप्पल दुरुस्त करायला आलेल्या एका व्यक्तीबरोबर, तो त्यानेच दिलेल्या त्याच्या मजुरीचे नाणे, त्याला गंगेत अर्पण करायची विनंती करतो. ते नाणे गंगेत अर्पण करताच, प्रत्यक्ष गंगाच अवतरते. आणि त्या नाण्याच्या बदल्यात एक सोन्याचं कडं त्या व्यक्तीला देते. ती व्यक्ती राजाला ते कडे देते.. राजा त्याला दुसरे कडे आणायला सांगतो. तेव्हा ती व्यक्ती पुन्हा रविदासाकडे येते. तो रवीदासाला झालेली सर्व हकीकत सांगतो. आणि त्याच्याच कडे कड्याची पुन्हा मागणी करतो. रविदास डोळे मिटून गंगेचं स्मरण करतो आणि त्याच्या कटौती मधलंच पाणी शिंपडतो.आणि काय आश्चर्य! प्रत्यक्ष गंगाच कटौतीमधून अवतरून त्याला तिथे दर्शन देते.
थोडक्यात मन चांगलं असेल, भक्ती भाव खरा असेल तर गंगा तुमच्यातच वहात राहील. हा एक सुंदर संदेश त्या कथेने दिला.
गंगा शब्द अशा संस्कार स्वरूपात आयुष्यात आला.देव्हार्‍यात दिसणाऱ्या, त्या गंगाजलाने भरलेल्या पितळी कळशीला , खरोखरच मनात एक भक्तिमय, सुरक्षा देणारं, भयमुक्त ठेवणारं स्थान मनात मिळालं. गंगाजळावरुनच गंगाजळी या शब्दाची उत्पत्ती झाली. गंगाजळी म्हणजे आयुष्यभर कमाई करून थेंबाथेंबाने बाजूला ठेवलेली शिल्लक. बँक बॅलन्स आणि गंगाजळी या शब्दातला अर्थ, व्यावहारिक दृष्ट्या एकच असला तरी त्याचे भाव, मूल्य वेगळे आहे. गंगाजळी ही नीतीने, सत्याने, चांगल्या मार्गाने मिळविलेल्या पैशातील शिल्लक, असा अर्थ अभिप्रेत असतो. गंगेचे पावित्र्य त्याही शब्दात आणि द्रव्यात बिंबित झालेलं आहे.
आमच्या ऑफिस मधला पांडे नावाचा, माझा सहकारी डे बुकला गंगाजळी म्हणायचा.डे बुक म्हणजे एकप्रकारे बँकेची महत्वाची रोजच्या जमा खर्चाची चोपडी.
” काय हो मॅडम आपली गंगाजळी झाली का टॅली?” असे गंमतीत तो विचारायचा. जिथे आयुष्याची तीस बत्तीस वर्षे, क्रेडिट आणि डेबिट केले, बेरजा आणि वजाबाक्या केल्या, तिथे आपल्या हातून प्रामाणिकपणे काम व्हावे,बुद्धी भ्रष्ट होउ नये या भावनेला पुष्टी देणारा, पांडेचा, गंगाजळी, हा डे बुकला दिलेला शब्द, मला फार आवडायचा.
वडील गेल्यानंतर आम्हाला त्यांच्या कपाटात एक डायरी सापडली. पहिल्याच पानावर त्यांनी लिहिलं होतं,
” गंगाजल.”
आणि नंतर पुढच्या एकेका पानावर त्यांनी असं लिहिलं होतं …
मृत्यु हे अंतिम सत्य आहे. मृत्यु हे आत्म्याचे धाम आहे. तिथे तो परमानंदी असणार आहे. म्हणून मृत्युचा शोक नको.
परिस्थिती बदलणार नसेल, तर तिचा स्वीकार करा.

गेलेल्या गोष्टींचे दुःख करू नका. गेली ती गंगा आणि राहिलं ते तीर्थ! असे माना.

मागे पाहू नका. भविष्याचा विचार करू नका. वर्तमानात जगा.

निसर्गावर प्रेम करा.
पुढील प्रत्येक पाना वरचे वडिलांचे वाक्य सोन्या मोत्याचे होते.
आणि शेवटच्या पानावर त्यांनी लिहिलं होतं,
“माझ्या प्रिय जनांनो! तुमच्यासाठी मी ठेवलेली हीच खरी गंगाजळी समजा.”
त्यादिवशी गंगाजल याचा खरा अर्थ जाणवला. त्यादिवशी या शब्दाने, साऱ्या भौगोलिक, वैज्ञानिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय सुद्धा सीमा पार ओलांडल्या. गंगा म्हणजे पवित्र, शुद्ध, विमल, निर्मळ.लाक्षणिक अर्थाने गंगा स्नान म्हणजे विचारांची सात्विकता, कर्मातली नैतिकता. स्वच्छ मन ,स्वच्छ विचार आणि सद्विचारांच्या, सद् वर्तनरुपी गंगाजळाचे मानव जातीवर सदैव शिंपण असावे,हा त्यामागचा रुपकात्मक अर्थ.
मी बुद्धीवादी आहे. मी नास्तिक नाही. मी धार्मिक आहे .मी श्रद्धाळू ही आहे. पण धर्माच्या नावाखाली केलेल्या संकेतांचे स्तोम ही अंधश्रद्धा आहे.आणि ते मला मान्य नाही. अंधश्रद्धेने होते ते फक्त प्रदूषण. म्हणून या निर्मल गंगाजलाचे पावित्र्य अशा रितीने राखणं, जपणं हे मी माझं जीवनसाध्य समजते…
इति गंगार्पणमस्तु।।

राधिका भांडारकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + six =