समस्या अजूनही कायम; मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी गैरसोयींकडे वेधले लक्ष
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ पूर्णत्वास आले मात्र सहा महिने होत आले तरीही विमानतळावरील गैरसोयींकडे दुर्लक्षच केले जात आहे.ना खासदारांचे लक्ष आहे ना आमदारांचे. तसेच इतर लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळाच करत आहेत. केवळ उद्घाटनापुरताच यांचा विमानतळाशी संबंध होता, अशी टीका मनसे सरचिटणीस परशराम उपरकर यांनी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
माजी आम.परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे पर्यटनासाठी इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे पर्यटकांची येथे गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळ, त्यांची माहिती, त्याकडे जाणारे मार्ग याविषयी काहीच माहिती याठिकाणी दिलेली नाही. पूर्णपणे भकास असा हा परिसर दिसत आहे. या ठिकाणी खाद्यपदार्थांचे कोणतेही स्टॉल उपलब्ध नाहीत. देवगडमधून निघालेला एखादा प्रवासी जो डायबिटीस ने आजारी असेल किंवा एखादं लहान मूल असेल तर त्यांना खाद्य पदार्थ किंवा एखादी पाण्याची बॉटलही मिळत नाही, ही खरंच शोकांतिका आहे.
तसेच विमानामध्ये विकतही खाद्य पदार्थ दिले जात नाहीत. त्यामुळे चार ते साडेचार तास प्रवाशांना उपाशी प्रवास करावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे. याकडे खासदार, आमदार, पालकमंत्री तसेच कोणतेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. केवळ विमानतळ सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले हेच दाखवत आहेत. राज्य सरकारने वीज, पाणी, रस्ता या सोयी पूर्ण करण्याचे करारामध्ये लिहिले आहे. परंतु त्या सोयीदेखील पूर्ण केल्या गेल्या नाहीत. चार वर्षांपूर्वी तेजस एक्सप्रेस मध्येही खाद्य पदार्थ दिले जात नव्हते. या विषयी एमडीकडे पाठपुरावा केल्यानंतर चिपळूणच्या पुढे खाद्य पदार्थ देण्यास सुरुवात झाली.
मेडिकल कॉलेजमध्येही अशाच प्रकारची गैरसोय आहे. केवळ मोठमोठ्या घोषणा येथे देण्यात आल्या. परंतु सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ पाच मुले त्या ठिकाणी शिकतात. बाकीची सर्व मुले परजिल्ह्यातील आहेत. तसेच या ठिकाणी देखील सोयींची वानवा आहे. या साऱ्या गोष्टींचा पर्दापाश आम्ही लवकरच करणार आहोत, असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.