You are currently viewing तारकर्ली बोट दुर्घटना प्रकरणातील संशयितांची जामिनावर मुक्तता

तारकर्ली बोट दुर्घटना प्रकरणातील संशयितांची जामिनावर मुक्तता

मालवण

तारकर्लीत स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी अटक केलेल्या गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा. तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग) यांच्यासह एकूण सात जणांना दुपारी मालवण न्यायालयात हजर केले असता सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

याबाबत या बोटीतील पर्यटक लैलेश प्रदीप परब ( वय ३६, रा. अणाव कुडाळ) यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. मंगळवारी तारकर्ली समुद्रात गजानन स्कुबा डायविंग सेंटरची बोट लाटांच्या तडाख्याने पलटी होऊन बोटीतील सुमारे २८ जण समुद्राच्या पाण्यात फेकले जाऊन दुर्घटना घडली होती. यात अकोला येथील आकाश भास्करराव देशमुख व पुणे येथील डॉ. स्वप्नील मारुती पिसे या दोन पर्यटकांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. तर अन्य पर्यटक जखमी झाले होते. या प्रकरणी पर्यटक लैलेश परब यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यावर रात्री उशिरा बोट मालक, चालक व अन्य स्कुबा डायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा. तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल (वय २३, रा. देवबाग), विकी फिलिप फर्नांडिस (वय ३२, रा. देवबाग), प्रथमेश रामकृष्ण बसंधकर (३१, रा. दांडी मालवण), तुषार भिकाजी तळवडेकर (वय ३९, रा. तारकर्ली), विल्यम फ्रान्सिस लुद्रीक (वय ५४, रा. देवबाग) यांच्यावर भादवि कलम ३०४ (अ), ३३६, ३३७, २८०, २८२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. सर्वाना दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नितीन नरळे हे अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा